या महाराष्ट्राने आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासात असंख्य संकटे झेलली आणि परतवूनही लावली आहेत. या मातीचे तेच तर वैशिष्टय़ आहे. त्यामुळे आधुनिकतेच्यावाटचालीसमोरील अनेक आव्हानेही हाच महाराष्ट्र सामूहिक प्रयत्नांतून परतवून लावेल आणि लहान-मोठे कलंक सहजपणे धुवून काढून पुन्हा एकदा वैभवशाली परंपरांचा महाराष्ट्र जगासमोर येईल. कारण, मराठीपण ही महाराष्ट्राची सार्वत्रिक अस्मिता आहे.
तब्बल ७२० किलोमीटर लांबीचे सागरी सौंदर्य, जैववैविध्याने नटलेल्या निसर्गालाही बारमाही मुक्कामाची भुरळ पडावी, अशा पर्वतरांगा आणि दऱ्याखोऱ्या, आपल्या सुजलाचं भवतालावर सिंचन करून परिसर संपन्न करणाऱ्या नद्या, आपापल्या संपन्न संस्कृतीचा वारसा अभिमानानं जपणारी गावे आणि शहरे, असे एक सुंदर चित्र एकाच चौकटीत सहजपणे सामावून जावे आणि उभ्या जगाने त्याकडे कौतुकाने पाहावे, असे भाग्य लाभलेले राज्य म्हणजे, महाराष्ट्र! कारण, महाराष्ट्र हा केवळ काही भौगोलिक सीमांच्या नकाशात बांधलेला भूभाग नाही. इथल्या संस्कृतीने, परंपरांनी आणि इतिहासाने देशात स्वत:चे असे एक आदरणीय स्थान स्थापन केले आहे. या भूमीला हजारो वर्षांचा वैभवशाली इतिहास आहे आणि हा इतिहास रचणाऱ्या महापुरुषांना आजच्या जगाने देवत्व बहाल केले आहे. या भूमीत शूर, लढवय्ये आणि जनहिताची काळजी घेणारे शिवरायांसारखे महापुरुष राज्यकर्ते होऊन गेले आणि जगाला विश्वात्मकतेचा संदेश देणारे संत ज्ञानेश्वर, निसर्गाशी सोयरीक जमवून निसर्गाच्या नात्याची जाणीव रुजविणारे संत तुकाराम याच राज्यात होऊन गेले. महाराष्ट्राच्या जडणघडणीला राजकीय, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे, म्हणून या भूमीला संतांची भूमी म्हणतात, तसे महापुरुषांची भूमीही म्हणतात. देशाला दिशा देणारे अनेक महान नेते महाराष्ट्राच्या मातीत जन्मले आणि देशाच्या क्षितिजावर त्यांच्या कर्तृत्वाची मोहोर उमटली. महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू छत्रपती यांच्यासारख्या नेत्यांना देशाला सामाजिक अभिसरणाचा मार्ग दाखविला. अशा असंख्य महापुरुषांनी आणि येथील जनतेने संघटितपणे हे राज्य परिश्रमाने उभे केले.
या राज्याची मराठी संस्कृती विकसित होण्यास येथील भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता साहय़भूत झाली आहे. संतांच्या सहवासामुळे या राज्याला आध्यात्मिक बैठक प्राप्त झाली आहे. या संतांच्या आध्यात्मिक शिकवणुकीतून राज्याचा मानसिक विकास घडला, सांस्कृतिक पुनरुत्थानास हातभार लागला. महाराष्ट्राचा इतिहास थेट ऋग्वेदकाळाशी नातं सांगतो. त्या काळात राष्ट्र म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश, सम्राट अशोकाच्या काळात महाराष्ट्र म्हणून ओळखला जाऊ लागला, असे ह्य़ुएन त्संग या चिनी प्रवाशाच्या व अन्य इतिहास संशोधकांच्या नोंदीवरून दिसते. आजही महाराष्ट्राच्या इतिहासाच्या खाणाखुणा सांगणाऱ्या अनेक प्रदेशांचा पुराणकाळातही उल्लेख आढळतो. रामायणातील मोठय़ा कालखंडाला महाराष्ट्रभूमी साक्षीदार असल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या इतिहासाचे भाषेच्या संदर्भातील पहिले पान इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात लिहिले गेल्याचे दिसते.
महाराष्ट्राचा इतिहास प्रत्येक राजकीय कालखंडानुसार वेगवेगळा असला तरी सामाजिक व सांस्कृतिक इतिहास मात्र बराचसा समान आढळतो. या समानतेच्या धाग्यानेच महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम आणि उत्तरदक्षिण सीमांचे नाते घट्टपणे बांधले गेले आहे. एक वैभवशाली इतिहास आणि
परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राने देशाच्या विकासात आणि वाटचालीतही मोलाचा वाटा उचलला आहे. देशाच्या सामाजिक, राजकीय जीवनात महाराष्ट्राचे स्थान महत्त्वाचे राहिले आहे. इंग्रजांच्या राजवटीविरोधातील स्वातंत्र्यसंग्रामात महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व केले आहे. या लढाईत महाराष्ट्राच्या असंख्य वीरांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली.
