गौरव सोमवंशी
संगणकशास्त्र असो वा डिजिटल युग, शेती असो वा व्यापक अर्थकारण किंवा कोणत्याही आर्थिक/ सामाजिक रचना असोत, येत्या काळात अशा जवळपास सर्व क्षेत्रांत बदल घडवण्याची क्षमता ‘ब्लॉकचेन’ या नवतंत्रज्ञानात आहे. या बदलाचे वाहक किंवा सक्रिय शिलेदार आपण कसे आणि का होणार, हे सांगणारे साप्ताहिक सदर..
‘साखळीचे स्वातंत्र्य’ या नावात मुद्दामहून सुचवलेला विरोधाभास तुम्हाला जाणवेलच. साखळीला आपण बंधनाचे प्रतीक मानतो; त्यामुळे नेमके कोणते स्वातंत्र्य मिळणार आहे, असेही मनात आले असावे कदाचित. उत्तर हे की, आपण इथे कोणत्याही ‘साखळी’ किंवा ‘चेन’बद्दल बोलत नसून, ‘ब्लॉकचेन’ या तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत. या तंत्रज्ञानामुळे नेमके कोणते बदल आपल्या जगात घडले, घडत आहेत किंवा घडू शकतात, याची चर्चा करण्यावर या लेखमालेचा मुख्य भर असेल. ‘बिटकॉइन’ या बहुचर्चित कूट-चलनाबद्दल (क्रिप्टो-करन्सी) आपण ऐकले असेलच. जसे की, दोनेक वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांना बिटकॉइनमुळे कोटय़वधी रुपयांचा नफा झाला; किंवा २०१८ साली एका अभियंत्याला पोलिसांनी अटक केली, कारण त्याने बंगळूरुमध्ये बिटकॉइन एटीएम सुरू केले. अगदी मागील महिन्यातली बातमी, ‘लिंक्ड-इन’ या व्यावसायिक संकेतस्थळाच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वोत्तम उदयोन्मुख नोकऱ्यांमध्ये ‘ब्लॉकचेन डेव्हलपर’ ही पहिल्या क्रमांकाची रोजगारसंधी होती.
तर.. अनेकदा ‘ब्लॉकचेन’ आणि ‘बिटकॉइन’ हे दोन शब्द एकाच अर्थाने किंवा अदलाबदल करून वापरले जातात; पण ते तसे वापरणे म्हणजे जणू फेसबुक आणि इंटरनेट दोन्ही एकच आहे म्हणण्यासारखे. ब्लॉकचेन हे बिटकॉइनमागील तंत्रज्ञान आहे. ते दोन्ही एकमेकांशी निगडित आहेत; पण ते एकच नाहीत. पुढल्या काही आठवडय़ांत याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात. पण हे तंत्रज्ञान ‘संगणकशास्त्रा’शी निगडित आहे म्हणून त्याकडे इतर क्षेत्रांतील मंडळींनी काणाडोळा करावा का? तंत्रज्ञान आणि आपला छत्तीसचा आकडा, असा काही आपला गैरसमज असेल म्हणून याकडे दुर्लक्ष करावे का? तेव्हा हे समजून घ्या की, जे काही आक्षेप आज आपल्या मनात ‘ब्लॉकचेन’बद्दल आहेत, तेच जसेच्या तसे उचलून ३० वर्षे मागे नेले, तर ‘इंटरनेट’बद्दलही लागू होतीलच की! इंटरनेटमुळे आज आपले दैनंदिन जीवन, वैयक्तिक आयुष्य, समाजरचना, सरकारशी आपले संबंध.. यांमध्ये काही ना काही प्रमाणात बदल घडलाच ना.. अजूनसुद्धा घडत आहे! या सगळ्या बदलांचा घटक व्हायला तुम्हाला ‘तंत्रज्ञान’ माहीत असावेच अशी काही अट कोणी घातली नव्हती! या बदलाचा आपण एक तर सक्रिय भाग राहिलो आहोत किंवा निष्क्रिय राहूनही सगळ्या बदलांना स्वीकारू शकलो आहोत.
एकोणीसशे नव्वदच्या दशकात इंटरनेटचे जे स्वरूप आणि परिस्थिती होती, जवळपास तशीच आज ब्लॉकचेनची आहे. या तुलनेतून तीन गोष्टी सुचवायच्या आहेत :
(१) तिथपासूनच्या कालावधीत इंटरनेटने जितक्या प्रमाणात प्रभाव टाकला आणि ज्या-ज्या क्षेत्रांत प्रभाव टाकला, अगदी त्यासारखाच प्रभाव ब्लॉकचेनचासुद्धा राहील.
