प्रकाश पवार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली नवभारत संकल्पना तसेच त्यावर आधारलेली नवमहाराष्ट्र ही संकल्पना अभ्यासकांसाठी तूर्त धूसरच असली, तरी या संकल्पनांचे परिणाम राजकारणात जाणवू लागलेले आहेत. महाराष्ट्रातील भक्ती चळवळीने घडलेला आणि राज्यातील औद्योगिक प्रगतीचे लाभ घेणारा वर्ग आता ‘आधुनिक महाराष्ट्रा’पेक्षा निराळी- ‘नवमहाराष्ट्रा’ची संकल्पना मान्य करू लागल्याचे दिसते आणि त्याचा फायदा भाजपला मिळतो, असा मुद्दा चर्चेसाठी मांडणारा लेख..
नव्वदीच्या दशकामध्ये आधुनिक महाराष्ट्राच्या जागी नवमहाराष्ट्राच्या राजकारणाची सुरुवात झाली होती. तेव्हा नवमहाराष्ट्राचे राजकारण अडखळत घडत होते. गेल्या पाच वर्षांत नवमहाराष्ट्राचे राजकारण सुस्पष्टपणे घडू लागले. राष्ट्रीय राजकारणातील नवभारत संकल्पनेचा विलक्षण प्रभाव नवमहाराष्ट्रावर पडला. नरेंद्र मोदी हे नवभारत संकल्पनेचे शिल्पकार आहेत. त्यांच्या सावलीत नवमहाराष्ट्राचे राजकारण स्थिरस्थावर झाले. यामुळे आधुनिक महाराष्ट्राची संकल्पना अंधूक झाली. शिवसेनेची आक्रमक हिंदुत्वाची संकल्पना हळूहळू परिघाकडे सरकत गेली. ती जागा नवभारत/नवमहाराष्ट्राच्या धारणेने व्यापली. यामुळे भाजपेतर पक्ष आणि राजकारण यांची कोंडी झाली. त्यांचे राजकारण दुय्यम स्थानावर गेले. अशा पार्श्वभूमीवर ही लोकसभा निवडणूक होत आहे. सोळाव्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे तीव्र मोदी लाट नाही, तसेच तीव्र काँग्रेसविरोध नाही. भाजपविरोधी जनमत आहे; परंतु नवमहाराष्ट्राच्या चौकटीत राजकारण घडते, यांचे आत्मभान भाजपेतर पक्षांना नाही. कारण भाजपने जवळपास सर्व जाती-धर्म-वर्गातील निम्म्या मतदारांच्या मनावर नवमहाराष्ट्राची प्रतिमा बिंबवली आहे.
पक्षनिष्ठांमध्ये बदल
नवमहाराष्ट्राचे राजकारण म्हणजे काय? या प्रश्नाचे साधे उत्तर : पक्षनिष्ठांमध्ये बहुपदरी बदल झाला. भाजप या पक्षाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया घडली. भाजपशी जुळवून घेणे म्हणजे भाजपची मूल्यव्यवस्था व संरचनात्मक आत्मसात करणे, त्यावर निष्ठा ठेवणे. या अर्थाने, राजकारणाचे नवीन रसायन महाराष्ट्रात घडवले. भाजपेतर पक्षांचे मतदार, कार्यकत्रे, नेते सुटेसुटे झाले. त्यामुळे भाजपेतर पक्षांमध्ये पक्षनिष्ठेचा अभाव दिसतो. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारिप, शेकाप अशा पक्षांमध्ये खूपच धरसोड वाढली. भाजपेतर पक्षांतील नेत्यांनी स्वतंत्रपणे जातसदृश संघटन केले होते. त्यांचे विघटन मोठय़ा प्रमाणावर झाले. यामुळे भाजपेतर पक्षांच्या नेत्यांमध्ये ठाम व निश्चित भूमिका नाही. साठ-सत्तर वर्षांमधील सत्ताधारी राज्यकर्ता वर्गच भाजपेतर पक्षांच्या विरोधात गेला (विखे, मोहिते, माने, पाटील, भोसले). तसेच भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांच्या संबंधात केवळ जागावाटपापुरता मर्यादित बदल नाही. तर हा बदल मतदार-कार्यकत्रे यांच्या पातळीवरीलदेखील झाला. शिवसेनेच्या तुलनेत भाजपची मतदार-कार्यकत्रे वळविण्याची क्षमता जास्त आहे. हा महाराष्ट्राच्या राजकारणातील पायाभूत बदल ठरला. विशेषत: मुंबईमध्ये भाजप हा पक्ष अमराठी मतदारांसह मराठी मतदारांची मते मिळवतो. या पार्श्वभूमीवर नव्या राजकारणाचा शिल्पकार नवभक्तगण, नवबुद्धिजीवी हा वर्ग झाला. ते नवमहाराष्ट्राचे नवरसायन आहे. यामुळे राजकारणात आधुनिक महाराष्ट्र (आधुनिक भारत) या संकल्पनांचे रसायन जवळपास कामास येत नाही. नवभक्तगण हा राष्ट्रवाद-हिंदुत्वापेक्षा वेगळा मतदारांचा प्रकार आहे (सत्संग, बैठक, सद्गुरू, रामदासी, साईबाबा, गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, अक्कलकोट महाराज, माता अमृतानंदमयी (अम्मा) मठ, नारायण गढ, कुंभमेळा..). अध्यात्माच्या क्षेत्राखेरीज निवडणूक राजकारणाच्या क्षेत्रावर नवभक्तगणांचा अचंबित करणारा प्रभाव पडतो. शिवाय तो अबोल आणि अदृश्य असतो. वारकरी परंपरेतील भक्तीमध्ये बदल झाला. वारकरी परंपरेतील जवळपास निम्मे भक्तगण बऱ्यापैकी राजकारणाशी जोडले गेले. या तपशिलाचा अर्थ म्हणजे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोन-अडीच लाख मतदार हा नवभक्तगणांतील आहे. आध्यात्मिक परंपरेपासून थोडे दूर असलेले नेते व पक्ष यांच्याविरोधात हे मतदान जाते.
खुल्लेपणाने धार्मिक असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे अकरा टक्के नवभक्तगण हा राजकारणातील निर्णायक ताकद ठरतो. नवभक्तगण या प्रकारच्या मतदारांबद्दल पक्षांचे धोरण निश्चित नाही. याचा सर्वात जास्त फायदा भाजपला मिळतो. त्यानंतर शिवसेना पक्षाला मिळतो. याशिवाय धार्मिक गोष्टीशी जुळवून घेतलेली प्रतिष्ठाने, संस्था आणि वक्ते अशी भलीमोठी साखळी वाडीवस्ती-झोपडपट्टीमध्ये पसरली आहे. यामुळे तळागाळातील मतदार पक्षांशी जोडण्याची नवीन साखळी तयार झाली. भक्तगणांची साखळी मात्र पूर्ण निष्ठेने व ताकदीने काम करते. या गोष्टीमुळे भाजपेतर पक्षांपुढे मोठे आव्हान उभे राहिले.
नवा बुद्धिजीवी वर्ग
नवा बुद्धिजीवी वर्ग हा नवमहाराष्ट्राच्या राजकारणाचा पाया आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी औद्योगिक धोरण या गोष्टीवर भर दिला होता. त्यामुळे त्यांचे संबंध कार्पोरेट क्षेत्रातील अति-उच्च वर्गाशी जोडले गेले होते. या संबंधाची साखळी तुटली आहे. विशेषत: कामगार चळवळीचा ऱ्हास झाल्यानंतर, कार्पोरेट क्षेत्रातील नोकरवर्गात भाजप समर्थक वर्ग प्रचंड वाढला. हा वर्ग नवभारत तसेच नवमहाराष्ट्र संकल्पनेने मंतरलेला आहे. नरेंद्र मोदी नवभारत संकल्पनेचे शिल्पकार आहेत. नीती आयोगामार्फत नवभारत संकल्पना व्यवहारात येते. त्यामुळे नवभारत संकल्पनेशी महाराष्ट्रातील विविध सल्लागार संस्था आणि थिंक टँक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जोडले गेले. या क्षेत्रातील बुद्धिजीवीला आधुनिक भारत व नवभारत संकल्पनेतील फरक अचूकपणे समजतो. त्यामुळे हा नवीन बुद्धिजीवी वर्ग भाजपची लढाई लढतो. नवीन बुद्धिजीवी वर्ग नवउदारमतवादाच्या तर्कशास्त्राने कल्याणकारी राज्यसंस्थेच्या सर्व मुद्दय़ांची चिरफाड करतो. उदा. न्यूनतम आय योजनेची चिकित्सा करतो. बुद्धिजीवी वर्गाच्या खाली नवीन राजकीय कार्यकर्ता वर्ग घडला आहे. नवभारत संकल्पनेमध्ये यांची मुळे दिसतात. नवभारत संकल्पनेवर हा सर्व डोलारा उभा राहिला आहे. त्यामुळे तंत्रज्ञानातील नवीन वर्ग आणि भाजप यांची नाळ जुळलेली दिसते. नवभारत संकल्पना यामुळे आधुनिक भारत संकल्पनेचा सातत्याने प्रतिवाद करते. भाजपने अत्यंत छोटय़ा पातळीवर राजकारण घडविण्याची क्षमता विकसित केली. याबद्दल इतर पक्ष अनुकरण करत आहेत. त्यांना या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेता येईल; परंतु तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील मतदारांशी जुळवून घेता येत नाही. नवभारत संकल्पनेने त्यांच्या मनाचा ताबा घेतला आहे. म्हणून नवभारत संकल्पनेच्या शिल्पकाराला मतदारांची नाडी समजते आहे, असे चित्र दिसते.
