पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्य़ांमध्ये स्वच्छ भारत मिशनअंतर्गत विविध पातळ्यांवर कामे करण्यात आली आहेत. २०१३ ते २०१७ या चार वर्षांच्या कालावधीत विभागातील २२ लाख ७६ हजार ५३६ (९२.७७ टक्के) कुटुंबांकडे शौचालय सुविधा उपलब्ध असून १ लाख ७७ हजार ३०० कुटुंबांकडे शौचालय सुविधा उपलब्ध नाही. एकूण विभागात स्वतंत्र वैयक्तिक शौचालय सुविधा असणाऱ्या कुटुंबांचे प्रमाण ९२.७७ असून उर्वरित ७.२३ टक्के कुटुंबांकडे अद्याप वैयक्तिक शौचालय सुविधा उपलब्ध नाही. तरीदेखील सोलापूर जिल्हा वगळता पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्य़ांनी पूर्णपणे हागणदारीमुक्त झाल्याचे स्वयंघोषित केले आहे. सोलापूर जिल्ह्य़ातील अकरा तालुक्यांपैकी उत्तर सोलापूर तालुका हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आला असून उर्वरित दहा तालुके मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी विशेष गुड मॉर्निग पथके नेमून बारा हजार अनुदानातून शौचालये बांधण्यात आली आहेत. येत्या डिसेंबपर्यंत पुणे विभाग हागणदारीमुक्त म्हणून जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विभागातील सोलापूर जिल्हा शौचालय बांधणीत सर्वात मागे असून गेल्या सहा महिन्यांत ४० हजार शौचालये बांधण्यात आली आहेत.
सत्तर ठिकाणे हागणदारीमुक्त
अविनाश कवठेकर/ पुणे : स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत महापालिकेने शहरातील सत्तर ठिकाणे हागणदारीमुक्त झाली आहेत. गुडमॉर्निग पथकाचे प्रयत्न आणि लोकसहभागातूनच हे शक्य झाले असून या सत्तर ठिकाणांचे आता लवकरच सुशोभीकरण होणार आहे. दरम्यान, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या गुडमॉर्निग पथकाबरोबरच गुड इव्हनिंग पथकही स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर वैयक्तिक आणि वस्ती पातळीवर मोठय़ा प्रमाणावर शौचालयांची उभारणी करण्यात आल्यामुळे महापालिकेला देशपातळीवरही गौरविण्यात आले आहे.