गुटखा हे व्यसन तसे गेल्या १५ ते २० वर्षांतले! दारूचे जसे विविध प्रकार बाजारात आले आणि स्थिरावले, तसेच तंबाखूजन्य व्यसनांचेही झाले. सिगारेट, तंबाखू, जर्दा या जोडीला गुटख्याची भर पडली. मात्र अजून एक तंबाखूजन्य व्यसन एवढेच त्याचे स्वरूप राहिले नाही तर या गुटख्याने अगदी शाळकरी मुलांनाही व्यसनाधीन केले. स्त्रियांमध्येही या व्यसनाने प्रवेश केला.
सामाजिक प्रतिष्ठा – गुटखा एवढा लोकप्रिय का झाला असावा याची काही ठोस कारणे आहेत. त्यातील पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे गुटख्याला मिळालेली सामाजिक प्रतिष्ठा. फार पूर्वीपासून लोक हातावर तंबाखू-चुना मळून खात आले आहेत, मात्र त्याला कसलीही प्रतिष्ठा मिळाली नव्हती. किंबहुना तंबाखू खाणारी व पचापचा थुंकणारी व्यक्ती तिरस्काराचा विषय बनलेली असे.
गुटख्याने हा तिरस्कार दूर करून, या व्यसनाला जी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळेच हे व्यसन सर्वदूर पोहोचण्यास व रुजण्यास मोठी मदत झाली. गुटखा हे तंबाखूचेच भावंड आहे ही जाणीव पुसली गेली. अनेक प्रतिष्ठित घरांत वा समारंभातही गुटख्याच्या पुडय़ा बडीशेपऐवजी दिल्या जाऊ लागल्या. त्यामुळेच गुटखा खाणे म्हणजे तंबाखू खाणेच आहे, ही भावना जाऊन, प्रतिष्ठितपणाची झाक त्यात येऊ लागली.
जाहिरातबाजी – गुटख्यासारख्या नव्या व्यसनाला जाहिरातीशिवाय मार्केट मिळणे अवघड होते. त्यामुळे आकर्षक, भुरळ पाडणाऱ्या जाहिरातींचे तंत्र फार कुशलतेने वापरले गेले. अशा जाहिरातीमधील श्रीमंत, उच्च मध्यमवर्गीय मॉडेल्सनी हे व्यसन उच्चभ्रूमध्येही नेले तर कनिष्ठ मध्यवर्गीय, गरीब वर्ग यांनी त्याचे अनुकरण केले. नामवंत क्रीडापटू, सिनेकलावंत यांचा खुबीने वापर केला गेल्याने या जाहिरातींची परिणामकारकता वाढली. सध्याच्या युगातील इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे या व्यसनाच्या आकर्षक जाहिराती घरोघरी विनासायास पोहोचत होत्या.
स्पॉन्सरशिप – जाहिरातीचे हे तंत्र तर गुटखा उत्पादकांनी फार मोठय़ा प्रमाणात वापरले. अनेक लोकप्रिय क्रीडा स्पर्धाही गुटखा उत्पादकांनी प्रायोजित केल्या. याचा अतिरेक झाला सार्वजनिक गणेशोत्सवात! हजारो सार्वजनिक मंडळांना गुटखा उत्पादक पाच-सहा हजार रुपयांपासून लाख-लाख रुपयांपर्यंतची स्पॉन्सरशिप द्यायचे. त्यामुळे गणेशोत्सवाचे पावित्र्य बिघडले. गल्लोगल्ली गुटख्याच्या जाहिरातींचे बॅनर्स, कमानी झळकत राहिल्या.
सॅम्पलिंग – गुटखा लोकप्रिय होण्यासाठी विशेषत: शाळकरी मुले व्यसनाधीन होण्यासाठी गुटखा उत्पादकांनी ‘फ्री सॅम्पलिंग’चा वाढता वापर केला. शाळा-कॉलेजच्या बाहेर गुटख्याची छोटी पाकिटे फुकट वाटायची हे मार्केटिंग तंत्र! दोन-चार आठवडे फुकट गुटखा खाणारा मुलगा पुढे आयुष्यभर गुटख्याचे गिऱ्हाईक बनतो.