जातीच्या राजकीय संबंधांची पुनर्रचना
नवमहाराष्ट्राची जडणघडण याचा अर्थ जातीच्या पदसोपानाची पुनर्रचना होय. मराठा अभिजन महाराष्ट्रात राजकारणाच्या शिखरस्थानी होते. त्यांच्या जागी उच्च जाती आल्या. दुसऱ्या स्थानावर शेतकरी ओबीसी होते. त्या जागी कारागीर ओबीसी आले. त्यानंतर मराठा-शेतकरी ओबीसींचे स्थान राजकारणात कल्पिले गेले. वंचित समूहांचे स्थान तळागाळातील राहिले. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची पडझड सुरू झाली. जुन्या जातीपाती-नातीगोत्यांचे अंडरकरंट जवळपास निकामी झाले. जुनी घराणी सरळसरळ भाजपच्या बाजूने ठामपणे निवडणूक लढविण्यास तयार आहेत. त्यांनी कधी संधिसाधूपणे, तर कधी सुस्पष्टपणे भाजपचा विचार स्वीकारून आधुनिक महाराष्ट्रापासून फारकत घेतली. म्हणून भाजपेतर पक्षांचे शिलेदार भाजपवासी झाले. भाजपवासीयांना नवभक्तगण व नवबुद्धिजीवी वर्गाचा पाठिंबा मिळतो. पक्षांतरित भाजपवासीयांना भाजप, नवभक्तगण व नवबुद्धिजीवी वर्ग हे साधन वाटतात. त्यामुळे भाजपच्या कमळ चिन्हावर घराणी स्वार झाली. लोकसभा निवडणुकीत किरकोळ डागडुजीमुळे भाजपेतर पक्षांना पंधरा-वीस जागा मिळतील; परंतु त्यांना नवमहाराष्ट्राच्या राजकारणाचा पाया बदलता येत नाही. विशेष राष्ट्रवादी काँग्रेसची खरी लढाई रायगड, ठाणे, नाशिक, मावळ, शिरूर, बारामती या पाच मतदारसंघांत आहे. कारण येथे औद्योगिक वसाहती आहेत. रिअल इस्टेटचे जाळे आहे. तंत्रज्ञानाशी संबंधित मतदार आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या धोरणाची ही खरी कसरत आहे. शरद पवार हे पेशाने राजकारणी, परंतु कामगिरीच्या अर्थाने तंत्रज्ञानावर निष्ठा असलेले नेते आहेत. नवभारत संकल्पनेचे शरद पवार हे थेट पुरस्कत्रे नाहीत; परंतु नव्वदीच्या नंतरची त्यांची धोरणे नवभारत संकल्पनेशी सुसंगत होती. तशीच अवस्था नागपूर येथे नितीन गडकरींची आहे. त्यांनी पायाभूत क्षेत्रात प्रचंड काम केले. नवभारत संकल्पनेच्या व्यवहारामध्ये त्यांची प्रतिमा गुंतलेली आहे. राहुल गांधी यांची भूमिका यापेक्षा वेगळी आहे. नवभारत संकल्पनेपासून न्यूनतम आय योजना (न्याय) काँग्रेस पक्षाला वेगळे करते; परंतु आधुनिक भारताचे महाराष्ट्रात समर्थक नाहीत. त्यामुळे वरून खाली आलेली आधुनिक भारताची संकल्पना नेते व कार्यकर्त्यांना समजत नाही. समजली तर ती तळागाळात पोहोचविता येत नाही. यामुळे काँग्रेसदेखील आधुनिक भारत व नवभारत या दोन्ही धोरणांत विभागली गेली. मतदार कंटाळतील व पुन्हा काँग्रेस परिवाराकडे येतील हा जुना सिद्धांत इतिहासजमा झाला. तरीही काँग्रेस परिवाराचा उदरनिर्वाह या जुन्या आशेवर सुरू आहे. मात्र आधुनिक महाराष्ट्राच्या राजकारणाचा ऱ्हास झाला आहे. त्या जागी भाजपचे नवमहाराष्ट्राचे राजकारण स्थिर झाले आहे.
लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत.
prpawar90@gmail.com