मिलिंद मुरुगकर

संघ-भाजपचा राष्ट्रवाद हा राष्ट्रवादाची रेष मध्ययुगीन इतिहासापर्यंत नेतो. त्यामुळेच हा राष्ट्रवाद कमालीच्या मानसिक असुरक्षिततेत अडकलेला राहतो. संघ-भाजपचा हा राष्ट्रवाद शत्रू देशाबाहेर शोधत नाही, तर भारतीयांमध्येच शोधत असतो. म्हणूनच आपल्याच देशातील लोकांना राष्ट्रविरोधी ठरवले जाणे ही बाब गेल्या काही वर्षांत नित्याची बनत चालली आहे..

राष्ट्रवादामुळे जगभर अनेकदा मोठा अन्याय आणि हिंसा घडली असली आणि  राष्ट्रवाद व देशाचा आर्थिक विकास यांच्यात कोणतेही नाते नसले तरीही राष्ट्रवादाची भावना देशाच्या शत्रूशी लढताना मोठी मानसिक ऊर्जा पुरवते. राष्ट्रवादात ही एक विधायक क्षमता असते.

पण २०१४ सालापासून आपल्यावर प्रभाव गाजवत असलेल्या संघ-भाजपाच्या राष्ट्रवादात कमालीची असुरक्षितता आहे. या राष्ट्रवादाच्या अंतरंगात  थोडेसे खोल डोकावले तर लक्षात येईल की, मानसिक असुरक्षितता  आणि त्याबरोबर येणारी ‘शत्रूकेंद्रितता’ हा या राष्ट्रवादाचा गाभा आहे.

शेतकरी आंदोलनाबद्दल रिहाना या गायिकेने  केलेल्या एका ट्वीटमुळे भारताचे परराष्ट्र मंत्रालय हलले. देशाच्या गृहमंत्र्यांना राष्ट्रीय ऐक्याचा निर्धार देशाला आणि जगाला सांगावा  लागला. गंमत म्हणजे रिहानाने या ट्वीटमध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलेला नव्हता, तर आंदोलनस्थळी सरकारने जी इंटरनेटबंदी केली आहे त्यावर  प्रश्न  उपस्थित केले होते. तिच्या  प्रश्नाला समाधानकारक उत्तर देता येत नाही म्हणून रिहानाचे ट्वीट हे एका परकीय व्यक्तीने भारताच्या अंतर्गत प्रश्नावर केलेले भाष्य आहे  हे  लोकांच्या मनावर ठसवून राष्ट्रवादाचे कार्ड खेळणे गृहमंत्र्यांना भाग होते. पण हे जरी एक कारण असले तरी त्यापेक्षाही एक खोलवरचे कारणदेखील यात आहे. ते असे की, जग काय म्हणेल याबद्दल संघ- भाजपचा हा राष्ट्रवाद सदैव चिंतेत असतो. याचे कारण या राष्ट्रवादाने ‘विश्वगुरू’ असण्याचे ओझे सदैव बाळगले आहे. हे खरे आहे की आपल्या समाजाला हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरा आहे. पण याचा अर्थ असा नाही की सर्व ज्ञान, शहाणपण आणि मूल्ये ही या देशातील लोकांनी आपल्या परंपरेतूनच घेतली पाहिजेत. पण हा राष्ट्रवाद असे मानतो की, भारताने कोणे एकेकाळी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत प्रचंड प्रगती केली होती आणि ती सर्व भौतिक व बौद्धिक समृद्धी परकीय आक्रमणाने नष्ट झाली. आणि असे असल्याने जगाकडून काही शिकण्याचा प्रश्न येतोच कोठे? उलट, आपण विश्वगुरू होतो, आणि असणार आहोत.

पण अशी समज जरी बाळगलेली असली तरी प्रत्यक्षात ज्ञान, विज्ञान आणि भौतिक समृद्धीच्या बाबतीत आपला देश प्रगत देशांच्या मानाने खूप मागे आहे हे सत्य तर नाकारता येत नाही. समज आणि वास्तव यांच्या ताणातून न्यूनगंड आणि आक्रमकता यांचे विचित्र मिश्रण तयार होते. आणि मग आपल्या संवेदनशीलतेचा अतिरेक होतो. ‘कोण ती चिमुरडी रिहाना? विश्वगुरू असलेल्या देशाला लोकशाही, स्वातंत्र्याचे धडे देते म्हणजे काय?’ अशी भावना निर्माण होते. पण ‘विश्वगुरू’चे ओझे बाळगल्याने  जग काय म्हणेल याला नको तितके महत्त्व येते. म्हणूनच रिहानाला जगभर असलेल्या अफाट लोकप्रियतेकडे दुर्लक्षदेखील करता येत नाही. मग राष्ट्रवादाचा आधार घ्यावा लागतो आणि रिहानाचे परकीय असणे ठसवावे लागते.