आकर्षक वेष्टण – गुटखा तयार करून रंगीबेरंगी आकर्षक वेष्टणात मिळू लागला. गुटख्याचा ‘पाऊच’ अतिशय भडक आणि आकर्षक रंगात असल्याने, अगदी लांबूनही त्याकडे लक्ष जाते. याच्या लांबलचक पट्टय़ा अनेक ठिकाणी टांगलेल्या असतात. कुतूहल चाळवण्यात हे आकर्षक वेष्टण खूपच कामी आले.
छोटे पॅकिंग – गुटखा लोकप्रिय होण्यात छोटे पॅकिंगही कारणीभूत ठरले. गुटख्याची एक पुडी अतिशय छोटय़ा पॅकिंगमध्ये असते. त्यामुळे तल्लफ आली की एक पुडी घ्यायची, गुटखा तोंडात टाकून पुडी फेकून द्यायची इतके सोपे-छोटे पॅकिंग गुटख्याचे होते. छोटय़ा पॅकिंगमुळे दोन-चार पुडय़ा खिशात वा पर्समध्ये सहज मावतात.
कमी  किंमत- गुटख्याच्या एका पुडीची किंमत अगदीच किरकोळ. पन्नास पैशांपासून पाच रुपयांपर्यंत गुटखा मिळतो. अशा चिल्लर किमतीत तल्लफ भागली जाणे ही शौकिनांच्या दृष्टीने पर्वणीच होती. खाऊसाठी मिळालेल्या पैशातून शाळकरी मुलेही गुटखा घेऊ लागली. ती या कमी किमतीमुळेच!
(येथे कमी किंमत म्हणजे एका पुडीची कमी वा अल्प किंमत एवढेच अभिप्रेत आहे. कारण काही ग्रॅम गुटखा दोन-चार रुपयांत याचा अर्थ एक किलो गुटखा सोन्याच्या भावाएवढा; थोडक्यात महागच होतो.)
सहज उपलब्धता – गुटखा हे व्यसन विकायला उत्पादकांना स्वतंत्र विक्री जाळे उभारण्याची गरजच नव्हती. प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत असणारी सिगरेट-पानपट्टीची दुकाने हीच त्यांची विक्री केंद्रे. त्यामुळे कोणत्याही चौकात जा, गुटखा मिळणारच, शिवाय गुटखा अनेक किराणा दुकानांमध्येही मिळू शकतो. व्यसनाची सहज उपलब्धता हीदेखील प्रसारातील महत्त्वाची बाब आहे.
कुचकामी इशारा – गुटख्याच्या जाहिरातीत अगदी कोपऱ्यात वाचता येईल न येईल अशा अक्षरात सावधानतेचा इशारा दिलेला असतो. हा इतका कुचकामी ठरणारा इशारा असतो, की त्याचा गुटखाविक्रीवर परिणामच होत नाही.
बदलती मूल्ये – समाजात गुटख्यासारख्या व्यसनांना घातक व्यसन न मानता, उलट ती प्रतिष्ठेची बाब मानण्याचे मूल्य वाढीस लागले. मुलगा आणि वडील दोघेही एकत्रच गुटखा खाताना दिसू लागले. त्यामुळे गुटखा खाण्याबद्दलची भीड चेपत राहिली.
