|| अमृतांशु नेरुरकर

गोपनीयतेच्या अधिकाराची पायमल्ली तारयंत्र (टेलिग्राफ) आणि टेलिफोनच्या शोधापासूनच सुरू झाली, ती कशी?

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी

विदासुरक्षा आणि गोपनीयतेच्या तडजोडीसंदर्भात कोणत्याही नवतंत्रज्ञानाला- जे कमीअधिक प्रमाणावर लोकांची खासगी विदा (डेटा) गोळा करते- लागू होईल असे सार्वकालिक सत्य म्हणजे, जेव्हा एखादे नवतंत्रज्ञान जन्माला येते तेव्हा या तंत्रज्ञानाच्या मदतीने संकलित होत असलेल्या विदेवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासकीय व व्यावसायिक स्तरावर मोठ्या प्रमाणात स्वारस्य दाखवले जाते आणि त्यातूनच मग विदासुरक्षेत तडजोड व गोपनीयतेच्या अधिकाराची पायमल्ली होण्यास सुरुवात होते. विशेष म्हणजे, या सत्याची जाणीव गेल्या एखाददोन दशकांत प्रकर्षाने झाली असली, तरीही गेल्या जवळपास दीड शतकात प्रत्येक नव्या तंत्रज्ञानाबरोबर त्याची वारंवार प्रचीती येत गेली आहे. याची सुरुवात तारयंत्र (टेलिग्राफ) आणि टेलिफोनच्या शोधापासून झाली असे खात्रीलायकरीत्या म्हणता येईल.

वास्तविक तारयंत्र हे पुष्कळ जुने तंत्रज्ञान आहे, जे आज बहुतेक देशांत वापरलेही जात नाही. भारतातसुद्धा १५ जुलै २०१३ रोजी शेवटची तार पाठवली गेली. पण जेव्हा सॅम्युएल मॉर्स आणि इझ्राा कॉर्नेल यांनी जवळपास १७५ वर्षांपूर्वी या तंत्रज्ञानाचा व्यावसायिक स्तरावर वापर सुरू केला, तेव्हा मात्र एक अभूतपूर्व तंत्रज्ञान म्हणून ते सर्वत्र वाखाणले गेले. आता दूर अंतरावरील व्यक्तींना एकमेकांना जलदगतीने संदेश पाठवणे पुष्कळच सोपे झाले. १८४४ साली एका राजकीय अधिवेशनाचे वृत्तांकन करण्यासाठी मॉर्स आणि कॉर्नेल यांनी अमेरिकेतल्या वॉशिंग्टन आणि बाल्टिमोर या शहरांच्या मध्ये ६५ किलोमीटर लांब तारा टाकल्या आणि अधिवेशनाची बित्तंबातमी विद्युतवेगाने वृत्तपत्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करून दाखवला. त्यानंतर मात्र तारसेवेने पुढील जवळपास शे-सव्वाशे वर्षे मागे वळून पाहिले नाही.

लांब पल्ल्यांच्या संदेशवहनासाठी तारसेवा हेच मुख्य माध्यम बनले. किफायतशीर असल्याने केवळ संस्थात्मकच नव्हे, तर अगदी व्यक्तिगत स्तरावर लघुसंदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी तारसेवेचा सर्रास वापर होऊ लागला. व्यक्तिगत गोपनीय माहितीचे आदानप्रदान तारयंत्राच्या साहाय्याने जसजसे वाढू लागले तसतसे वर उल्लेखलेल्या नियमाला अनुसरून या माहितीवरील अधिकृत वा अनधिकृत हेरगिरीचे प्रकार जोमाने वाढू लागले आणि ‘वायरटॅप’ तंत्रज्ञानाचा उदय झाला. तारसेवेसाठी (आणि पुढे आलेल्या टेलिफोन सेवेसाठी) तांब्याच्या तारांचे (वायर) जाळे देशभरात प्रत्यक्षात विणायला लागायचे. त्यामुळेच या तारांवर वहन होत असलेल्या माहितीवर किंवा संभाषणांवर पाळत ठेवण्यासाठी ‘वायरटॅप’ हा शब्दप्रयोग रूढ झाला, जो सेल्युलर, वायफाय अशा बिनतारी तंत्रज्ञानांच्या उदयानंतरही आजतागायत वापरला जातोय.

