खगोलशास्त्रात संशोधन म्हटले की काय उपयोग त्याचा अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून येत असते. पण हे संशोधन आपल्याला विश्वाच्या बाबतीत पडलेल्या अनेक ‘का?’चे उत्तर देणारे आहे. इतकेच नव्हे तर या संशोधनाबरोबर विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळेही सर्वसामान्यांना फायदा होत असतो. खगोलशास्त्रीय संशोधनाबाबतच्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा योगेश वाडदेकर यांनी लिहिलेला लेख..
खगोलशास्त्रात विविध अशा १०० शाखांमध्ये संशोधन सुरू आहे. यामध्ये आकाशगंगा, कृष्णविवर, आकाशगंगेची रचना व त्याची उत्पत्ती अशा विविध क्षेत्रांमध्ये तर सातत्यपूर्ण आणि जलदगतीने संशोधने सुरू आहेत. अनेकांना प्रश्न पडत असतो की या संशोधनातून नेमके काय साध्य होत असते. ही संशोधने कशासाठी केली जातात. सामान्यांच्या दृष्टीने हे प्रश्न स्वाभाविकही आहेत. पण या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न फारसा कुणी करताना दिसत नाही.
या संशोधनांमधून आपल्याला आपल्या सृष्टीची रचना समजण्यास मदत होते. यामुळे आपण भविष्यात अनेक गोष्टी साध्य करू शकतो. याचबरोबर आणखी विशेष बाब सांगायची झाली तर या संशोधनांमधून आपल्याला अशा काही गोष्टी मिळाल्या आहेत की ज्याचा वापर आपण रोजच्या जीवनात करून घेत आहोत. जसे की वाय-फाय, याचा वापर आपण आज सर्रासपणे करत आहोत. या वाय फायचे संशोधन हे मुळात खगोलशास्त्रीय संशोधनादरम्यान लागले आहे. याचा शोध हा रेडिओ खगोलशास्त्र संशोधन संस्थेत लावण्यात आला आहे. याशिवाय डिजिटल कॅमेऱ्याचा शोधही खगोलशास्त्रज्ञांनीच लावला आहे. मानवी शरीरातील सूक्ष्म गाठी शोधण्यासाठी सध्या वापरण्यात येणाऱ्या एमआरआयचा शोधही खगोलशास्त्रज्ञांनीच लावला आहे. अतिसूक्ष्म अशा आकाशगंगेचे निरीक्षण करण्यासाठी याचा वापर केला जातो. यामुळे जे संशोधन सुरू आहे त्या संशोधनात थेट काही मिळायला उशीर होत असला तरी त्याबरोबरीने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग हा मानवजातीला होत आहे.
भारताने ज्या वेळी मंगळयान अवकाशात सोडले त्या वेळेस त्याचा उपयोग काय, असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले होते. पण या यानामुळे भारतीय वैज्ञानिकांची शक्ती इस्रोने जगाला दाखवून दिली आहे. यामुळे आपण अमेरिका, युरोप आणि रशिया या मोजक्या देशांच्या यादीत जाऊन बसलो आहोत. जर मंगळयान यशस्वी झाले तर भविष्यात इस्रो आणखी यान मंगळावर पाठवू शकेल आणि मंगळाचा पूर्ण अभ्यास करू शकेल. मंगळयानामुळे भारताच्या वैज्ञानिक संशोधनात मानाचा तुरा खोवला गेला असला तरी देशात खगोलशास्त्र संशोधक हे विद्यार्थी आणि प्राध्यापक मिळून २०० च्या आसपास आहेत. तरीही ही मंडळी या क्षेत्रात खूप मेहनत घेऊन संशोधन करीत आहेत. आपल्या देशात खगोलशास्त्रात खूप संशोधन कार्यक्रम राबविले जात आहेत. यामुळे या क्षेत्रात करिअर करण्यासाठीही तरुणांना खूप चांगली संधी आहे. मूलभूत विज्ञानासारखे खगोलशास्त्राला कोणतेही विशिष्ट ध्येय नाही. अवकाशाप्रमाणेच या क्षेत्रातील संशोधन हे अनंत आहे. यामुळे खगोलशास्त्रज्ञ नेतील त्या दिशेने याचे संशोधन सुरू राहणार असून भविष्यात आपल्याला यामुळे खूप काही शोधता येणार आहे आणि सृष्टीबद्दलचे आपले कुतूहल क्षमविण्यास मदत होणार आहे.
(लेखक टाटा मूलभूत विज्ञान संशोधन संस्थेच्या रेडिओ खगोलभौतिक राष्ट्रीय केंद्रात प्राध्यापक आहेत.)

Story img Loader