|| वैद्य संजय खेडेकर
‘आयुर्वेद हे शास्त्र आहे?’ हा लेख याच पानावर ७ जून रोजी प्रसिद्ध झाला होता. त्या लेखात आयुर्वेदावर केलेल्या आरोपांचा प्रतिवाद करणारा हा पत्रलेख..
‘आयुर्वेद हे शास्त्र आहे?’ हा डॉ. अनिलकुमार भाटे यांचा लेख वाचनात आला. उपरोक्त लेखात एकतृतीयांश वैयक्तिक माहिती आणि तंत्रविद्योतील स्वयंसिद्धता याबद्दल वर्णन आहे. उर्वरित लेखात आयुर्वेद हे कसे अवैज्ञानिक आहे याचा एका वाक्यात निष्कर्ष लेखकाने काढला आहे. लेखातील आरोपांचा ऊहापोह करू यात.
आयुर्वेदाची सुरुवात केव्हा झाली ते कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. मात्र लिखित स्वरूपात तो तीन हजार वर्षांपासून उपलब्ध आहे. वारंवार प्रयोग व प्रमाद या पद्धतीने या शास्त्राचा उदय आणि विकास झाला याबद्दल कुठल्याही वैज्ञानिकांच्या मनात शंका नसावी. आयुर्वेद आजपर्यंत केवळ टिकलेच नाही तर कालानुरूप समृद्ध झाले. सदर लेखक स्वतस थोर संशोधक समजतात. परंतु संशोधनाचे काही नियम आहेत, त्यांचे पालन करावयास हवे होते, मात्र उपरोक्त लेखात तसे जाणवत नाही. मुळात लेखकाने विषयच अवाढव्य निवडला. वेद, आयुर्वेद, योगतंत्र. वेदांचे एक बरे आहे, ते चारच आहेत. आणि त्याचा ऊहापोह करणारे ब्राह्मणक, आरण्यक, उपनिषद, पुराण इ.देखील सीमित आहेत. त्या वेदांचे चार उपवेद मानले आहेत, त्यांपकी अथर्ववेदाचा उपवेद आयुर्वेद. या वेदांचा अभ्यास करण्यासाठीदेखील अनेक दर्शनशास्त्रे आहेत. काही प्रकाशित आहेत, उर्वरित हस्तलिखित आहेत. राहिला आयुर्वेदाचा प्रश्न, अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत आणि त्याहून कित्येक अप्रकाशित आहेत. योग आणखी वेगळा विषय, याचे वर्णन तीन हजार वर्षांपासून विस्कळीत स्वरूपात वेद, उपनिषद, आयुर्वेद, जैन दर्शन, बौद्ध दर्शन, उत्तर वेदांत यात मिळते. हठयोग प्रदीपिका, घेरंड संहिता या दहाव्या ते तेराव्या शतकातील आहेत. मात्र योगाची मुख्य मुळे उपनिषदात मिळतात.
तंत्र : याबद्दल केवळ बोलणेदेखील अवघड आहे. विचार आणि तर्क त्यापुढील अवस्था असाव्यात. त्याला कारणही तसे अगम्यच आहे, आणि हा विषय आयुर्वेदातील रसशास्त्राशी संबंधित आहे. भारताच्या आध्यात्मिक दोन प्रमुख स्रोतांपकी एक शैव संप्रदाय. त्यात अनेक उपसंप्रदाय उदाहरणार्थ कौल, अकौल, नाथ, कापालिक, अवघड, शाक्त, सिद्ध, योगी इ. लेखकांचा काश्मिरी शैविझम कौल या उपसंप्रदायाचा काश्मीर प्रदेश संबंधित एक प्रवाहमार्ग आहे. असे कौलमार्ग वंगभूमी, सिंहभूमी, नेपालदेश, त्रिविष्टपदेश, दक्षिण देश इ.प्रमाणे भिन्न आहेत. तंत्र उपासना ही एका विशेष धर्माशी निगडित नसून ती मनुष्यविकासाशी असल्याने धार्मिक बंधन, देशबंधन, सिंधुबंधन ओलांडून ती सर्व प्रदेशमय झाली असावी. इतकेच नव्हे तर इतर धर्मातही तंत्र साधना वेगवेगळ्या स्वरूपात वर्णन आहेच. या संप्रदाय उपसंप्रदायात तंत्र संबंध अनेक लिखित ग्रंथ लिहिले गेले. डामरतंत्र, शाबरतंत्र, शरभतंत्र, भरवतंत्र, रुद्रयामलतंत्र, नागार्जुन तंत्र इ. याच तंत्रविद्य्ोच्या पुढील अवस्थेत पारद (शिव) व गंधक (पार्वती) यांना प्रमाण मानून रसतंत्र या तंत्राचे निर्माण झाले. त्यातही आयुर्वेद सिद्धान्तचा मुक्त संचार आढळतो. पुढे जाऊन याच रसतंत्राचे औषधी उपयोग अधिक असल्याने, रसशास्त्र या पूर्ण भिन्न चिकित्साशास्त्र उदयास आले. मात्र सिद्धान्त साधम्र्यामुळे कालौघात आयुर्वेदाचे अभिन्न अंग बनले. या रसतंत्र आणि रसशास्त्राची हजारोंच्या संख्येने ग्रंथसंपदा उपलब्ध आहे.
