श्री. मा. भावे
केवळ गीतेचा अभ्यास करण्याचा नव्हे, तर एकूणच प्राचीन तत्त्वज्ञानाचे आकलन कसे करून घ्यावे, याचा आदर्श घालून देणाऱ्या ‘गीतारहस्य’ या लोकमान्य टिळकांच्या ग्रंथाविषयीच्या गतकालीन आठवणींचा हा वेध..
लोकमान्य टिळकांच्या आठवणींचे संग्रहकर्ते सदाशिवराव बापट यांनी आठवणींच्या पहिल्या खंडाची अर्पणपत्रिका अशी लिहिली आहे : ‘सन १८७० ते १९२०, म्हणजे ज्या अर्धशतकाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक आयुष्याचे नवयुग सुरू केले, ज्याने अभिनव कल्पना-विचारांचे स्थित्यंतर घडवून आणले, ज्याने सामाजिक चालीरीतींचे मन्वंतर प्रवर्तित केले व ज्याने महाराष्ट्राच्या अर्वाचीन राजकीय इतिहासास जन्म दिला, त्यास कृतज्ञताभावाने हा ग्रंथगुच्छ अर्पण केला आहे.’ अभूतपूर्व परिवर्तनाने मंडित झालेल्या या अर्धशतकात कमी-अधिक कर्तेपणाने वावरलेल्या व्यक्तींनी सांगितलेल्या आठवणींचे वैशिष्टय़ असे होते की, शेकोटीच्या उबेत बसून मारलेल्या गप्पांची अनौपचारिकता सांभाळूनही त्या काळातील महत्त्वाच्या व गंभीर घडामोडींवर त्या मनोज्ञ व चित्तवेधक प्रकाश टाकतात.
या ५० वर्षांतील शेवटच्या २५ वर्षांत लोकमान्य टिळकांचे कर्तृत्व, कीर्ती व नेतृत्वकौशल्य यांची महाराष्ट्रातील पुढारलेल्या वर्गावर अमीट छाप पडली. नवसुशिक्षितांच्या पहिल्या दोन-तीन पिढय़ांनी ‘आपण स्वातंत्र्याला पात्र आहोत, हे समाजात आमूलाग्र सुधारणा करून सिद्ध करावे,’ हा मंत्र घोकत काळ कंठला होता. या विचारसरणीतील पेच टिळकांनी नेमका ओळखला. त्यांनी सांगितले की, ‘समाजसुधारणेला अंत नाही आणि तिच्या गतीनेच चालावयाचे तर देशस्थिती सुधारण्याचे मनातही आणायला नको (खापर्डे, खंड ३ ची प्रस्तावना).’ हे लखलखीत सत्य लोकांपुढे मांडून त्यांनी समाजातील सुशिक्षितांना स्वराज्यप्राप्तीची ओढ लावली व त्यासाठी कसे प्रयत्न करावेत याचे उदाहरण घालून दिले.
हे उदाहरण घालून देताना टिळकांना अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले. परकी सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा दोनदा खटला भरला व त्यांना तुरुंगात धाडले. पण त्यांना भोगाव्या लागलेल्या या आपत्तींमुळेच त्यांची लोकप्रियता सतत वाढत गेली व ‘लोकमान्यांच्या कडक देशभक्तीची शिकवण अंगी पक्की मुरलेला असा पदवीधरांचा प्रचंड समुदाय थोडय़ाच वर्षांत त्यांच्याभोवती दिसू लागला (तेथेच).’ सरकारविरुद्ध अहिंसक मार्गाने चळवळ उभारल्याने ज्यांना अशा कठोर शिक्षांचे बळी व्हावे लागले, त्यांपैकी टिळक हे पहिलेच म्हणावे लागतील. बरे, शिक्षा भोगून परत आल्यावरही टिळकांचा पराक्रम व हिंमत यात किंचितही उणीव पडलेली दिसून येत नसे!
