जगभरच्या राजकारणात सध्या उजव्या व काहीशा प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीची सरशी होताना दिसत आहे. गेल्या वर्षभरात संघर्षग्रस्त सीरिया, इराक आणि अफगाणिस्तानमधून मोठय़ा प्रमाणात युरोपमध्ये निर्वासितांनी स्थलांतर केले आहे. सर्वच देशांत काही या आगंतुक पाहुण्यांचे मनापासून स्वागत झालेले नाही आणि अनेक देशांत त्यांच्याविरुद्ध जनमत तयार होत आहे. त्याचा स्थानिक राजकारणावरही परिणाम होताना दिसत आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या रविवारी (४ डिसेंबर) इटलीमध्ये राज्यघटनेतील सुधारणांच्या प्रश्नावर जनमत घेतले गेले. तसेच ऑस्ट्रियामध्ये अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान झाले. दोन्ही देशांमध्ये मतदानापूर्वी उजव्या पक्षांची सरशी होईल अशी हवा होती. मात्र दोन्ही ठिकाणी उजव्या पक्षांना पराभव पत्करावा लागला. ही बाब महत्त्वाची आहे. पुढील वर्षी फ्रान्स, जर्मनी आणि नेदरलॅण्ड्समध्येही निवडणुका होत आहेत. इटली आणि ऑस्ट्रियामध्ये उजव्या पक्षांनी बाजी मारली असती तर तेथेही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता होती. ग्रीसमधील अर्थसंकट आणि ब्रिटनचा युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय (ब्रेग्झिट) यांनी ढवळून निघालेला युरोप त्यातून आणखी मोठय़ा वावटळीत सापडला असता. तूर्तास तरी त्याला लगाम बसल्यासारखे भासत आहे..
इटलीत काय घडले?
’इटलीच्या घटनेतील प्रस्तावित सुधारणांनुसार तेथील संसदेचे वरिष्ठ सभागृह, म्हणजे सिनेटच्या अधिकारांत मोठय़ा प्रमाणात कपात करण्यात येणार होती. त्या विषयावर निर्णय घेण्यासाठी सार्वमत घेण्यात आले. इटलीतील साधारण ५१ दशलक्ष उमेदवार या मतदानासाठी पात्र होते.
’पंतप्रधान मात्तिओ रेन्झी यांनी घटनेतील सुधारणांच्या बाजूने तर सर्व विरोधी पक्षांनी ‘फाइव्ह स्टार मूव्हमेंट’च्या नावाने एकत्र येऊन सुधारणांच्या विरोधात पवित्रा घेत प्रचार केला होता. सार्वमतात हार पत्करावी लागली तर पदाचा राजीनामा देण्याचे रेन्झी यांनी जाहीर केले होते.
’गेल्या सोमवारी मतमोजणीचे बहुतांशी कौल हाती आले. घटनेतील सुधारणांच्या विरोधात ५९.५ टक्केनागरिकांनी मतदान केले. त्यानंतर रेन्झी यांनी घोषणा केली की, सार्वमतातील पराभवाची जबाबदारी घेऊन ते पूर्वी जाहीर केल्यानुसार राजीनामा देतील. सोमवारी दुपारनंतर त्यांच्या मंत्रिमंडळाची अखेरची बैठक होईल. त्यानंतर रेन्झी अध्यक्ष सर्जिओ मात्तारेला यांची भेट घेऊन त्यांना आपला राजीनामा सादर करतील. त्यावर अध्यक्ष त्यांचा निर्णय देतील.
’इटलीमध्ये २०१८ साली पुढील निवडणुका प्रस्तावित आहेत. रेन्झी यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर अध्यक्ष २०१८ सालापर्यंत काळजीवाहू सरकारची नेमणूक करण्याची किंवा मुदतपूर्व निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. रेन्झी यांना वगळून त्यांच्या सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाचेच काळजीवाहू सरकार नेमले जाण्याचीही शक्यता आहे. त्या स्थितीत सध्याचे अर्थमंत्री पियर कालरे पदोअन यांची पंतप्रधानपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
’देशाच्या बँकिंग क्षेत्रातही मोठय़ा अडचणी असून तेथेही सुधारणांना बराच वाव आहे. ही परिस्थिती व्यवस्थित हाताळली गेली नाही तर युरोपमध्ये आणखी एका देशात गंभीर राजकीय आणि आर्थिक संकट उभे राहणार आहे.