गुटखा बाजारा आला, स्थिरावला, फोफावलाही! याबरोबरच त्याचे दुष्परिणामही फोफावू लागले. गुटखा सतत खाल्ल्याने सबम्युकस फायब्रॉसिस रोगाचे प्रमाण वाढले. कॅन्सरची लागण होण्याचे प्रमाण वाढले. ओरल कॅन्सर हे जणू तरुण पिढीला, ग्रासणारे ग्रहणच ठरले. कर्करोग, नपुंसकत्व, पोटाचे-तोंडाचे विकार आदी विविध रोग सिगरेट, तंबाखू यामुळे व्हायचेच, त्यात गुटख्याची भर पडल्याने तीव्रता वाढली. याविरुद्ध तातडीने उपाययोजना होण्याची गरज होती. अन्यथा गुटख्याच्या हा ऑक्टोपस सारी युवा पिढी बरबाद करण्यास वेळ लागणार नव्हता. मात्र, प्रवाहाविरुद्ध पोहणे नेहमीच अवघड असते. तरीही प्रयत्न करावेच लागतात. शाकाहार-सदाचार-व्यसनमुक्ती या त्रिसूत्रीचा गेली तीस वर्षे प्रचार-प्रसार करीत असणाऱ्या माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांला गुटख्याच्या प्रसाराने अस्वस्थ केले होते. मी वैद्यकीय क्षेत्रात असल्याने, गुटख्याची दाहकता अधिकच तीव्रतेने बोचू लागली. गुटख्याविरुद्ध जनमत जागृत करणे अनिवार्य होते आणि मग त्यातूनच जन्म झाला गुटखाविरोध आंदोलनाचा!
हे आंदोलन कोणाही गुटखा उत्पादकाविरुद्ध नव्हते, तर गुटख्याविरुद्ध होते. त्यासाठी समविचारी मंडळींना एकत्र आणणे सुरू झाले. गोव्याचे डॉ. शरद वैद्य, टाटा कॅन्सरच्या डॉ. दिनशॉ, डॉ. हजारे आदी नामवंतांचा सक्रिय सहयोग लाभत गेला.
गुटख्याविरुद्ध जनमत जागरूक करण्यासाठी विविध पोस्टर्स तयार केली गेली. हँडबिल्स, स्टिकर्स गावोगावी वाटण्यात आली. आतापर्यंत महाराष्ट्रात शेकडो महाविद्यालयांमध्ये व्याख्याने झाली. स्लाइड शो झाले. गुटख्याच्या होळ्या करण्यात आल्या. व्यसनमुक्तीसाठी शपथा घेतल्या गेल्या. सार्वजनिक गणेशोत्सवात व्यसनमुक्ती देखावा स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. गुटख्याविरोधी प्रभावी प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात गावागावात गेले. याच जोडीला विविध गुटख्यांचे नमुने अमेरिकेला बल्टिमोर येथे हॉन हाफकिन इन्स्टिटय़ूट येथे पृथ:करणासाठी पाठवले गेले. त्यातूनच गुटख्याचा कॅन्सर रिस्क इंडेक्स अतिशय जास्त आहे हे स्पष्ट झाले. गुटख्यात होणाऱ्या सिंथेटिक काथ, मॅग्नेशियम, काबरेनेट आदी भेसळीदेखील उघड केल्या गेल्या.
हे सारे कार्य केवळ काही दिवसांचे नव्हते, तर गेली वीस वर्षे सातत्याने चालू होते. गुटख्याविरोधी आंदोलन सुरू केल्यानंतर अनेक समविचारी जोडले गेले. आपापल्या परीने प्रत्येक जण योगदान देत राहिले. प्रतिसाद मिळत होता; पण एकंदरीत क्षीणच होता. पण महत्त्वाचे म्हणजे कोणीही उमेद हरले नव्हते. पुणे व नंतर पिंपरी-चिंचवड, मुंबई, औरंगाबाद आदी महानगरपालिकांनीही गुटखाविरोधी सप्ताह पाळले. पण एवढे होऊनही महाराष्ट्र शासन तातडीने कारवाई करीत नव्हते. ती कारवाईची शिफारस या प्रदीर्घ विलंबानंतर अखेरीस झाली. महाराष्ट्रात गुटखा निर्मिती, वितरण, विक्री व सेवन यावर बंदी घालण्यात आली.

Story img Loader