 मानव विकासात साहय़भूत ठरलेल्या प्रत्येक क्षेत्रावर महाराष्ट्राचा ठसा उमटलेला आहे. कला, क्रीडा, संस्कृती, साहित्य व सामाजिक क्षेत्र, राजकारण, करमणूक किंवा आधुनिक युगात उदयाला आलेल्या कोणत्याही क्षेत्रातदेखील, महाराष्ट्र आघाडीवर राहिला आणि महाराष्ट्रामुळे देशाचे नाव जगाच्या नकाशावर अधोरेखितही झाले. महाराष्ट्र हा देशाचा कणा आहे, महाराष्ट्राविना देशाचा राज्यशकट चालणार नाही असे म्हणतात, त्याची ही परंपरामीमांसा आहे..
कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र या सर्व प्रांतांची आपापली अशी संपन्न संस्कृती आहे. त्या संस्कृतीने त्या त्या प्रांताला सौंदर्य बहाल केले आहे. आणि, या सर्व प्रांतांना एकत्र बांधणारा एक भक्कम धागा आहे. तो म्हणजे, मराठी! मराठी ही भाषा आहेच, पण
मराठीपण हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दुसरे नाव आहे. म्हणूनच, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची अस्मिता मराठीशी जोडली गेली आहे आणि मराठी ही केवळ भाषा न राहता, संस्कृती आणि अस्मिताही झाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रांतांच्या पुनर्रचनेचे वारे वाहू लागले आणि भाषा हा प्रांतनिर्मितीचा
प्रमुख निकष ठरला. पण केंद्र सरकारने भाषेच्या निकषावर महाराष्ट्राची निर्मिती करण्यास नकार दिला आणि महाराष्ट्रात मराठी अस्मितेचे पहिले स्फुल्लिंग
फुलले. मराठी भाषकांचे प्राबल्य असलेल्या मुंबईसह, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एक व्यापक लढाई उभी राहिली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या या लढय़ात, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी १०५ जणांनी आपल्या प्राणांचीही आहुती दिली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र लढय़ाने
महाराष्ट्राच्या या विविध भौगौलिक भागांना एकत्र आणले आणि नव्या महाराष्ट्राची निर्मिती झाली. मराठी ही केवळ भाषा नव्हे, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक झाली आणि महाराष्ट्राच्या भरभराटीची वाटचाल सुरू झाली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी झाली.
देशाच्या व्यापारउदिमाचे, उद्योगव्यवसायांचे केंद्र बनली. महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीला एक वैचारिक बैठक आहे आणि निश्चित आर्थिक नीतीही आहे. १९७० च्या दशकापासून राज्याच्या आर्थिक नीतीची अपेक्षित फळे महाराष्ट्रात दिसू लागली आणि वैचारिकसा
माजिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा प्रगत असलेले हे राज्य आर्थिक आघाडीवरही पहिल्या क्रमांकाच्या स्पर्धेत, अग्रगण्य स्थानावर राहिले. विकासाच्या या स्पर्धेत भौगोलिकदृष्टय़ा उभे राज्य समतोलपणे सहभागी होऊ शकले नाही, त्यामुळे राज्याच्या काही भागांत विकासाचे वारे
तितक्याच वेगाने पोहोचले नाहीत, हे वास्तव मात्र पुढे आणि आजवरही राज्याला टोचणी देत राहिले आहे. सांस्कृतिक आणि बौद्धिक विविधतेने नटलेले कोकण, विदर्भासारखे प्रांत भौतिक विकासात  काहीसे मागे पडले. राजकीयदृष्टय़ा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडय़ाचे वर्चस्व महाराष्ट्रावर सातत्याने राहिल्याने, विदर्भ, कोकणात उपेक्षेची सल अजूनही कुठे कुठे उमटताना दिसते. तरीही मराठी अस्मितेची भावना मात्र इथेही तितक्याच जोमदारपणे जागी आहे. विदर्भापासून कोकणापर्यंतच्या महाराष्ट्रीय माणसाला मराठी माणूस अशीच स्वतची ओळख जपायला आवडते, ती त्यामुळेच! मराठी भाषेबरोबरच, इथल्या संस्कृतीची असंख्य प्रतीके महाराष्ट्राची अस्मिता जागविणारी आहेत. पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई हे महाराष्ट्राचे पिढय़ान्पिढय़ांचे आराध्य दैवत आहे. देशाच्या संस्कृतीशी नाळ जोडणारी असंख्य मंदिरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आढळतात. उत्तर आणि दक्षिण भारताच्या स्थापत्यकलेशी नाते सांगणारी ही मंदिरे, प्राचीन बौद्ध संस्कृतीचा वैभवशाली कालखंडाचा साक्षीदार असलेली अजिंठा-वेरुळसारखी जगप्रसिद्ध लेणी, लढवय्या इतिहासाचा वारसा सांगणारे सागरी दुर्ग आणि दुर्गम किल्ले, मोगल शिल्पशैलीचे सौंदर्य जपणाऱ्या वास्तू, महाराष्ट्राचे लोकसंगीत आणि महाराष्ट्राची चित्रपटसृष्टी, साऱ्यांनीच राज्याच्या सौंदर्याला आणखी समृद्ध केले आहे.