(२) ब्लॉकचेन आजघडीला बाल्यावस्थेतले तंत्रज्ञान आहे; पण आज त्याकडे पाहून आपण एक भाकीत नक्की करू शकतो, की यामुळे नक्की काही तरी बदल होणार आहेत! मात्र, हे बदल नेमक्या किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने होतील, याबद्दल फक्त काही (अभ्यासपूर्ण) तर्क करू शकतो.
(३) इंटरनेटमागील तंत्रज्ञान माहीत असो किंवा नसो, त्यामुळे उद्भवणाऱ्या शक्यता आणि संधी या जवळपास प्रत्येक क्षेत्राशी निगडित होत्याच; पण ज्यांनी याला समजून लवकर पाऊल उचलले, तेच या तंत्रज्ञानाला दिशा देण्यात अग्रस्थानी राहिले. हे जितके इंटरनेटबद्दल खरे आहे त्यापेक्षा किती तरी पट ब्लॉकचेनसाठी आहे. कारण या तंत्रज्ञानाचे मूळ हे निव्वळ संगणकशास्त्रात नसून अर्थशास्त्र, बँकिंग, शेती, समाजमाध्यमे, व्यवसाय, बिग-डेटावर आधारित आपले अख्खे डिजिटल युग किंवा अशी कोणतीही आर्थिक/ सामाजिक रचना- जिथली सत्ताशक्ती सध्या मध्यवर्ती किंवा काही निवडक लोकांकडे केंद्रित आहे, अशा जवळपास सर्व क्षेत्रांत काही ना काही प्रमाणात बदल घडवण्याची क्षमता ब्लॉकचेन तंत्रज्ञानात दिसू शकेल.
पण हा बदल आयता होणार नाही. यासाठी दोन स्तरांवर काम होणे गरजेचे आहे; किंवा असे म्हणू या की, या तंत्रज्ञानाचे (आणि आपले) भवितव्य दोन गोष्टींवर अवलंबून आहे.
पहिली गोष्ट, हे तंत्रज्ञान सध्या बाल्यावस्थेत असल्यामुळे त्यामध्ये अद्याप बऱ्याच उणिवा आहेत आणि त्यावर उपाय शोधून काढायला, हे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित करायला विद्यार्थ्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत सगळी मंडळी अविरत काम करतच आहेत. जर समजा असे आढळून आलेच की, काही तांत्रिक उणिवा नाहीच भरून निघत; तर कदाचित या तंत्रज्ञानाचा उपयोग सीमित पद्धतीनेच करता येईल. पण यामुळे ज्या शक्यतांचे स्वप्न आपण पाहायला शिकलोय, त्या शक्यता अस्तित्वात आणायला आणखी काही तरी नवीन तंत्रज्ञान विकसित होऊ शकतेच की!
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे भवितव्य अवलंबून आहे अशी दुसरी गोष्ट म्हणजे- आपण.. सर्व लोक! अनेक क्षेत्रांत कार्यरत असलेले लोक आपापल्या क्षेत्रांमध्ये ब्लॉकचेनमुळे खुल्या होणाऱ्या शक्यतांना किती प्रमाणात समजून घेतात आणि शक्यता दिसल्यास ब्लॉकचेन-आधारित बदल घडवण्यासाठी पुढाकार घेतात का, यावर भवितव्य अवलंबून आहे. हा पुढाकार घेण्यासाठी तांत्रिक माहितीची किंवा ब्लॉकचेनमधील पहिला- दुसरा- तिसरा- ‘ब्लॉक’ बनवतात कसा, हे माहीत असण्याची गरज नाही!
आता, या बदलाचे वाहक किंवा सक्रिय शिलेदार आपण कसे काय होणार, असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल.. कसे आणि का, हे समजून घेण्यासाठी इथेच दर आठवडय़ाला भेटू! इथे आपण पशाच्या इतिहासापासून ते अर्थशास्त्राचे आणि बँकिंगचे काय संबंध आहेत इथपर्यंत, शेतीमधील या तंत्रज्ञानाच्या उपयोगापासून संगणकशास्त्रातील काही मूलभूत संकल्पनांपर्यंत, मध्ययुगीन काळापासून आजपर्यंतच्या डिजिटल पेमेंटपर्यंत, सर्वावर ‘ब्लॉकचेन’ समजून घ्यायच्या अनुषंगाने एक कटाक्ष टाकू या. ‘ब्लॉकचेन’ या शब्दाचा वापर जरी सर्वात आधी २००८ मध्ये झाला असला; तरीही त्याला अस्तित्वात आणणाऱ्या प्रयत्नांचा इतिहास त्यापेक्षा फार जुना आहे, आणि तो समजून घेणे हेदेखील गरजेचे आहे. एकाच लेखात ‘ब्लॉकचेन’ समजावून सांगायच्या घाईऐवजी या ब्लॉकचेनच्या गुणधर्माकडे विविध पद्धतीने येऊ या.
हे तंत्रज्ञान इतर अनेक संकल्पनांवर उभारलेले असल्यामुळे त्यांना समजून घेणे अपरिहार्य आहे. याचसोबत सध्या ब्लॉकचेन कोणत्या क्षेत्रांत बदल घडवत आहे, त्याचाही आढावा घेऊ या. कोणत्या क्षेत्रांत या तंत्रज्ञानाने नव्या शक्यतांना जन्म दिला आहे, त्यासुद्धा पाहूयात. ब्लॉकचेनमुळे कोणत्या क्षेत्रांत काय बदल झाले हे सांगण्याआधी- त्या क्षेत्रांत आजपर्यंत कसे काम होत आले किंवा कसे काम होत आहे, हेसुद्धा समजून घेणे गरजेचे आहेच; म्हणजे ब्लॉकचेनमुळे का आणि कसा फरक पडला किंवा पडू शकतो, हे समजून घेणे सुलभ होईल.
तर.. अशा या ‘ब्लॉकचेन’चा आविष्कार करणाऱ्या व्यक्तीचे नाव- सातोशी नाकोमोटो! पण ही व्यक्ती कोण आहे, हे अजून तरी कोणाला कळलेले नाही. तो/ती एकच व्यक्ती आहे की काही लोकांचा समूह आहे, हेसुद्धा कळायला काही मार्ग नाही. पण या कहाणीमध्ये सातोशी नाकोमोटो ही एकटीच व्यक्ती नायक नसून, त्यांच्याआधी आपला ठसा उमटवून गेलेले (आणि खरी ओळख उघड असलेले) अनेक नायक आहेत; जसे की- नीक झाबो, डेव्हिड चॉम, वाइ डाइ, ‘सायफरपंक’ चळवळीतील अनेक अभ्यासक व कार्यकत्रे आणि आणखी काही मंडळी. या सगळ्यांचे योगदान जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच ब्लॉकचेनच्या आविष्कारानंतरच्या महत्त्वाच्या व्यक्तींबद्दलही जाणून घेऊयात; जसे की विटालिक बुटेरिन- ज्याने वयाच्या १७व्या वर्षी बिटकॉइन समजून घेतले आणि १९व्या वर्षी ‘इथीरीयम’ या अत्यंत यशस्वी ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मचा निर्माता बनला.
सातोशी नाकोमोटोने जो काही विचार केला आहे किंवा प्रणाली बनवली आहे, ती सर्वासमोर जाहीररीत्या मांडली आहे. ही प्रणाली एका काचेपासून बनलेल्या इंजिनप्रमाणे आहे- ज्याची कार्यप्रणाली सगळ्यांना पाहता येते, ज्यामध्ये काहीच गुपित नाही. दुसरे म्हणजे, ही काही साधीसुधी काच नसून सुरक्षाकवच असलेली काच आहे- ज्यामुळे कोणाही व्यक्तीला या इंजिनमध्ये काही हस्तक्षेप करता येणार नाही. याच काचेच्या इंजिनला समजून घेत आपण हे इंजिन कुठे कुठे वापरले जाऊ शकते, हे पुढील काही आठवडय़ांत पाहूयात. हे करतानाच हे इंजिन आपल्या उद्धारासाठी वापरण्याची युक्ती सुचली तर उत्तमच! तिसरे म्हणजे, या पूर्ण लेखात ‘ब्लॉकचेन’ला एक तंत्रज्ञान संबोधले आहे; पण खरे तर ती एक विचारसरणी आहे, एक तत्त्वज्ञान आहे- ज्याचा संबंध प्रत्येकाच्या जीवनाशी कोणत्या ना कोणत्या अर्थाने येणारच आहे. याचमुळे ते प्रत्येकाने समजून घेणे गरजेचेच आहे.
लेखक ब्लॉकचेन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत असून ‘फ्रण्टियर्स इन ब्लॉकचेन’ या संस्थळ-शोधपत्रिकेचे सहायक संपादक आहेत.
ईमेल : gauravsomwanshi@gmail.com