कवी, कथाकार, कादंबरीकार, गीतकार, चित्रपट कथालेखक, नाटककार, चित्रपट निर्माते, संवाद लेखक, दिग्दर्शक, विचारवंत.. अशा कितीतरी क्षेत्रांमध्ये सहज भ्रमण करणारे गुलजार या नावाने लोकप्रिय झालेले संपूर्ण कालरा यांच्या कर्तबगारीविषयी काय सांगावे? उत्तमता आणि लोकप्रियता यांचे प्रमाण व्यस्त असल्याचे सहसा मानले जाते, पण गुलजार मात्र त्याला लख्ख अपवाद आहेत.
संवेदनशीलता हा गुलजार यांच्या लेखनाचा प्रमुख गुण मानता येईल. रावी पार, धुआँ, रात पश्मिने की, खराशें, मीरा, पुखराज, त्रिवेणी, कुछ और नज्में, मिर्झा गालिब यांचे चरित्रात्मक चित्रण, निवडक कविता, दुर्लक्षित कविता, मीलो से दिन अशी त्यांची कित्येक पुस्तके प्रसिद्ध झाली. ‘रावी पार’ हे पुस्तक फाळणीदरम्यान घडलेल्या, न घडलेल्या प्रसंगांवर बेतलेले आहे. फाळणीदरम्यान न भूतो न भविष्यती संकटांना सामोरे जावे लागणाऱ्या सामान्य जनांच्या कथा अंगावर काटा आणल्याशिवाय राहत नाहीत.
मीरेची कृष्णाप्रति असेलली भक्ती, उर्दू साहित्यामध्ये अखेरचा शब्द असलेल्या मिर्झा गालिब यांच्या शायरीच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाचा शोध घेण्याचा केलेला प्रयत्न, कुसुमाग्रजांच्या निवडक मराठी कवितांचा हिंदीमध्ये केलेला अनुवाद, लाडकी लेक बोस्कीसाठी लिहिलेला बोस्कीचे पंचतंत्र असे विविधारंगी विपुल लेखन विविध सामाजिक गटांमध्ये आणि वयोगटांमध्ये लोकप्रिय आहे.
हेही वाचा >>> प्रसिद्ध कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर, साहित्यातील योगदानाचा गौरव
बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’साठी लिहिलेले ‘मोरा गोरा अंग लैले’ या गीतापासून सुरू झालेल्या त्यांचा हिंदी चित्रपट गीतांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी स्वत:ची खास शैली विकसित केली. घनगंभीर आवाजात सादर केलेल्या त्यांच्या कविता आणि इतर लेखनप्रकारही इतके लोकप्रिय झाले की, ‘गुलजार बोलतात त्याची कविता होते’, असे म्हणण्याचा प्रघात पडला. ‘एकसो सोला चांद की राते, एक तुम्हारे कांधे का तील’ लिहिणारे गुलजार, ‘बिडी जला लै’ लिहिणारेही गुलजार आणि ‘जंगल जंगल फूल खिला है’ लिहिणारेही गुलजारच. ‘मेरे अपने’ गुलजारचा, ‘परिचय’ गुलजारचा आणि ‘अंगूर’ही गुलजारचाच. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे त्यांचे दैवत. कितीही लोकप्रियता मिळाली तरी पाय जमिनीवर ठेवण्याची कला ते गुरुदेवांकडे पाहूनच शिकले असावेत.
बावीस भाषांवर प्रभुत्व
जगदगुरु रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेतील योगदानाबद्दल ज्ञानपीठने गौरवण्यात येत आहे. दृष्टीहिन असलेले रामभद्राचार्य चित्रकूट येथील तुलसी विद्यापीठाचे संस्थापक आहेत. याखेरीज अपंगांसाठी एक विद्यापीठ व शाळेचे संचालन त्यांच्याकडून केले जाते. संस्कृतचे अध्यापन करणाऱ्य रामभद्राचार्य यांनी शंभराहून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. १९५० मध्ये त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे झाला. जन्मानंतर दोन महिन्यांतच त्यांना अंधत्व आले. त्यांना २२ भाषांचे ज्ञान आहे. संस्कृत व्यतरिक्त हिंदी, अवधी, मैथिली या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. रामानंद संप्रदायातील चार रामानंदचार्यापैकी ते एक आहेत. २०१५ मध्ये त्यांना केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्कारने सन्मानित केले. त्यांचे मूळ नाव गिरिधर मिश्र. जगद्गुरू ही उपाधी त्यांना पुढे प्राप्त झाली (१९८८). रामभद्राचार्य लिहूवाचू शकत नाहीत कारण ब्रेल लिपीचा उपयोग त्यांनी कधी केला नाही. ते ऐकून ऐकून शिकले. वयाच्या पाचव्या वर्षी संपूर्ण गीता पाठ केली होती. १९६७ मध्ये त्यांनी जौनपूर जिल्ह्यातील सुजनगंज येथे असलेल्या ‘आदर्श गौरीशंकर संस्कृत कॉलेजा ‘त प्रवेश घेतला. रामानंद संप्रदायाचे ते अनुयायी झाले (१९८३). तेव्हापासून ते रामभद्रदास म्हणून ओळखले जाऊ लागले. १९८७ मध्ये रामभद्रदासांनी चित्रकूटमध्ये ‘तुळसीपीठ’ ही एक धार्मिक आणि समाजसेवी संस्था स्थापन केली. १९८८ मध्ये काशी विद्वत् परिषदेने त्यांची तुळसीपीठ आसनस्थ जगद्गुरू रामभद्राचार्य म्हणून निवड केली. अलाहाबाद उच्च न्यायालयात रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वाद सुनावणीसाठी आला असताना धार्मिक क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून त्यांनी साक्ष दिली होती.