मोदी सरकार आल्यानंतर मुरली मनोहर जोशी व लालकृष्ण अडवाणी हे मार्गदर्शक मंडळाच्या रूपाने अडगळीत पडले आहेत, पण एक काळ असा होता, की वाजपेयी, मुरली मनोहर जोशी व लालकृष्ण अडवाणी या त्रिकुटाशिवाय पक्षाचे पान हलत नव्हते. हे तीनही नेते वेगवेगळय़ा मार्गाने राजकारणात आले. काँग्रेसला पर्याय म्हणून त्यांनी भाजपची बांधणी केली. सुरुवातीला भाजपने लोकसभेत दोन खासदारांपासून सुरुवात केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकारण पुढे नेणारे वाजपेयी व अडवाणी यांची एकेकाळी खूप चर्चा होती. त्या वेळी मुरली मनोहर जोशी यांचे नाव त्या दोघांमध्ये येऊ दिले जात नव्हते. मुरली मनोहर यांना दुर्लक्षित केले जात होते. त्यावर एका वृत्तवाहिनीने अटलबिहारी वाजपेयी यांना असा प्रश्न केला, की मुरली मनोहर जोशींना तुमच्यामध्ये का येऊ देत नाही. त्यावर ते म्हणाले, की दोन नावे असली तरच घोषणा व्यवस्थित देता येतात, त्यामुळे जोशींचे नाव घेतले नाही. ते आमच्या त्रिमूर्तीत आहेतच. त्यावर अँकर म्हणाला, की त्रिमूर्ती बनली आहे तर मग.. त्यावर हसून अटलजी म्हणाले, की त्रिमूर्ती तुम्ही प्रसारमाध्यमांनी बनवली आहे. त्या वेळी एक घोषणा अशी होती, की बीजेपी की तीन धरोहर- अटल, अडवाणी, मुरली मनोहर..
राजकारणात प्रवेश
अटलबिहारी वाजपेयी हे त्यांच्या पक्षात जेवढे लोकप्रिय होते तेवढेच ते विरोधकांचेही आवडते नेते होते. ते अजातशत्रू होते. त्यांची लोकप्रियता फार अफाट होती. राजकारणात येण्यापूर्वी वाजपेयी पत्रकार होते. पण ते पत्रकारिता सोडून राजकारणात कसे आले याचीही एक हकिकत आहे. त्याला कारण ठरलेली ही घटना, त्यांनी पत्रकार तलवीन सिंह यांनी घेतलेल्या मुलाखतीत सांगितली होती. त्या वेळी वाजपेयी दिल्लीत पत्रकार म्हणून काम करत होते. ते वर्ष होते १९५३. भारतीय जनसंघाचे नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे काश्मीरला विशेष दर्जा देण्याच्या विरोधात होते. जम्मू काश्मीरमध्ये जाण्यासाठी परवाना पद्धती लागू करण्यास मुखर्जीचा विरोध होता. त्या घटनेचे वार्ताकन करण्यासाठी वाजपेयी त्यांच्याबरोबर होते. परवाना राज तोडून मुखर्जी काश्मीरमध्ये गेले त्या वेळी वाजपेयीही बरोबर होतेच. मुखर्जी यांना अटक झाली. वाजपेयी परत आले. त्या वेळी मुखर्जी यांनी वाजपेयींना सांगितले होते, की तुम्ही परत जा आणि सांगा, मी परवानगी न घेता काश्मीरमध्ये आलो आहे. त्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा नजरकैदेत असताना सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला, या घटनेने वाजपेयी दु:खी झाले. त्या वेळी मुखर्जी यांचे काम आपण पुढे नेले पाहिजे म्हणून वाजपेयी राजकारणात आले.