समृद्ध इतिहास आणि वैभवशाली परंपरा असलेल्या भौगोलिक महाराष्ट्राने अलीकडेच आपला सुवर्णमहोत्सव साजरा केला. भौतिकदृष्टय़ा १९६० साली स्थापन झालेल्या महाराष्ट्राला २०१० साली पन्नास वर्षे पूर्ण झाली. साहजिकच, महाराष्ट्राच्या वाटचालीच्या ढोबळ आढाव्याची मर्यादा पन्नास वर्षांपर्यंत सीमित झाली. या काळात
महाराष्ट्राने औद्योगिक आघाडी घेतली, तरी अनेक समस्या, प्रश्न महाराष्ट्रासमोर अजूनही कायम आहेत. महाराष्ट्रातील अनेक गावे अजूनही विजेच्या टंचाईने होरपळत असतात. विहिरीतील पाणी शेताच्या बांधापर्यंत पोहोचण्यासाठी वीज गरजेची असते. पण अनेक गावांत वीज आली म्हणून कृषीपंप सुरू करावा तर पाणी बांधाला लागेस्तोवर वीज जाते आणि पिकाच्या पोटापर्यंत पोहोचण्याआधीच पाणी पाटातच मुरते. ही समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी राज्याचे वीज मंडळ नियोजनबद्ध
कार्यक्रम आखणी करीत आहे. वीजनिर्मिती, पारेषण आणि वितरणाचे जाळे भक्कम करण्यासाठी महत्त्वाकांक्षी कार्यक्रमच हाती घेण्यात आला आहे. दुसरी समस्या, पाटबंधारे प्रकल्पांची.. विषम भौगोलिक रचनेमुळे सर्व प्रांतांतील पर्जन्यमान सारखे नाही, त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती उद्योग पाटबंधारे प्रकल्पांवरच बहुतांशी अवलंबून आहे. अशा परिस्थितीत, राज्याची सिंचनक्षमता वाढविणे ही राज्याची पहिली गरज आहे. अनेक पाटबंधारे प्रकल्प अनेक वर्षे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यासाठी निधी उभा करणे आणि कालबद्ध कार्यक्रमांद्वारे सिंचनक्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज सरकारनेही ओळखली आहे. आता सिंचन हा राज्याच्या प्राधान्यक्रमातील वरच्या क्रमांकाचा मुद्दा झाला आहे. आर्थिक विषमतेमुळे विदर्भासारखा प्रांत मागासलेला राहिला असून, तेथील मोठा शेतकरीवर्ग कर्जाच्या सापळ्यात गुरफटत चालला आहे, हे भीषण वास्तव गेल्या काही दशकांपासून महाराष्ट्राला बेचैन करत आहे. संपन्न विदर्भाला आता आत्महत्याग्रस्त विदर्भ असे नकोसे संबोधनही लागले आहे. या विचित्र कोंडीतून बाहेर काढून तेथील शेतकऱ्याला आत्मविश्वासने पुन्हा उभे करण्याची गरज आहे. त्यासाठी पंतप्रधान पॅकेजबरोबरच, विदर्भातील अपुरे राहिलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करणे ही काळाची गरज ठरली आहे. .. पण या महाराष्ट्राने आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासात असंख्य संकटे झेलली आणि परतवूनही लावली आहेत. या मातीचे तेच तर वैशिष्टय़ आहे. त्यामुळे आधुनिकतेच्या वाटचालीसमोरील अनेक आव्हानेही हाच महाराष्ट्र सामूहिक प्रयत्नांतून परतवून लावेल आणि लहान- मोठे कलंक सहजपणे धुवून काढून पुन्हा एकदा वैभवशाली परंपरांचा महाराष्ट्र
जगासमोर येईल. कारण, मराठीपण ही महाराष्ट्राची सार्वत्रिक अस्मिता आहे. विदर्भातील शेतकऱ्याची समस्या ही केवळ विदर्भापुरती नाही आणि
कोकणाच्या समस्या केवळ कोकणापुरत्या नाहीत. आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीला सामूहिक प्रयत्नांचे पाठबळ लाभले आहे. हेच सामूहिक प्रयत्न उद्याच्या महाराष्ट्रासाठी उभे राहतील आणि समस्यामुक्त महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवाने उजळेल. एखाद्या इतिहासाची निर्मिती एका रात्रीत होतच नसते. त्यासाठी काही कालावधी जावाच लागतो. उद्याचा नवा इतिहासही त्याच पद्धतीने रचला जाणार आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा