अटलबिहारी वाजपेयी यांचे आंतरराष्ट्रीय मंचावरील मुत्सद्देगिरीतही योगदानही महत्त्वाचे आहे. पाकिस्तान आणि चीन या युद्धखोर शेजाऱ्यांशी संबंध सुधारण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, पोखरण येथे दुसऱ्या अणुस्फोटानंतर भारतावर निर्बंध लादणाऱ्या अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांबरोबरील संबंध पुन्हा विश्वासाच्या किमान पातळीवर आणण्यासाठी केलेली धडपड, सोव्हिएत युनियनच्या पडझडीनंतर पूर्वेकडील देशांशी संबंध सुधारण्यासाठी केलेल्या हालचाली यातून त्यांच्यातील मुत्सद्देगिरीत झलक दिसते.
* संसदेत विरोधी बाकांवर तरुण वाजपेयींच्या अंगभूत क्षमता पारखून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एका परदेशी राजनीतीज्ञाशी ओळख करून देताना वाजपेयींबद्दल म्हटले होते की, हा तरुण एक दिवस भारताचा पंतप्रधान होईल.
* नेहरूंकडून झालेल्या या कौतुकाने मोहरून न जाता वाजपेयी यांनी १९६२ साली चीनच्या आक्रमणानंतर संसदेत नेहरू सरकारवर टीका केली होती. त्यावेळी ते संसदेत गरजले होते, ‘भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती होणार नाही आणि जी पातके आपण करून ठेवली आहेत त्यांचे पुनरुज्जीवन होणार नाही याची सरकार काय खात्री देऊ शकते? आपल्यावर पराभवाचा आणि मानहानीचा जो कलंक लागला आहे तो चिनी सैन्याला देशाच्या भूमीवरून हटवल्याशिवाय पुसला जाणार नाही
* चीनबरोबरील १९६२च्या युद्धात पराभव पत्करावा लागूनही आणि सीमावाद मिटलेला नसतानाही चीनशी वाटाघाटी सुरू ठेवणे हा परराष्ट्र नीतीतील एक पर्याय नसून ती भारताची सामरिक किंवा व्यूहात्मक गरज आहे, ही बाब वाजपेयींनी द्रष्टेपणाने ओळखली होती. चीनशी संबंधात त्यांनी कधीही भारताच्या हितसंबंधांना बाधा पोहोचू दिली नाही आणि चीनसमोर बरोबरीच्या नात्याने उभे राहून वाटाघाटी केल्या. उभय देशांमध्ये वाटाघाटींसाठी त्यांनी जी संस्थात्मक संरचना निर्माण केली ती आजही उत्तमरीत्या काम करते आहे.
* १९७७ साली सत्तेवर आलेल्या मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते. त्यांनी १२ ते १८ फेब्रुवारी १९७९ दरम्यान चीनचा दौरा केला. त्यात त्यांनी चीनचे तत्कालीन पंतप्रधान हुआ गुओफेंग, उपपंतप्रधान डेंग झियाओपिंग (हे नंतर चीनचे अध्यक्ष झाले) आणि परराष्ट्रमंत्री हुआंग हुआ यांच्याशी चर्चा केली. चीन-पाकिस्तान संबंधांवर भारताचा आक्षेप नाही. पण त्याने भारताच्या हितसंबंधांना बाधा येता कामा नये, असे स्पष्ट करतानाच काश्मीरविषयक चीनच्या बदलत्या भूमिकेवर त्यांनी आक्षेप घेतला. तसेच कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबत वाटाघाटी केल्या.
* चीन दौरा सुरू असतानाच १७ फेब्रुवारी रोजी चीनने व्हिएतनामवर हल्ला केल्याचे वृत्त मिळताच वाजपेयी चीन दौरा अर्धवट सोडून भारतात परतले. वाजपेयींनी २१ फेब्रुवारी १९७९ रोजी संसदेत केलेल्या भाषणात चीनच्या व्हिएतनामवरील आक्रमणाचा धिक्कार करून व्हिएतनामला पाठिंबा दर्शवला.
* त्यानंतर २२ ते २७ जून २००३ दरम्यान पंतप्रधान या नात्याने वाजपेयींनी चीनचा दौरा केला. त्याच दौऱ्यात प्रसृत करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देश एकमेकांसाठी धोका नसल्याचे मान्य करून सहकार्याची भूमिका घेतली गेली. दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे विशेष प्रतिनिधी (स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह) नेमून त्या पातळीवर चर्चेची व्यवस्था निर्माण केली. ही व्यवस्था आजही काम करते आहे.
* मोरारजी देसाई सरकारचे परराष्ट्रमंत्री म्हणून १९७७ साली न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ३२व्या अधिवेशनात वाजपेयी यांनी अस्खलित हिंदीतून भाषण केले.
* केंद्रात वाजपेयी यांचे सरकार असताना भारताने राजस्थानमधील पोखरण येथे ११ आणि १३ मे १९९८ रोजी दुसऱ्यांदा अणुचाचण्या घेतल्या. त्यावेळी जागतिक स्तरावर सर्वंकष अणुचाचणी बंदी करारासंबंधी (कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बॅन ट्रिटी-सीटीबीटी) चर्चा जोरात सुरू होती. भारताला या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी भरीस पाडले जात होते. अशा वेळी त्या करारावर स्वाक्षरी करण्यास ठामपणे नकार देत वाजपेयींनी अणुचाचण्या घेतल्या.
* पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी यांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये थेट लाहोरची बस यात्रा केली. पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी केलेल्या सहकार्याच्या कराराची शाई वाळण्याच्या आत पाकिस्तानने कारगिल येथे घुसखोरी केली. कारगिल युद्धात वाजपेयींनी सैन्याला जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा ओलांडून हल्ले करण्यास मनाई केली. त्याने सैन्याला अडचणीच्या परिस्थितीत लढावे लागले. मात्र त्या निर्णयाने भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यास मदत केली.