खरे तर आपण ज्याला नागरीकरण म्हणतो ते नागरीकरण आहे का, असे कुणी विचारले, तर मी एका वाक्यात सांगेन, की आज शहरे सुजताहेत. सुजणे आणि निकोप वाढणे यात जेवढे अंतर आहे, ते आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या नागरीकरणामधील खरे अंतर आहे. एका बाजूला प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही खेडी ओस पडताहेत आणि शहरे सुजताहेत. नेहमी असे म्हटले जाते की, उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय बरा. नागरीकरणातील जीवन सुसह्य़ होण्याबद्दल अनेक उपाय सुचविले जातील. मी सगळ्यात चांगला उपाय मानतो तो म्हणजे शहरात लोकांचे लोंढे येताहेत, ते थांबवायचे असतील तर आपल्याला ग्रामीण भागाच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. जेव्हा ग्रामीण भागातील साधनसंपत्ती आपण शहरांकडे आणतो. त्या वेळी गावातील शेती जिरायत होते, बेकारी आणखी वाढते आणि लोंढे आणखी वाढताहेत. अशा एका दुष्टचक्रामध्ये आज आपण खऱ्या अर्थाने सापडलोय. आज शहरांची निकोप वाढ करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. शहरांची निकोप वाढ करायची असेल तर सर्वप्रथम राजकीय निर्णयातील व प्रशासनातील दोष दूर करावे लागतील. नाशिकच्या विकासाचा आराखडा तयार करताना बिल्डरांच्या जमिनी सोडल्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनी तेवढय़ा अडकविल्या. मुख्यमंत्र्यांनी व आम्ही ही सारी माहिती घेतली त्या वेळी त्यात हे तथ्य आढळून आले. म्हणजे आमच्या नियोजनकारांनी बिल्डरांच्या जमिनी वाचविणारा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या तरी चालतील, असा आराखडा तयार केला. सगळ्याच राजकीय पक्षांनी त्याला विरोध केल्यामुळे त्या आराखडय़ाला स्थगिती देण्यात आली. ग्रामीण भागात एकत्र राहण्याची परंपरा होती, सगळी माणसे ओळखीची वाटत होती, ग्रामीण भागातली जुनी संस्कृती जपत गावे जगत होती. आज शहरी भाग वाढल्यानंतर ओळखीचा चेहरा हरवलाय. ग्रामीण संस्कृती आणि शहरी संस्कृती एकत्र आल्यानंतर अर्धनागरी संस्कृतीमध्ये बदल झालेले दिसतात, त्याची नोंद घेण्याची गरज आहे. एक शहरी भाग आहे, दुसरा अर्धशहरी भाग आहे आणि तिसरा ग्रामीण भाग आहे. महाराष्ट्रात जास्त नागरीकरण झाले असे आपण म्हणतो. महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्न जास्त आहे. साक्षरतेमध्ये आपण पुढे आहोत, परंतु प्रगतीचा दावा करताना दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, हे चार जिल्हे सोडले तर उर्वरित महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्न बिहारपेक्षा कमी आहे. इतर शहरांमधील दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे; परंतु त्या शहरांमध्ये शाळा, रस्ते, दवाखाने अपुरे पडत आहेत. निकोप पद्धतीने हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला नाही. कोणत्याही शहराची निकोप वाढ होण्यासाठी जशी भांडवलाची आवश्यकता असते, तशीच गरीब माणसाच्या घामाचीही गरज असते. विकासात मानवता प्रतिबिंबित झाली पाहिजे. लोकशाहीमध्ये मतांना महत्त्व असते, परंतु आमचे बहुतेक निर्णय हे मतांचा विचार करूनच घेतले जातात, हे मी प्रांजळपणे कबूल करतो. नागरिकांना कुठेही जाण्याचा घटनेने अधिकार दिला असला तरी, कुठेही जाऊन बेकायदा वास्तव्य करण्याचा अधिकार दिलेला नाही. खूप मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारला गेला. निवडणुका आल्या की मग झोपडय़ांना संरक्षण देण्याचे १९९५ चे २००० झाले, २००५ होईल आणि २०१० झाले तरी आश्चर्य वाटायला नको. ही वर्षे वाढणे ही लोकांच्या घरांची गरज म्हणून नव्हे, तर आम्हाला लोकांच्या मतांची गरज आहे. यात कुणी अपवाद नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा