अभिजित बेल्हेकर

सारे कोकणच खरे तर निसर्गाचा खजिना! कोकणच्या कुठल्याही वाटेवर स्वार झालो, की हा निसर्ग जागोजागी थांबवतो. चिपळूणची वेस ओलांडून एकदा परशुराम घाटाच्या दिशेने निघालो होतो आणि घाट सुरू होण्यापूर्वी उजव्या हाताच्या अशाच एका स्थळाने पाय खेचून घेतले- सवतसडा!

Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
rain of money through superstition and witchcraft in patur forest
अंधश्रद्धा व जादूटोण्यातून पैशांचा कथित पाऊस… पातूरच्या जंगलात नेमकं घडलं काय?
Loksatta Chatura Nature Change of seasons and moments of joy in the garden
निसर्गलिपी: ऋतू बदल आणि बागेतील आनंदाचे क्षण
banana marathi news
लोकशिवार : केळी पिकाला रोगांचा विळखा
climate change loksatta
कुतूहल : भूजल आणि हवामानबदल
Fire in a cargo vehicle at Chandwad Ghat nashik news
नाशिक: चांदवड घाटात मालवाहू वाहनास आग

वर्षांऋतूचे प्रेम कोकणाच्या बाबतीत थोडे जास्तच. ज्येष्ठ-आषाढातल्या पहिल्या सरीपासून सुरू होणारा हा सोहळा पुढे चार महिने साऱ्या कोकणाला भिजवत राहतो. पाऊस पडू लागतो, सारा मुलूख हिरवागार होतो. या हिरवाईवरून असंख्य जलधारा वाहू-धावू लागतात. यातलीच एक मोठी जलधार- सवतसडा!

हेही वाचा >>> फेसबुक, इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्तींबरोबर मैत्री करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी….

मुंबई-गोवे महामार्गालगतचा हा धबधबा चिपळूणहून पाच किलोमीटरवर. परशुरामाच्या डोंगरावर पडणारा सारा पाऊस इथे या धारेतून खाली कोसळतो आणि वाशिष्ठीला जाऊन मिळतो. भोवतीने घट्ट झाडी आणि मधोमध एका उंच उघडय़ा कातळावरून कोसळणारी ही शुभ्र धार. जणू या शुभ्रतेला हिरवाईचेच कोंदण! सवतसडय़ाचे हे पहिले दर्शनच मोहात पाडते.

मुख्य रस्त्यावरून धबधब्यापर्यंत जाण्यासाठी एक चांगली पाऊलवाट बांधली आहे. या वाटेच्या सुरुवातीलाच सवतसडय़ाची ओळख सांगणारी एक शासकीय पाटी येते. पण तिच्यावर अगदी सुरुवातीलाच ‘..‘क’ वर्ग पर्यटनस्थळ’ असा उल्लेख दिसतो. समोरचे नितांतसुंदर दृश्य आणि त्यासाठी ही अशी ‘अलंकारिक’ भाषा वाचल्यावर काय व्यक्त व्हावे हेच सुचत नाही. पर्यटनस्थळांच्या विकासासाठी त्यांची अ, ब, क अशी वर्गवारी करणे गरजेचे असेलही; पण त्याचे असे जाहीर प्रदर्शन मांडण्यात कुठल्या सौंदर्यशास्त्राचा झरा इथे वाहत असावा?

मोठाल्या वृक्षराजीतून ही वाट धबधब्याकडे निघते. वाटेत झाडांच्या फांद्यांची कमान घेत ही जलधार वेगवेगळय़ा कोनांतून दिसत राहते. या प्रत्येक कोनातील दृश्याला स्वत:चे असे रूप. त्यातून या जलधारेचे व्यक्तिमत्त्व पुन्हा नव्याने उमलत असते. निसर्ग ही अनुभवण्याची गोष्ट असते हे अशा जागा आम्हाला आवर्जून सांगू पाहतात.

हेही वाचा >>> अवांतर : ‘ताम्हिणी’च्या वाटेवर!

