रसिका मुळ्ये
परदेशातील खासगी शिक्षणसंस्थांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या क्रमवारीत तर नाहीच, परंतु राष्ट्रीय पातळीवरील क्रमवारीतही राज्य विद्यापीठांपेक्षा अभिमत विद्यापीठांचाच वरचष्मा राहिला. सर्वसाधारण क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वगळता राज्यातील इतर कोणत्याही राज्य विद्यापीठाची आघाडीच्या शंभर संस्थांमध्ये गणती झाली नाही. विद्यापीठांच्या क्रमवारीत मुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला शंभर विद्यापीठांमध्ये स्थान मिळाले. मात्र तेही कसेबसेच म्हणावे लागेल कारण ८१ आणि ८५ क्रमांकावर ही विद्यापीठे आहेत. विद्यार्थिसंख्या, शिक्षकसंख्या अशा सर्व बाबींवर चांगले काम करत असल्याचे दावे करणारी आपली विद्यापीठे मागे कुठे पडली? तर ती प्रतिमा निर्माण करण्यात. आपल्या परीक्षांचे गुणांचे निकष लावायचे झाले तर विश्वासार्हता निर्माण करण्यात राज्य विद्यापीठे नापास झाली आहेत.
निकष आणि विद्यापीठांची कामगिरी
’अध्यापन, अध्ययन आणि स्रोत (टीचिंग, लर्निग अँड रिसोर्सेस) : या निकषांत एकूण विद्यार्थ्यांची संख्या, पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे गुणोत्तर, प्राध्यापकांची गुणवत्ता, पीएचडी झालेल्या प्राध्यापकांची संख्या, त्यांचा अनुभव आणि केला जाणारा खर्च, उत्पन्नाचे स्रोत या बाबींची पाहणी करण्यात आली. या घटकांमध्ये मुंबई आणि औरंगाबाद विद्यापीठाला पन्नासपेक्षाही कमी गुण मिळाले आहेत. पूर्णवेळ नियमित प्राध्यापकांच्या नियुक्त्या न करण्याचा फटका विद्यापीठांना बसला आहे. ‘राज्य विद्यापीठांमधील विद्यार्थिसंख्या जास्त असते, पसारा जास्त असतो त्यामुळे अभिमत किंवा खासगी विद्यापीठांशी खासगी विद्यापीठांशी तुलना करणे योग्य नाही,’ अशी भूमिका आजपर्यंत विद्यापीठे घेत आली. अशा वेळी खरे तर विद्यार्थिसंख्या हा मुद्दा आधिक्याचा असला तरी प्रत्यक्षात गुणांमध्ये विद्यापीठांसाठी वजावटीचाच ठरला आहे.
विद्यापीठे आणि मिळालेले गुण
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – ६९.२६
मुंबई विद्यापीठ – ४३.८७
डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद -४७.०१
******
’संशोधन (रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस)
पुणे विद्यापीठ वगळता याही गटात मुंबई आणि औरंगाबाद विद्यापीठ अनुत्तीर्णच झाले आहेत. प्रसिद्ध झालेले शोधनिबंध, त्यांची गुणवत्ता, त्यांचे वापरण्यात आलेले संदर्भ, पेटंट्स, संशोधनाची समाजाभिमुखता आणि संशोधन ते उत्पादन असा प्रवास या घटकांचा आढावा घेण्यात आला. शेकडोंनी पीएचडी देणारी आपली विद्यापीठे यातही मागे पडली. सातत्याने मिळालेले संशोधन प्रकल्प, त्यासाठीचा निधी या जोरावर पुणे विद्यापीठाने क्रमवारीत वरचे स्थान पटकावल्याचे दिसते. मात्र, पहिल्या शंभरात असूनही या निकषामध्ये मुंबई आणि औरंगाबाद विद्यापीठ हे नापासच झाले आहे. संशोधने होत असल्याच्या कागदोपत्री आकडेवारीच्या पलीकडचा टप्पा विद्यापीठांना गाठता आलेला नाही.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – ४४.२२
मुंबई विद्यापीठ – १७.१०
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद – १०.६६
******
निष्पत्ती (ग्रॅज्युएशन आऊटकम)
पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुढे काय झाले याचा आढावा घेऊन विद्यापीठातील शिक्षणाच्या निष्पत्तीचे मापन या मुद्दय़ात करण्यात आले. किती विद्यार्थ्यांनी पदवी घेतली, निकाल कसा लागला, पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेली नोकरीची किंवा शिक्षणाची संधी, किती विद्यार्थ्यांना बाहेरील विद्यापीठांनी प्रवेश दिला, असे मुद्दे या रकान्यात विचारात घेण्यात आले. या विभागात मात्र तीनही विद्यापीठे सरस आहेत; किंबहुना मुंबई आणि औरंगाबाद विद्यापीठाला अव्वल शंभर विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवून देण्यास हाच मुद्दा हातभार लावणारा ठरला. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण किंवा प्रचलित शब्दांत निकालाची टक्केवारी या विद्यापीठांमध्ये अधिक आहे. तुलनेने पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षण किंवा नोकरीची संधी, स्वत:चा व्यवसाय थाटून पायावर उभे राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सरासरी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – ८६.०४
मुंबई विद्यापीठ – ७९.२९
डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद – ८५.२२
*****
सर्वसमावेशकता (आऊटरीच अँड इनक्लुझिव्हिटी)
विविध सामाजिक, आर्थिक घटकांना विद्यापीठ कसे सामावून घेते याची पाहणी करण्यात आली. विद्यार्थिनींचे प्रमाण, मुलींच्या शिक्षणासाठी विद्यापीठाने राबवलेल्या योजना, दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रमाण, त्यांच्यासाठी देण्यात येणाऱ्या सुविधा या बाबी पाहण्यात आल्या. त्याचबरोबर परदेशी विद्यार्थ्यांची संख्याही पाहण्यात आली. या विभागातही तीनही विद्यापीठांची चांगली कामगिरी दिसत आहे. सर्व घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात यासाठी सुरू करण्यात आलेल्या शासकीय योजनांची अंमलबजावणी विद्यापीठांना या परीक्षेत फायद्याची ठरली आहे. विद्यापीठाच्या परिसरातील ७० ते ८० टक्के इमारतींमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा विद्यापीठांनी केला आहे. तुलनेने विद्यापीठांचे गुण घटले ते परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत. काही प्रमाणात पुणे विद्यापीठाचा अपवाद वगळला तर परदेशी विद्यार्थ्यांचा कल हा खासगी, अभिमत किंवा केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याकडे असल्याचे दिसून येते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – ५४.३४
मुंबई विद्यापीठ – ५०.९२
डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद – ४४.४२
******
विविध घटकांच्या जाणिवा
विद्यापीठाशी संबंधित घटकांना विद्यापीठाबद्दल काय वाटते. विद्यापीठाची प्रतिमा, विश्वासार्हता या मुद्दय़ांचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना काय वाटते, उद्योजक, संशोधनात गुंतवणूक करू इच्छिणारे गुंतवणूकदार यांना काय वाटते, इतर विद्यापीठांच्या तुलनेत असलेले स्थान, इतर विद्यापीठांतील विद्यार्थी प्रवेश घेण्यास उत्सुक असतात का, या गोष्टींची पाहणी करण्यात आली. राज्यातील विद्यापीठांवर विद्यार्थी आणि घटकांचा अजूनही पुरेसा विश्वास नसल्याचे या घटकांतून समोर आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – १६.५५
मुंबई विद्यापीठ – ७.९१
डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद – ४.३३