रिहानाबद्दलच्या सरकारच्या या भूमिकेतील विसंगतीकडे काहींनी लक्ष वेधले आहे. ती विसंगती अशी की, भारताचे पंतप्रधान जर अमेरिकेत  निवडणुकीच्या काळात ‘अगली बार ट्रम्प सरकार’ अशी घोषणा देऊ शकतात, तर रिहानावर आक्षेप घेण्याचा आपल्याला नैतिक अधिकार तरी काय? सरकारला या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे. पण नरेंद्र मोदींच्या ‘अगली बार’च्या घोषणेतदेखील संघ-भाजपच्या राष्ट्रवादातील न्यूनगंडाचे दर्शन होते. आपण जरी विश्वगुरू आहोत असे मानत असलो तरी अमेरिका आपल्यापेक्षा कितीतरी समृद्ध आणि सामर्थ्यवान देश आहे. त्या देशातील नागरिकांची सरासरी मिळकत आपल्यापेक्षा तेहतीस पट जास्त आहे. इतक्या श्रीमंत देशाचा राष्ट्रपती निवडून येण्यासाठी आपल्याकडे अपेक्षेने पाहतो आणि आपल्या देशाच्या त्या देशात स्थायिक झालेल्या   लोकांवर प्रभाव टाकून आपण ते कदाचित साध्यदेखील करू शकतो याची जाणीव मोदींना होती. एका श्रीमंत देशातील राजकारणावर प्रभाव टाकण्याचा मोह त्यांना आवरला नाही. या निवडणुकीत जर ट्रम्प पराभूत झाले तर आपली ही कृती आपल्या देशासाठी कमालीची अहितकारक ठरू शकते याचे भानदेखील त्यांना उरले नाही. आपल्या पंतप्रधानांची ही चूक खरे तर त्यांना   ‘विश्वगुरूवादी’ राष्ट्रवादामुळे आलेली ग्लानी होती.

नेहरू, पटेल, महात्मा गांधी यांचा राष्ट्रवाद हा राष्ट्रवादाची रेष १५ ऑगस्ट १९४७ ला आखतो. ब्रिटिश सत्तेविरुद्धचा लढा या राष्ट्रवादाच्या केंद्रस्थानी होता. मात्र, ब्रिटिशांच्या आगमनामुळे आपल्या देशाला झालेल्या युरोपातील प्रबोधनाच्या मूल्यांचा परिचय आणि लाभदेखील हा राष्ट्रवाद मोकळेपणाने स्वीकारतो. १५ ऑगस्ट १९४७ नंतर भारतात असलेले सर्व नागरिक हे समान दर्जाचे भारतीय आहेत असे हा राष्ट्रवाद मानतो. परंतु संघ- भाजपचा राष्ट्रवाद हा राष्ट्रवादाची रेष मध्ययुगीन इतिहासापर्यंत नेतो. पूर्वी कधीकाळी हा प्रदेश सर्वार्थाने कमालीचा प्रगत होता, परकीय आक्रमणांमुळे या प्रगतीचा ऱ्हास झाला असा समज बाळगणे मग त्यांना शक्य होते. सदैव मध्ययुगीन वा त्याहीपूर्वीच्या इतिहासात रमणे ही या राष्ट्रवादाची मानसिक गरज आहे. पण त्यामुळेच हा राष्ट्रवाद कमालीच्या मानसिक असुरक्षिततेत अडकलेला राहतो. या इतिहासाचे कोणतेही वेगळे आकलन हे त्यांना त्यांच्या राष्ट्रवादाला दिले गेलेले आव्हान वाटते. म्हणून  दलितांची एल्गार परिषद ही त्यांना राष्ट्रविरोधी कृती वाटते.

राष्ट्रवादाच्या कोणत्याही प्रकारात एक प्रकारची शत्रुकेंद्रितता असते. परंतु संघ-भाजपचा राष्ट्रवाद मात्र शत्रू देशाबाहेर शोधत नाही, तर भारतीयांमध्येच शोधत असतो. तो सदैव शत्रूच्या  शोधात असतो. २०१४ नंतर आपल्याच देशातील लोकांना राष्ट्रविरोधी ठरवले जाणे ही नित्याची बाब बनली आहे. आणि एकदा का राष्ट्रवादाचा असा उपयोग करण्याची मोकळीक घेतली की राजकीयदृष्टय़ा अडचणीत आल्यावर राष्ट्रवादाचे  हे हत्यार आपल्या  विरोधकांवर सहजपणे चालविण्याचा मोह होतो. वास्तविक पाहता जेव्हा शेतकरी आंदोलन खलिस्तानवाद्यांशी जोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हाच पंतप्रधानांनी किंवा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी असे आरोप करणाऱ्यांची कानउघाडणी करायला हवी होती. या विषयाची संवेदनशीलता पाहता असे होणे आवश्यक होते. पण तसे घडले नाही. उलट, त्याला प्रोत्साहन दिले गेले. इतके, की देशाच्या राष्ट्रपतींना आणि पंतप्रधानांना राष्ट्रध्वजाचा न घडलेला अपमानदेखील भाषणात बोलून दाखविण्याइतका वेदनादायी वाटला. मानसिक असुरक्षितता हे या राष्ट्रवादाचे व्यवछेदक लक्षण असल्याने या राष्ट्रवादाचा असा वापर अपरिहार्य असतो.

२०१६ सालानंतर ढासळत गेलेली भारतीय  अर्थव्यवस्था करोनानंतर तर आणखीनच वाईट अवस्थेला गेली आहे. तरुणांवर बेकारीचे संकट घोंघावतेय. अशा वेळेस गरज आहे ती सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन चालण्याची. कोण कोठून आला, कधी आला, याची चर्चा करणाऱ्या मध्ययुगीन काळात रमणाऱ्या राष्ट्रवादाची नाही, तर आपण सर्वानी मिळून कोठे जायचे आहे याची काळजी वाहणाऱ्या राष्ट्रवादाची या देशाला कधी नव्हे इतकी आज गरज आहे.

लेखक आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर लेखन करतात.

ईमेल :  milind.murugkar@gmail.com