टिळकांना मिळालेली विलक्षण लोकप्रियता – किंवा खरे तर, भक्ती – टिळकांच्या विरोधकांच्या असूयेचा, तर अनुयायांच्या जिज्ञासायुक्त कौतुकाचा विषय झाली होती. लोकमान्यांनी राष्ट्रासाठी भोगलेले हाल, सोसलेले कारावास आणि मोठमोठय़ा जबाबदाऱ्या (उदा. ताई महाराजांचा खटला) पार पाडताना स्वत:वर ओढवून घेतलेली संकटे ही सर्व निभावून नेण्याचे धैर्य त्यांना कोठून मिळत असेल, याचा अचंबा त्यांना वाटे. टिळकांचे मानसपुत्र जगन्नाथ महाराज यांनी टिळकांना हा प्रश्न स्पष्टपणे विचारला, तेव्हा ते म्हणाले, ‘‘अरे, दु:ख म्हणजे काय? ‘प्रतिकूल संवेदनोत्पाद्कम दु:खम’ असे म्हणतात. पण ज्याने अभ्यासाने व विवेकाने मुळात नि:संवेदित्वच जेथे प्राप्त करून घेतले आहे, तेथे दु:ख कसले? अपेक्षा, आसक्ती व कर्तव्यच्युती यात दु:ख आहे (खंड २, पृ. २६०).’ टिळकांच्या पत्नी टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना दिवंगत झाल्या. टिळकांचे अंतरंगस्नेही अण्णासाहेब नेने यांनी त्या संदर्भात हाच प्रश्न (‘तुम्हाला केवढे दु:ख झाले असेल नाही?’) विचारला होता. तेव्हा टिळक म्हणाले होते, ‘‘अनुकूल संवेदनेने हर्षांतिशय व प्रतिकूल संवेदनेने शोकातिशय असे मला कधीच होत नाही. याचा अर्थ असा नाही की, मी सुखदु:खातीत आहे. पण त्याबरोबर हेही खरे की, गीता व वेदांत यांच्या चिंतनाने विकारांचा क्षय होतो, हा माझा अनुभव आहे (खंड २, पृ. २४७).’
वरच्या ‘आठवणी’त टिळकांनी मी ‘सुखदु:खातीत नाही’ असे सुचवले आहे. यावरून असे वाटेल की, टिळकांची स्थितप्रज्ञता कधी कधी ढळत असे काय? खापर्डेनी याबाबतीत खालील उदाहरण दिले आहे. १९०८ सालच्या खटल्याच्या अखेरीला न्या. दावर यांनी ‘तुम्हाला काही सांगावयाचे आहे काय?’ असा प्रश्न विचारल्यावर टिळकांनी- ‘‘ज्युरीचा निर्णय विरुद्ध असला तरी, मी निरपराध असल्याबद्दल माझे मत कायम आहे. वस्तुमात्राच्या भवितव्याचे नियंत्रण करणारी उच्च सामथ्र्ये आहेत. मी मोकळा राहण्यापेक्षा माझ्या कार्याचा उत्कर्ष माझ्या क्लेशांनी व्हावा अशीच कदाचित ईश्वराची इच्छा असावी,’’ असे आकाशातून विजेचा लोळ जमिनीवर कोसळावा तसे उत्तर दिले, याचे उदाहरण घेतले आहे. ते म्हणतात, ‘न्यायमूर्ती अमुक एक विचारतील असे काही लोकमान्यांनी अपेक्षिलेले नव्हते की असल्या उत्तराची त्यांनी तयारी करून ठेवावी. पण तो प्रश्न येताच अशा प्रकारचे खणखणीत उत्तर त्यांच्या वाणीतून ताडकन् बाहेर आले. याचा अर्थच असा होतो की, मुद्दाम अमुक एका चढणीवर काही वेळपर्यंत आपले मन नेऊन ठेवायची अशी लोकमान्यांची स्थितीच नव्हती. त्यांचे मन नेहमी उंचावरूनच भ्रमत असे (प्रस्तावना, खंड ३).’
