अभिजित बेल्हेकर
पाऊस सुरू झाला, की घाटमाथ्यालगतच्या पश्चिम खोऱ्यांना जाग येते. इथे दऱ्याखोऱ्यांमधून पाऊस, ढग, धबधब्याचा खेळ सुरू होतो. सारे रान हिरवे होते. अशातच पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भीमेच्या खोऱ्यात मंदोशीची वाट धरावी आणि निसर्गाच्या या हिरवाईत हरवून जावे.
या भटकंतीसाठी पहिल्यांदा पुणे-नाशिक महामार्गावरचे राजगुरुनगर गाठावे. पुण्याहून हे अंतर चाळीस किलोमीटर! या गावातूनच एक वाट भोरगिरीकडे जाते. ऐन पावसाळय़ात या वाटेवर निघालो, की वाटेतील चास गावापासूनच या आगळय़ावेगळय़ा प्रदेशाची, तिथल्या हिरवाईची चाहूल लागते. भोवतीने हिरवे डोंगर आणि तळाशी असलेले नीरव रान लक्ष वेधून घेते. एरवी ऊन-वाऱ्यात तापत पडलेल्या जमिनी पाऊस पडू लागला, की भाताची भिजरी खाचरे बनतात. पावसाच्या कृपेवर वाढणारे हे पीक. म्हणून तर काही जण याला ‘देवाचे पीक’ असेही म्हणतात. बहुधा यामुळेच हिरवाईचे सारे रंग या एकटय़ा भात खाचरांत सामावलेले दिसतात.
हेही वाचा >>> अवांतर: सवतसडा
हे सारे अनुभवत असतानाच चासकमान धरणाचा जलाशय येतो. ‘भोरगिरी’च्या रांगेत महाराष्ट्राची तपस्वी भीमा नदी जन्म घेते. सारी सृष्टी सुजलाम्-सुफलाम् करणाऱ्या तिच्या या पात्रावरच चासकमानचा जलाशय साकारला आहे. पावसाळय़ात भोवतीच्या हिरवाईत हा सारा जलाशयच अनेकदा ढगात बुडालेला असतो. ढगांच्या या दाटीला स्पर्श करत मग धरणाच्या भिंतीवरून पलीकडच्या तिरापर्यंत चालत जायचे आणि एक छान अनुभव कप्पाबंद करायचा!
स्वप्नातील हे दृश्य साठवत पुढे निघालो, की हिरवाईचे रंग अधिकच गडद होतात. वाटेतील वाडा गाव जाते. बरोबर चाळिसाव्या किलोमीटरला शिरगावची वस्ती येते. सरळ गेलेली वाट अगदी कडय़ावर भोरगिरीला जाऊन थांबते, तर उजवीकडची भीमाशंकरला पोहोचते. आपण यातील भीमाशंकरच्या वाटेवर निघायचे. आता घाटवाट सुरू होते, तसे भोवतीने भीमाशंकरचे अरण्य आणि त्यात कोसळणारा पाऊसही दाट होतो. पाऊस आणि त्यापाठी सर्वत्र पसरणाऱ्या ढगांच्या लोटात सारा आसमंत बुडालेला असतो. मधेच कधी तरी पाऊस थांबतो, ढगही हटतात आणि भोवतीच्या डोंगरकडय़ांवरील असंख्य जलधारा खुणावू लागतात. कुठे उरलेसुरले ढगांचे पुंजके अद्यापही त्या शिखरांशी झटा घेत असतात. दुसरीकडे वाटेभोवतीच्या शेता-खाचरांमध्ये रंगीबेरंगी इरली घेतलेल्या भात लावणाऱ्या माळांची धांदल सुरू असलेली दिसते. या धुंदीतच मंदोशी येते. वाहने इथेच लावत जावळेवाडी विचारायची आणि रस्त्याकडेच्या भातखाचरांमधून वाट काढत डोंगररानी निघायचे. ओल्या वाटा आणि हिरव्या डोंगरांमधील हा प्रवास असतो. वाटेवरच्या पाण्यात प्रत्येक पाऊल ‘डुऽबुक-डुऽबुक’ असा आवाज काढत असते. दुसरीकडे भात खाचरांमध्ये साठलेले पाणीही एका शेतातून दुसऱ्या शेतात ‘झुळझुळ’ आवाज करत प्रवास करत असते. पुढे या साऱ्या पाण्याला बरोबर घेत एखादी मोठी ताल ‘धो-धो’ आवाज करत पाण्याचा पदर होऊन बाहेर पडते. इतक्या सगळय़ा आवाजांमध्ये भोवतालच्या लहानसहान धबधब्यांचा निनादही त्या दरीत भरून राहिलेला असतो. ..वाहत्या पाण्याच्या नादालाही किती छटा! रानीवनी धावणाऱ्यांच्या मनाला हे नाद जागे करतात आणि पुढे कित्येक दिवस ते कानी रुंजी घालत राहतात!
हेही वाचा >>> अवांतर : ‘ताम्हिणी’च्या वाटेवर!
सृष्टीचे हे सारे कौतुक सुरू असतानाच एका वळणावर मंदोशीची ती जलधार समोर अवतरते. मागच्या डोंगरातून धावत येणाऱ्या असंख्य छोटय़ा-मोठय़ा जलधारांचा हा एकत्रित आविष्कार! मागची डोंगराची हिरवाई आणि तळातील भाताचे गर्द पट्टे या देखाव्यावर ती जलधार शुभ्र फेसाळ रूपात दोन तीन टप्पे घेत कोसळत असते. वाटते असे दूरवरूनच तिला पाहत राहावे, साठवून घ्यावे. सारे ताण, चिंता, धावपळ, विचार मागे सोडून एखाद्या कोरीव शिवालयात बसल्याप्रमाणे समाधिस्थ व्हावे! भीमाशंकराच्या डोंगरातून निघालेल्या ‘त्या’ गंगेचे हे धावणे, झेपावणे, कोसळणे आणि पुन्हा उसळत-फेसाळत प्रवाहात अंतर्धान होणे..
प्रत्येक क्षण वेगळा आनंद, अनुभूती आपल्या गाठी बांधत असतो!
मंदोशीच्या परिसरात
* चासचे सोमेश्वर मंदिर
* चासकमान धरण
* भोरगिरी किल्ला
* भीमाशंकर मंदिर
कसे जाल?
* पुणे – नाशिक महामार्गावरील राजगुरुनगरहून वाट
* राजगुरुनगर ते मंदोशी अंतर ४२ किलोमीटर
* खासगी वाहन सोईचे
abhijit.belhekar@expressindia.com