ऑस्ट्रियातील घडामोडी
’ऑस्ट्रियात गेले वर्षभर अध्यक्षीय निवडणुकीची धामधूम सुरू होती. एप्रिल महिन्यात त्याची प्राथमिक फेरी झाली. गेल्या रविवारी दुसरी फेरी पार पडली. या निवडणुकीत उजव्या विचारांच्या फ्रीडम पार्टीचे तरुण नेते नॉरबर्ट हॉफर आणि ग्रीन पार्टीच्या पाठिंब्याने लढणारे अपक्ष उमेदवार अलेक्झांडर व्ॉन डेर बेलेन यांच्यात प्रामुख्याने लढत होती. पहिल्या फेरीत बेलेन यांना आघाडी मिळाली. मात्र तेथील न्यायालयाने निवडणुकीतील गैरप्रकारांमुळे निवडणूक रद्द ठरवून पुन्हा मतदानाचा आदेश दिला.
’हॉफर यांचा पक्ष परदेशी नागरिकांच्या स्थलांतराच्या विरोधात होता. गेल्या वर्षी संघर्षग्रस्त सीरियातून युरोपमध्ये मोठय़ा प्रमाणात निर्वासितांचे लोंढे आले. त्या प्रश्नावरून युरोपीय देशांचे राजकारण ढवळून निघत आहे. त्या पाश्र्वभूमीवर हॉफर यांच्या पक्षाला मोठा पाठिंबा मिळत होते. ४५ वर्षीय हॉफर एरोनॉटिकल इंजिनीअिरग या विषयातील पदवीधर आहेत.
’गेल्या रविवारी (४ डिसेंबर) अध्यक्षपदासाठी मतदान झाले. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार बेलेन यांना ५३.३ टक्के तर हॉफर यांना ४६.७ टक्के मते मिळाली. त्यानंतर हॉफर यांनी आपला पराभव मान्य करणारा संदेश फेसबुकवरून प्रसारित केला. हॉफर हे विजयी झाल्यास ऑस्ट्रियात दुसऱ्या महायुद्धानंतरचे पहिले उजव्या पक्षाचे सरकार स्थापन झाले असते.
युरोपने नि:श्वास सोडला..
’इटली आणि ऑस्ट्रियातील मतदानाचा युरोपमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या जर्मनी, फ्रान्स आणि नेदरलॅण्ड्सच्या निवडणुकींवरही झाला असता. संपूर्ण युरोपमध्ये उजव्या विचारांची, पर्यायाने टोकाच्या राष्ट्रवादाची, परकीयांविषयी असूयेची आणि युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याची लाट पसरण्याची भीती होती.
’ऑस्ट्रिया हॉफर विजयी झाले असते तर त्यांनी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासाठी (‘ओग्झिट’) प्रक्रिया सुरू केली असे म्हणतात. तूर्तास ती शक्यता मावळली आहे.
’फ्रान्समध्ये पुढील निवडणुकीत समाजवादी विचारसरणीचे विद्यमान अध्यक्ष फ्रान्स्वां ओलांद यांचे उत्तराधिकारी निवडण्यासाठी उजव्या विचारसरणीच्या रिपब्लिकन पक्षाचे फ्रान्स्वां फिलॉन आणि टोकाच्या उजव्या विचारसरणीच्या नॅशनल फ्रंटच्या नेत्या मेरी ल पेन यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. मेरी ल पेन यांनी हॉफर यांना पाठिंबा जाहीर करून विजयासाठी शुभेच्छांचा संदेश पाठवला होता.
’जर्मनी आणि ऑस्ट्रिया यांचे पूर्वापार संबंध आहेत. जर्मन नागरिकांना ऑस्ट्रियाबाबत सांस्कृतिक आणि भावनिक जवळीक वाटते. त्याचा मतदानावरही परिणाम होऊ शकतो.
’मात्र इटली आणि ऑस्ट्रिया या दोन्ही देशांत उजव्या विचारसरणीला लगाम बसल्याने युरोपने तूर्तास नि:श्वास सोडला आहे.
संकलन – सचिन दिवाण