बुद्धीची ही साम्यावस्था अभ्यासाने व वैराग्याने प्राप्त होते, असे गीतेतच म्हटले आहे. लोकमान्यांनी गीतेचा अभ्यास वयाच्या सोळाव्या वर्षांपासून चालवला होता. त्यांचे वडील शेवटच्या आजाराने बाधित असताना बळवंतराव त्यांना गीता वाचून दाखवीत, असे टिळकांनीच सांगितले आहे (‘गीतारहस्य’ची प्रस्तावना). विशेष म्हणजे गीता स्वतंत्रपणे न अभ्यासता महाभारताचा भाग म्हणून ते वाचत असत. भारताचार्य चिंतामणराव वैद्य सांगतात की, समग्र महाभारत त्यांनी तीनदा तरी वाचले असावे (खंड १, पृ. ६०). टिळकांची गीतेवर निष्ठा होती. ‘भांबावण्यासारखा प्रसंग प्राप्त झाला की, तात्काळ लोकमान्यांना कोणत्या तरी गीतावचनाची आठवण येत असे आणि त्या वचनाच्या अर्थाला ते आपले मन असे करकचून बांधीत की त्यास (पक्षी : मनास) हलताच येऊ नये (खापर्डे, खंड ३, प्रस्तावना).’
गीतारहस्यात टिळकांना समकालीन तत्त्वचिंतनातील निरनिराळ्या प्रवाहांची दखल घेऊन आपला ‘ज्ञानकर्मसमुच्चया’चा सिद्धांत प्रस्थापित करावयाचा होता. त्यासंबंधी प्रा. लद्दू यांच्याशी बोलताना टिळक म्हणाले होते, ‘‘गीतेचा अर्थ देशकालवर्तमानानुसार मुळास धक्का न लावता केला पाहिजे.. गीता हे सर्व उपनिषदांचे सार आहे, म्हणून त्यावर प्रचलित असलेल्या.. भाष्यांकडे फारसे लक्ष न देता मूळ उपनिषदकारांचा हेतू, गीतेचा हेतू व देशकालवर्तमानानुरूप भासत असलेली जरुरी या सर्वाचा विचार करूनच गीतेचा अर्थ करणे अत्यंत आवश्यक आहे (खंड ३, पृ. १२).’’ त्यामुळे आपल्या ग्रंथात टिळकांना उपयुक्ततावादावर आधारलेले पाश्चात्त्य नीतिशास्त्र, शंकराचार्याचा कर्मसंन्यासवाद, सांख्यांचा द्वैतवाद व त्यात रामानुजाचार्यानी केलेल्या सुधारणा अशा निरनिराळ्या विचारसरणींचा परामर्श घेऊन आपला ज्ञानकर्मसमुच्चयवाद विद्वानांच्या व सामान्य सुशिक्षितांच्या गळी उतरवावयाचा होता. त्यातही काही कळीचे मुद्दे होते. टिळकांचे म्हणणे होते की, गीतेत नुसता ‘योग’ असा उल्लेख असेल तर तो ‘कर्मयोगा’चा संक्षेप म्हणून घ्यावा; जो ज्ञान प्राप्त करून घेऊन सिद्धावस्थेस पोहोचला, त्यानेही लोकसंग्रहासाठी समाजव्यवहारात भाग घ्यावा; हे करताना त्याला दुष्ट माणसांशी झगडा करावा लागेल तर तोही जशास तसे या न्यायाने केला पाहिजे, इत्यादी.