लेखकाचा असा आरोप आहे की, आयुर्वेद व वेद, वेदांगे यांचा काही संबंध नाही. मुळात ज्या शास्त्राशी आपला काही संबंध नाही त्याबद्दल अधिकारवाणीने बोलू नये हा समाजशास्त्राचा सामान्य नियम आहे, अन्यथा त्रास होतोच. आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद मानला जातो, कारण आरोग्य रक्षणासाठी आवश्यक काही उपाययोजनाचे वर्णन त्यात इतर वेदांपेक्षा सर्वाधिक प्रमाणात आले आहे. एवढेच. आयुर्वेदातही आठ उपशाखा आहेत. त्यात शारीरिकव्यतिरिक्त आत्मा, मन, अध्यात्म, योग इ.चेही अल्प प्रमाणात वर्णन आहे. परंतु शारीरशास्त्र हा मुख्य विषय आहे. अथर्ववेदाचा आणि आयुर्वेदाचा काही संबंध नाही असा तुमचा आक्षेप आहे. वैज्ञानिक दृष्टीने तुम्हाला लिंक देतो आहे https://www.ncbi.nlm.nih.gov/m/pubmed/15303286/ हे नामांकित वैज्ञानिक जर्नल आहेत. एक दृष्टिक्षेप जरूर टाकावा.
लेखकाचा दुसरा आरोप आहे की, आयुर्वेद व तंत्रविद्येचा काही संबंध नाही. तंत्रविद्येत शरीराचे वर्णन करताना पाच कोशांचे वर्णन केलेले आहे. कदाचित तुम्हाला माहीतही असतील. १. अन्नमय कोश २. प्राणमय कोश. ३. मनोमय कोश. ४. विज्ञानमय कोश. ५. आनंदमय कोश.
यातील अन्नमय कोशासंदर्भात वर्णन करताना असे सांगितले आहे की, शरीर हे पांचभौतिक आहे. आयुर्वेद शरीर, त्यातील दोष धातू इ. सर्वच पांचभौतिक मानते.
दुसरे प्राणमय कोश, यात वायूचे पाच प्रकार सांगितले आहेत, प्राण, उदान, समान, व्यान, अपान. आणि या वायूवर नियंत्रण वर्णन आहे. आयुर्वेदातही हेच वर्णन आहे. आयुर्वेद आणि योगसंबंध. योगदेखील वायूंचे नियंत्रणच सांगतो. यम, नियम, प्राणायाम, आसन सांगताना आयुर्वेदोक्त शारीर आणि त्याच्या सिद्धान्त दृष्टीनेच वर्णन केले आहे.
लेखकाच्या आकलनक्षमतेस दाद दिलीच पाहिजे. त्यांना वेद, आयुर्वेद, योग, तंत्रविद्या, दर्शन इ. इ. त्यांच्या शाखा, उपशाखा यांचे सर्वाचे ज्ञान एकाच वेळी झाले आणि त्यांनी निष्कर्षही काढला की, आयुर्वेद व इतरांचा काही संबंध नाही, आयुर्वेद सिद्धान्त अवैज्ञानिक आहेत. इथे केवळ आयुर्वेदाचे सर्व ग्रंथही एका जन्मात एकदाही पूर्ण वाचणे आमच्यासारख्या अल्पमती व्यक्तींना शक्य होत नाही. परंतु लेखकाच्या दाव्यानुसार त्यांचा शक्तिपात झाल्यामुळेच हे दिव्य कार्य त्यांनी केले असेल. भारतीय शास्त्रे ही एकमेकांशी निगडित आहेतच; परंतु त्यांचे विषय भिन्न असल्याने रचनाही भिन्न आहेत. तरी, काही सर्व समावेशक सिद्धांत सर्वत्र समान आहेत. उदा. पांचभौतिक, प्रकृती पुरुष (तंत्रविद्य्ोतही आहे बरं का).