वाट पुढे सरकते, तसे त्याचा तो आवाज जवळ येऊ लागतो. त्याच्या पुढय़ात येतो, तो एक भलीमोठी जलधार त्या खोल डोहात स्वत:ला लोटून देत असते. ते विस्तीर्ण रूप आणि रोरावणारा आवाज मन व्यापून टाकतो. तिचे ते कडय़ावरून उसळणे, कोसळणे आणि खाली डोहात उडी घेत फेसाळणे हे केवळ पाहण्यासारखे असते.

शे-पाचशे फूट उंचीचा तो कडा, मात्र त्याचे पोट खपाटीला गेल्याने वरून निघालेली ती धार थेट जमिनीकडे झेपावते. असंख्य धारांना विणत जणू एखादा जरीकाठाचा पदर बनलेला. एखाद्या सुंदर स्त्रीने तिचे लांबसडक केस मोकळे सोडावेत, त्याप्रमाणे !

 आपण असे या भावमग्नतेत असतानाच कुणीतरी या सवतसडय़ाची कथा सांगू लागते, ‘‘..त्या तिथे वर धबधब्याच्या कडय़ाच्या टोकाशी त्या दोघी बसल्या होत्या. दोघी राजाच्या राण्या. एक आवडती, तर दुसरी नावडती. यातूनच तो सवतमत्सर. नावडती आवडतीला तिची वेणी घालून देते असे म्हणते. तिच्या बोलण्यातील काळे-बेरे लक्षात आल्याने आवडती आपला पदर हळूच नावडतीच्या साडीला बांधते. वेणी होते, आवडती उठणार, तोच नावडती तिला कडय़ावरून खाली ढकलते; पण तिच्याबरोबर नावडतीदेखील खाली कोसळते.’’

सवतीमत्सराची ही गोष्ट. ती सांगत हा ‘सवतसडा’ आपल्या पुढय़ात कोसळत असतो. गेली हजारो वर्षांच्या या कोसळण्यातून इथे तळाशी एक मोठा डोहच तयार झाला आहे. त्यात पडणारी ही धार दूपर्यंत तिचे तुषार उडवते. सवतसडय़ाचे हे सौंदर्य पाहता पाहता या तुषारांमध्ये भिजायला होते.

वाशिष्ठी दर्शन

* सवतसडय़ाला मनात साठवावे आणि पुढे निघावे तो घाटात आणखी एक सौंदर्यस्थळ वाट पाहत असते.

* उंच उंच जाण्यात पायथ्याचे जग, देखावा पाहण्याचे मानसशास्त्र दडल्याचे सांगितले जाते. परशुराम घाटाच्या डोंगराला असाच एक निसर्गदर्शनाचा कोन आहे. त्याला कुणी ‘वाशिष्ठी दर्शन’ नाही तर कुणी ‘विसावा पॉइंट’ असे म्हणते.

* परशुराम घाटाचे शेवटचे वळण पार पाडत गाडी सर्वोच्च स्थानी आली, की रुंदावलेल्या या रस्त्यावरून एकदम डावीकडच्या दरीकडे सगळय़ांचेच लक्ष जाते. वाशिष्ठी नदीचे खोरे सुजलाम् सुफलाम् होऊन अवतरते.

* डोंगरदरीच्या आश्रयाने, हिरवाईला सोबत घेत वाशिष्ठी मार्ग काढत असते. समोरच्या गोवळकोटला चंद्राकृती वळण घेणारी ही जणू चिपळूणची चंद्रभागाच! तिचे हे भरलेले पात्र, भोवतीची हिरवाई, भातशेतीचे पट्टे सारे काही मन मोहरून टाकते. कधी संध्याकाळी इथे आलो, तर या साऱ्या निसर्गदृश्याने मावळतीचे गहिरे रंग पांघरलेले असतात. इथल्या झाडांच्या कमानीतून हे सारे पाहताना जीव गुंतून जातो. मस्तमौला मुशाफिरीचे हे असे गहिरे रंगच मग नव्या प्रवासाची दिशा ठरवतात.

कसे जाल?

* चिपळूणपासून पाच किलोमीटरवर.

* चिपळूणहून रिक्षासेवा उपलब्ध

* परशूराम मंदिरही या जोडीने पाहता येते.

abhijit.belhekar@expressindia.com

Story img Loader