आज देशात आदर्शाचा अभाव असल्याची चर्चा वारंवार ऐकू येते. अशा वातावरणात ‘बोले तैसा चाले’ असं आपल्या व्यवहारातून उदाहरण घालून देणारे नानाजी देशमुख हे एक विरळे व्यक्तिमत्त्व होते. साठाव्या वर्षांनंतर सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही नाकारले व सामाजिक कार्यात झोकून दिले. त्यांची १०१ वी जयंती नुकतीच साजरी झाली. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा वेध घेणारा लेख..
अलीकडच्या काळात नुसतंच ‘चांगलं असणं’ पुरत नाही. चांगलं असण्याबरोबरच चांगलं दिसावंही लागतं. चांगलं दिसण्याचा एक अर्थ जनचर्चेत (पब्लिक डिस्कोर्स) एक स्थान मिळविणं, असाही आहे. पण आपल्याकडे या जनचर्चेला आकार-उकार देणाऱ्यांवरही ‘पोलिटिकल करेक्टनेस’चा एवढा विलक्षण पगडा असतो, की मळलेल्या वाटांनी न जाता वेगळी दृष्टी अंगीकारून आपापल्या क्षेत्रात भरीव, टिकाऊ आणि म्हणून उल्लेखनीय काम करणाऱ्या अनेकांच्या वाटय़ाला उपेक्षाच येत राहते. तीनएक वर्षांपूर्वी विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांची जन्मशताब्दी साजरी झाली आणि गेल्या वर्षी नानाजी देशमुखांची. पण आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर अंगीकृत क्षेत्रात आपापल्या कामाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या दोघांच्याही वाटय़ाला अभिमत निर्मात्यांकडून आली ती उपेक्षा आणि अनुल्लेख!
नानाजी मूळचे मराठवाडय़ातले. परभणी जिल्ह्य़ातील कडोली हे त्यांचं गाव. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या नानाजींचं शिक्षण झालं विदर्भात वाशिमला आणि नंतर राजस्थानात पिलानीच्या बिर्ला महाविद्यालयात. १९३४ मध्येच संघ संस्थापक डॉ. हेडगेवारांनी ज्या १७ स्वयंसेवकांना वाशिममध्ये संघाची प्रतिज्ञा दिली, त्यात नानाजी एक होते. भाऊराव देवरसांच्या प्रेरणेने १९४० मध्ये नानाजी संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून गोरखपूरला गेले आणि पाहता पाहता पूर्व-उत्तर प्रदेशात त्यांनी संघाच्या शाखांचे घट्ट जाळे विणले. याच काळात ‘राष्ट्रधर्म’ मासिकाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आणि ‘सरस्वती शिशुमंदिर’ या नावाने शालेय शिक्षण संस्थांचा जो मोठा विस्तार पुढे झाला, त्यालाही सर्व प्रकारे गती दिली. पुढे नानाजींकडे जनसंघाचे काम आले. त्यानंतर आणीबाणीच्या काळात जो भूमिगत संघर्ष झाला, तेव्हा त्यांचे कर्तृत्व अधिक ठळकपणे समोर आले. अर्धशतकापूर्वी ज्या गैरकाँग्रेसवादाची पायाभरणी झाली, त्याच्या मजबुतीकरणात नानाजींची मोठी भूमिका होती. उत्तर प्रदेशात संविद सरकारची स्थापना, सं.सो.पा. आणि जनसंघाची हातमिळवणी आणि डॉ. राम मनोहर लोहियांकडून गैरकाँग्रेसवादाची पाठराखण या सर्व घटनाक्रमांत नानाजींची मोठी भूमिका होती.
पण हे सर्व महत्त्वाचेच असले, तरी नानाजी देशमुख लक्षात राहतात ते तीन मुख्य कारणांमुळे. साठाव्या वर्षांनंतर सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा त्यांनी पत्करलेला मार्ग व त्यासाठी विनम्रतेने नाकारलेले मंत्रिपद, दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले काम आणि त्या अंतर्गत स्वावलंबी ग्रामजीवनाचे त्यांचे प्रयोग आणि सत्ताकारणातून निवृत्त झाल्यानंतरही प्रवृत्तीवर जीवनदृष्टीतून साकारलेली त्यांच्या प्रतिभेच्या आविष्कारांची असाधारण मालिका!
भल्याभल्यांना राजकारणातून निवृत्त होणे किती अवघड असते, त्याची उदाहरणे तर अगणित आहेत. पण सत्तातंत्राच्या संचलनात पहिल्या रांगेत असतानाच नानाजींनी नुसते मंत्रिपदच नाकारले नाही तर सत्तेच्या राजकारणाकडेच पाठ फिरवली. १९७४ च्या बिहार आंदोलनाच्या काळात नानाजी जयप्रकाश नारायणांच्या निकट सहकाऱ्यांपैकी एक होते. ४ नोव्हेंबर १९७४ ला पाटण्यात एका निदर्शनाच्या प्रसंगात पोलिसांनी आंदोलकांना अक्षरश: झोडपून काढले. त्या लाठीहल्ल्यात जेव्हा जे.पीं.वर प्रहार होणार होता, तेव्हा नानाजी मध्ये पडले आणि लाठीचे वार आपल्या हातांवर झेलून त्यांनी जे.पीं.ना वाचवले. कुशल संघटक म्हणून नानाजींची कीर्ती होतीच, पण १९७७ च्या जनता सरकारच्या काळात ते रणनीतीकार म्हणूनही नावाजले गेले. पण हे सर्व सुरू असतानाच आपल्या जीवनाचे श्रेयस कशात आहे, याचे लख्ख भान नानाजींना होते. त्यामुळेच राष्ट्रपती भवनातून झालेली घोषणा, पंतप्रधानांपासून सर्व सहकाऱ्यांचा आग्रह आणि मिळालेल्या खात्याचे महत्त्व यापैकी कशाचेही दडपण न घेता नानाजींनी मंत्रिपदाकडे पाठ फिरवली! ज्यांनी विलक्षण कौशल्याने अनेकांना सत्तेच्या सोपानावर चढवीत शिखरापर्यंत नेले, त्यांनी तितक्याच सहजतेने स्वत: सिंहासनावरून पायउतार होण्याचे हे उदाहरण खूपच विरळा म्हणायला हवे.