लेखकाने धाडसी विधान केले आहे की, जे मोजता किंवा मापता येत नाही, त्यास विज्ञान संबोधले जात नाही. यासाठी त्यांनी वात, पित्त, कफाचे उदाहरण दिले व त्यांच्या म्हणण्यानुसार, म्हणून ते विज्ञान नाही. अनेक वैज्ञानिकांच्या मतानुसार विज्ञानात सर्वच गोष्टी मोजल्या किंवा मापता येत नाहीत. आणि एखादी संकल्पना वैज्ञानिक आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी उपरोक्त एकच मापदंडही नाही. उदा. Clearly defined terminology, highly controlled conditions, reproducibility predictability, testability, quantifiability इ. वैज्ञानिक मतानुसार प्रत्येक वैज्ञानिक संकल्पनेने सर्वच मापदंड पूर्ण करावे असे काही नाही. हा साधा नियम लेखकासारखा थोर संशोधक विसरला हे आश्चर्य आहे.
आता राहिला प्रश्न आयुर्वेदाच्या वैज्ञानिकतेचा. आयुर्वेदाच्याच सुश्रुताचार्याना father of surgery म्हटले जाते. लेखक म्हणतात त्यानुसार आयुर्वेदातील औषधी वैज्ञानिक आहे आणि सिद्धान्त अवैज्ञानिक आहेत. म्हणजे हे चांगले आहे? लेखकाने ‘आयुर्वेदाचे सिद्धान्त अवैज्ञानिक आहेत’ असे सप्रमाण आणि प्रयोगाद्वारे सिद्ध करून दाखवावे, कदाचित आम्हाला ते योग्य वाटले तर तेही मान्य करू! लेखक उर्वरित आयुष्यात ‘बस्ति आंत्रामध्ये (intestine) दिल्याने मस्तिष्कगत विकार (neurological disorders) कसे ठीक होतात’, हे जरी आयुर्वेद सिद्धान्ताचा आधार न घेता सिद्ध करू शकले तरी आम्हाला परमानंद होईल.
आजही आधुनिक विज्ञानाला अनेक शारीरिक अवस्था आणि क्रिया अनाकलनीय आहेत, हे ते स्वत मान्य करतात. उदा. Humorol antibody IYF¹F AFWZ, auto immune disorders काय आहे. याचा अर्थ असा होत नाही की, आधुनिक विज्ञान चुकीचे आहे, परंतु परिपूर्ण नाही.
आम्हीही असा दावा करत नाही की, आयुर्वेद परिपूर्ण आहे. आम्हाला आमच्या मर्यादा माहीत आहेत. कुणी कितीही आक्रोश केला तरीही आजच्या आधुनिक चिकित्साशास्त्राचे मूळ वैश्विक पारंपरिक चिकित्सा (भारतीय उपखंड- आयुर्वेद) पद्धती याच आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञानाने याच पारंपरिक चिकित्सा पद्धती समृद्ध करून आधुनिक चिकित्सा विज्ञान जन्माला घातले आहे. तिच्यामुळे माणसाचे आयुर्मान निश्चित वाढले आहे. मात्र प्रमाण आणि गुणवत्ता यात फरक नेहमी असतोच. याउलट सर्व भारतीय उपखंडातील नागरिकांना अभिमान असावा एवढी उन्नत आणि कालानुरूप समृद्ध झालेली, सर्वात अधिक पारंपरिक चिकित्सा पद्धती ही आयुर्वेद आहे, जी भारतीय संस्कृतीची विश्वासार्ह देणगी आहे. आयुर्वेदात चुका असू शकतात, तुम्ही शोधा, आम्ही शोधतोच आहोत, कालबाह्य़ झालेल्या सोडून देऊ, प्रथम सिद्ध करा. म्हणून काही, सिद्धान्तच चुकीचे आहेत असा याचा अर्थ होत नाही.
sanjaykhedekar1982@gmail.com