आपण जे करीत आहोत ते परंपरेच्या विरोधात जाणारे आहे, हे टिळकांना पूर्ण माहीत होते. या सर्व मुद्दय़ांचा त्यांनी आपल्या मनाशी व आपल्या भोवतीच्या जाणकार मंडळींशी दीर्घकाल काथ्याकूट केला होता. टिळकांनीच ‘गीतारहस्य’च्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, ‘ज्या विषयाच्या विचारात आज पुष्कळ वर्षे घालविली व ज्याच्या नित्य सहवासाने व चिंतनाने मनाचे समाधान होऊन आनंद होत गेला, तो विषय हातानिराळा होणार म्हणून वाईट वाटते.’ खापर्डेच्या रोजनिशीत ६ जून १९०१ची नोंद आहे की, ‘टिळकांच्या मते गीता हा, अॅरिस्टॉटलच्या ग्रंथाप्रमाणेच, नीतिशास्त्रावरील ग्रंथ आहे (खंड ३, पृ. ५८२). ‘गीतारहस्य’च्या मुखपृष्ठावर ‘द हिंदू फिलॉसॉफी ऑफ लाइफ, एथिक्स अॅण्ड रिलिजन’ अशी घोषणा आहे, तिचे मूळ खापर्डेनी उल्लेखिलेल्या चर्चेत आहे. पुढे शं. वि. फडणीस यांच्याशी ‘गीतारहस्य’ संबंधाने बोलताना लोकमान्य म्हणाले, ‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हे जे मी म्हणतो, ते कार्याकार्यशास्त्रातील आत्मस्वातंत्र्याच्या सिद्धांतातून निष्पन्न होते (खंड २ पृ. ४८६).’’
ग्रंथ लिहिण्याची निकड टिळकांना कितीही वाटली तरी आपले चिंतन पूर्णत्वाला पोहोचले आहे, असे त्यांना वाटत नव्हते व सवडही मिळत नव्हती. टिळकांना मंडालेच्या तुरुंगात सरकारने पाठवले तेव्हा त्यांना फुरसत मिळाली, पण हाताशी संदर्भग्रंथ नव्हते. शेवटी सरकारने त्यांना दरवेळी चार पुस्तके मिळतील अशी व्यवस्था केली व नंतर काही काळाने लागतील तितकी पुस्तके बाळगायला परवानगी दिली. १९१०-११ साली अवघ्या पाच महिन्यांत ग्रंथाचा खर्डा त्यांनी लिहून काढला व त्यात सुधारणा करीत अंतिम मजकूर तयार झाला. तरीही जैन तत्त्वज्ञानाचे ग्रंथ मिळाले नाहीत याची त्यांना हळहळ वाटत राहिली (खंड २, पृ. १७). सरकारने टिळकांना कागद व शाई-टाक मिळू न दिल्याने पुस्तक पेन्सिलीने वहीत लिहावे लागले (खंड २, पृ. ३९-४०). लिखाणाच्या चारही वह्य़ा सरकारने तपासणीसाठी स्वत:कडे ठेवल्या होत्या, त्या काही दिवसांनी टिळकांना मिळाल्या.
ग्रंथ चित्रशाळा छापखान्यात छापायला गेला तेव्हा त्याची किंमत काय ठेवावी हा विचार टिळकांच्या जवळच्या माणसांत होऊ लागला. भगवद्गीतेसारखा विषय व लोकमान्यांसारखा अत्यंत लोकप्रिय नेता लेखक तेव्हा पुस्तकाला भरभक्कम किंमत ठेवावी म्हणजे बराच निधी गोळा होऊन तो पुढल्या चळवळीला वापरता येईल, असा व्यवहारी विचार मंडळींचा होता. त्यावर टिळकांनी उत्तर दिले, ‘‘अगदी सर्वसाधारण प्राप्तीच्या मनुष्यासही गीताग्रंथ वाचावयास मिळावा अशीच इच्छा आहे! वाटल्यास आपण हे माझे ‘धार्मिक वेड’ आहे, असेही खुशाल म्हणा. मी तर बायबल एडिशनप्रमाणे गीतारहस्य बारीक टायपात व पातळ कागदावर छापून आठ आण्यांत देण्याच्या विचारात आहे. आपण म्हणता बाजारभावाची किंमत ठेवून त्यात मिळेल तो पैसा राजकीय कामाकडे मी लावावा. पण कामाकरिता मला पैसा पाहिजे असून तो लोकांनी- महाराष्ट्राने मला दिला नाही असे कधीही झाले नाही. मी मागण्याचाच अवकाश! महाराष्ट्रजनता ही कामधेनू आहे; तो कल्पवृक्ष आहे! (खंड १, पृ. २३३)’’ शेवटी ‘गीतारहस्य’ची किंमत तीन रुपये