राजकारण सोडल्यानंतर काय करायचे हे नानाजींच्या मनात स्पष्ट होते. गोंडा, बलरामपूर, चित्रकूट आणि महाराष्ट्रात बीडसारख्या मागास भागात त्यांनी खेडय़ांना स्वावलंबी बनविण्यासाठी नवनवे प्रयोग सुरू केले. गोंडा जिल्ह्य़ातल्याच बलरामपूरमधून नानाजी लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी ज्यांचा पराभव केला होता, त्या बलरामपूरच्या महाराणी राजलक्ष्मी यांनीच नानाजींना ५४ एकर जमीन दान केली. जिथे नानाजींनी जय-प्रभा ग्राम निर्माण केले. शिक्षण, प्रतिबंधक उपचारांच्या आधारे आरोग्य, तंटामुक्ती आणि समरसता आणि या सर्वाच्या जोरावर स्वावलंबन हे नानाजींच्या ग्रामविकास कल्पनेचे आधारसूत्र होते. गोंडा जिल्ह्य़ात कूपनलिकांच्या माध्यमातून त्यांनी सिंचनाची व्यापक व्यवस्था केली आणि शेतीपूरक उद्योजकता वाढवून तरुणांच्या बेरोजगारीवर उताराही शोधला. १९९० नंतर चित्रकूट हे त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र बनले. आरोग्यधाम, उद्यमिता विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रांचे जाळे, वनवासी छात्रावास, समाजशिल्पी जोडप्यांना गावातच राहून गावाशी समरस होऊन गावांना तंटामुक्त करत विकासाच्या वाटेने घेऊन जाण्यासाठी सुमारे ८० गावांमध्ये केलेले प्रयोग ही नानाजींच्या समग्र दृष्टीची काही उदाहरणे.
पण नानाजींचे कार्यकर्तृत्व इथेच संपत नाही. त्यांच्या संपर्कशैलीत निरपेक्ष मैत्र निर्माण करण्याची विलक्षण ताकद होती. तिच्या प्रभावापुढे वैचारिक मतभेद आणि कटुता सहजी वितळून जात. मधू लिमये त्यांचे मित्र होते. १९८० मध्ये आपल्या एकुलत्या एक मुलाच्या अकाली निधनाने विद्ध झालेल्या रामनाथ गोएंका यांना दु:ख पचवून पुन्हा सक्रिय होण्याचा मार्ग स्वीकारायला लावणाऱ्यांत नानाजी प्रमुख होते. जे.आर.डी. टाटा, रतन टाटा, बी. जी. वर्गिस, ‘ब्लिट्झ’चे करंजिया, ए.पी.जे. अब्दुल कलाम अशा अनेकांचे प्रेम नानाजींनी संपादन केले, ते आपल्या अकृत्रिम स्नेहाच्या आणि खणखणीत कार्यकर्तृत्वाच्या जोरावर. नानाजींच्या व्यक्तिमत्त्वात एक कलासक्त रसिकही होता. चित्रकूटमध्येच मंदाकिनी नदीच्या तीरावर त्यांच्या प्रेरणेने आणि चित्रकार सुहास बहुलकरांच्या प्रतिभेतून आणि परिश्रमातून साकारलेले ‘रामदर्शन’ हे नानाजींच्या उच्च अभिरुचीची साक्ष आहे.
नानाजींकडे परंपरा आणि आधुनिकता यांच्यात समन्वय साधण्याचे असाधारण कौशल्य होते. खाद्यसुरक्षेबरोबरच पोषणसुरक्षाही त्यांनी महत्त्वाची मानली होती. त्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन दिले होते. त्याच वेळी गोमूत्रातील औषधी द्रव्ये आणि गाईच्या शेणाचा कीटकनाशक म्हणून वा तत्सम उपयोग याबद्दल अशा विषयांची टिंगल-टवाळी न करता संशोधन करण्यावर त्यांनी भर दिला व खूप प्रयोगही केले.
आज देशात आदर्शाचा अभाव असल्याची चर्चा वारंवार ऐकू येते. अशा वातावरणात ‘बोले तैसा चाले’ असं आपल्या व्यवहारातून उदाहरण घालून देणारे नानाजी देशमुख हे एक विरळे व्यक्तिमत्त्व होते. राजकारणात असतानाही त्यांनी विविध विचारसरणींच्या नेत्यांशी मैत्री केली, साधर्म्य शोधले, समन्वय साधला. ग्रामीण स्वावलंबनाच्या विषयात प्रयोग केले, नवी सूत्रे मांडण्याचा प्रयत्न केला आणि हे सर्व करण्यासाठी मजबूत संस्थाबांधणीही केली. ‘अपने लिए नही, अपनों केलिए जियो।’ हा त्यांचा संदेश त्यामुळेच पोकळ उपदेश वाटत नाही.
लेखक राज्यसभेचे सदस्य आहेत.
विनय सहस्रबुद्धे vinays57@gmail.com