ठेवण्यात आली. ‘रहस्य’चे लेखन १९११च्या मार्चमध्ये संपत आले असतानाच टिळकांनी सदर ग्रंथाचा परिचय करून देणारे पत्रक ‘मराठा’ व ‘केसरी’ या आपल्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केले होते. त्यामुळे जिज्ञासूंची उत्सुकता तेव्हापासून जागी झाली होती. १९१४ च्या जूनमध्ये टिळक पुण्याला आल्यावर ‘रहस्य’विषयीची चर्चा वाढत चालली व लोकांची आतुरता शिगेला पोहोचली. १९१५च्या जूनमध्ये ग्रंथाच्या प्रती बैलगाडय़ांतून गायकवाडवाडय़ाच्या देवडीवर विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. त्याची जाहिरात आधीपासूनच झाल्यामुळे सकाळपासून वाडय़ापुढे लोकांनी रांगा लावल्या. काहींनी वर्गणी काढून तीन रुपये जमवले व ते रांगेत उभे राहिले. टिळकांनी विकणाऱ्यांना ताकीद दिली होती की, दर गिऱ्हाईकाला फक्त एकच प्रत द्यावयाची. साठेबाजी व काळाबाजार टाळण्यासाठी ही दक्षता! सहा हजार प्रतींची आवृत्ती दोन महिन्यांत खपली व सप्टेंबर १९१५ मध्ये पुनर्मुद्रण करावे लागले.
‘गीतारहस्य’ बाजारात आल्यावर जी खळबळ माजली ती अभूतपूर्व होती. ‘सुमारे आठवडाभर या ग्रंथाची चर्चा पुणे शहरी घरोघरी चालू होती. ज्यांना पहिल्या दिवशी ग्रंथ विकत घेणे जमले, त्यांनी पुस्तक खरेदी केल्याच्या अभिमानाने आपल्या कृत्याचा टेंभा मिरवीत इष्टमित्रांच्या घरी मुद्दाम जाऊन त्यांस तो ग्रंथ दाखविण्याचा सोहळा साजरा केला. त्या दिवशी दुपारी पुस्तक विकत घेणाऱ्यांच्या घरी ते पाहण्याला लोक जमावे व सुचेल तसे त्याचे कौतुक करावे.. रस्त्यात परिचितांची गाठ पडल्यास ‘गीतारहस्य विकत घेतले का?’ असा प्रश्न विचारला जाण्याइतका त्याबद्दल लोकांचा आदर दिसत होता (‘लोकमान्य’, न. र. फाटक, पृ. ३२०).’ आचार्य अत्रेंनीही लिहिले आहे की, त्या वेळच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत असा रिवाज पडला होता की, ‘खाकोटीस गीतारहस्याची प्रत घेऊन रस्त्याने ऐटीत चालत जायचे व कोणी विचारल्यास म्हणायचे, ‘काही नाही. लोकमान्यांना दोन शंका विचारायला चाललो आहे!’ असा ग्रंथोत्सव मराठी वाङ्मयाच्या इतिहासात पहिलाच झाला असेल.
‘गीतारहस्य’ ज्यांना मिळाले होते, त्यांच्यातही सन्मानाची एक उतरंड तयार झाली होती. कोणत्याही समाजात कोणत्या न् कोणत्या मानदंडाने अशी उतरंड तयार होतेच. गंगाधरराव देशपांडेंसारखे जे टिळकांचे निष्ठावान अनुयायी होते, त्यांच्याकडे छापून झालेले फॉम्र्स छापखान्यातूनच पोस्टाने परस्पर धाडले जात. फॉर्म मिळाला की, रात्री गंगाधररावांच्या अध्यक्षतेखाली गोविंदराव याळगी, सोमण, पुंडलिकजी अशांची बैठक भरे. पुंडलिकजी वाचन करीत व वाचलेल्या प्रत्येक शब्दाची चिकित्सा होई. त्याच्या खालची पायरी म्हणजे ज्यांना लोकमान्यांनी स्वत: सही करून प्रत नजर केली अशा मान्यवरांची. विष्णुशास्त्री बापट, भाऊशास्त्री लेले अशांसारखी विद्वान माणसे त्यात मोडतात. तिसरी पायरी, ज्यांनी चिकाटीने रांगेत उभे राहून व तीन रुपये खर्च करून ‘गीतारहस्य’ मिळवले अशांची. पण खरे कौतुक केले पाहिजे ते विनोबांसारख्या व्यासंगी विद्यार्थ्यांचे, की ज्याने ‘गीतारहस्य’ चिकित्सकपणे दोनदा आमूलाग्र वाचून आत्मसात केले.
शंकराचार्याच्या पठडीतील ज्या विद्वानांनी ‘गीतारहस्य’ वाचले, त्यांचे असे स्पष्ट मत होते की, टिळकांनी त्यांची मते कृष्णाच्या तोंडी घातली आहेत! कादंबरीकार ना. सी. फडके यांचे वडील सीतारामपंत म्हणत की, ‘गीतेचे तात्पर्य काढताना टिळकांनी हातचलाखी केली आहे, दांडगाई केली आहे. गीतेच्या आड उभे राहून टिळकांनी हवा तसा निष्कर्ष काढला आहे.’ (‘माझे जीवन- एक कादंबरी’, ना. सी. फडके, पृ. २३) विष्णूशास्त्री बापटांशी बोलताना टिळक म्हणाले, ‘पण गीतेतला प्रवृत्तीमार्गच मला पुढे आणायचा आहे. लोकांना आळशी बनविणारा निवृत्तीमार्ग हल्ली काही कामाचा नाही.. आमच्या मताने आचार्यही कर्मयोगीच आहेत.’ त्यावर विष्णूशास्त्र्यांनी त्यांना परखडपणे सांगितले की, ‘पण आपला हा उद्देश गीतेतील ज्ञानपर श्लोकांची सर्वथा उपेक्षा करून कर्मपर श्लोकांच्या व्याख्यानानेही सिद्ध झाला असता. पण सर्व गीता कर्मपर लावण्यात वेदान्तशास्त्र, संन्यास ऊर्फ ज्ञानमार्ग, स्वत: आचार्याचे तत्त्वज्ञान इ. सर्वाशी विनाकारण विरोध करण्याचा प्रसंग आला आहे.. आपण आचार्याना कर्मयोगी जरी समजत असला, तरी आचार्य आपल्याला कर्मयोगी कधीच म्हणवून घेणार नाहीत (खंड २, पृ. ३९-४०).’
पण तांत्रिक किंवा कठोर टीकांचे थोडेफार ध्वनी उमटले तरी ‘गीतारहस्य’ त्या वेळच्या तरुण पिढीत अतिशय लोकप्रिय झाले आणि त्यातील शिकवण काही न् काही प्रमाणात त्या वेळच्या प्रत्येक सुशिक्षिताच्या वर्तनात उतरली, यात शंका नाही. केवळ गीतेचा अभ्यास करण्याचा नव्हे, तर एकूणच प्राचीन तत्त्वज्ञानाचे आकलन कसे करून घ्यावे याचा आदर्शच टिळकांनी ‘रहस्य’च्या रूपाने लोकांसमोर ठेवला. गोळीबंद विचार कसा असतो व तो नेमक्या शब्दांत कसा मांडता येतो, प्राचीन संस्कृती ही केवळ संग्रहालयातील वस्तू नसून तरुण सुशिक्षितांनी घ्यावीत अशी तत्त्वे व उदाहरणे कशी निवडावीत, याचे मार्गदर्शन ‘रहस्य’तून मिळते. ‘गीतारहस्य’चा आणखी एक विशेष म्हणजे पारंपरिक विचार आधुनिकांना समजावा यासाठी त्यांनी निर्माण केलेले नवे शब्द आणि त्या तत्त्वज्ञानाची केलेली तर्कशुद्ध मांडणी. याचा परिणाम असा झाला की, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान ज्या व्यासपीठावरून भारतीयांनी तपासायचे ते व्यासपीठ तयार झाले.
prof.smbhave@gmail.com