वायरटॅपिंगचा सर्वप्रथम अधिकृत वापर अमेरिकेतील यादवी युद्धात १८६३ साली अमेरिकी लष्कराकडून केला गेला. अमेरिकेतल्या उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांच्या या संघर्षात प्रतिस्पध्र्यांची गुप्त व सांकेतिक माहिती मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंचे अभियंते प्रयत्नांची शिकस्त करत होते व त्यासाठी त्यांचा भर हा प्रामुख्याने टेलिग्राफच्या तारांवर वहन होत असलेल्या संदेशांवर होता. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, अमेरिकेत तारसेवेचा विस्तार हा १८५० च्या दशकात झाला. म्हणजेच या सेवेला केवळ एक दशक पूर्ण व्हायच्या आतच तिच्याद्वारे वहन होणाऱ्या माहितीवर डल्ला मारण्यास सुरुवात झालीदेखील होती आणि हा हस्तक्षेप फक्त लष्करी, राष्ट्रीय सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था अशा ‘उदात्त’ हेतूंपुरता सीमित नव्हता.

१८६४ साली वायरटॅप संदर्भातला पहिला व्यक्तिगत गुन्हा अमेरिकेत नोंदवला गेला. डी. सी. विल्यम्स हा शेअरबाजारातील एक अत्यंत कुशाग्र बुद्धीचा दलाल होता. आपल्याशी संबंधित असलेल्या गुंतवणूकदारांना शेअरबाजारातील गुंतवणुकीचा अधिकाधिक परतावा कसा मिळू शकेल व पर्यायाने स्वत:चा नफा कसा वाढवता येईल याचा विचार करत असताना त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. तो विश्लेषण करत असलेल्या कंपन्यांच्या टेलिग्राफ तारांवर जर त्याने पाळत ठेवली तर त्याच्या हाती आतल्या गोटातील काही माहिती लागू शकेल व अशी गोपनीय माहिती गुंतवणूकदारांना देऊन त्याद्वारे बक्कळ पैसा कमावता येईल असा त्याचा कयास होता. आपली ही कल्पक योजना राबवायला त्याने त्वरित सुरुवातही केली. त्याच्या दुर्दैवाने विविध कंपन्यांना तारसेवा पुरवणाऱ्या पॅसिफिक टेलिग्राफ कंपनीला या अनधिकृतपणे खुलेआम चाललेल्या ‘वायरटॅप’चा सुगावा लागला आणि तो पकडला गेला. खासगी माहितीच्या चौर्यकर्माबद्दल पुढे त्याला शिक्षाही झाली, पण तारयंत्रांवर पाठवली जाणारी माहिती जराही सुरक्षित नाही हे यामुळे स्पष्ट झाले.

१८७६ साली अलेक्झांडर ग्रॅहम बेलला टेलिफोनच्या शोधाचे एकस्व (पेटंट) मिळाल्यानंतर आणि १८७७ साली दूरध्वनी सेवेचा व्यावसायिक स्तरावर विस्तार करण्यासाठी बेल टेलिफोन कंपनीची स्थापना केल्यानंतर मात्र वायरटॅपचे प्रमाण भूमितीश्रेणीने वाढले. याचे मुख्य कारण म्हणजे, दूरध्वनी सेवांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि ग्राहकांच्या देयकांचा काटेकोर हिशेब ठेवण्यासाठी जी टेलिफोन एक्स्चेंज निर्माण झाली, त्यांत ग्राहकाच्या प्रत्येक दूरध्वनीतील संभाषणाबरोबरच त्यासंदर्भातील इतर माहितीची नोंद ठेवण्यासाठी कार्यरत असलेली यंत्रणा! संगणकीय परिभाषेत अशा माहितीला ‘मेटाडेटा’ असे संबोधले जाते. ग्राहकाने केलेल्या प्रत्येक दूरध्वनीमागे तो दूरध्वनी क्रमांक, संभाषण जेव्हा सुरू झाले ती वेळ, कालावधी, दूरध्वनी केले आणि स्वीकारले गेलेले ठिकाण असा ‘मेटाडेटा’ साठवण्यासाठी टेलिफोन एक्स्चेंजकडे स्वतंत्र यंत्रणा काम करत असते.

आपल्या घरचा लॅण्डलाइन टेलिफोन कार्यरत ठेवण्यासाठी घराजवळच्या स्थानिक एक्स्चेंजमध्ये ‘स्लॅम’ (सबस्क्राइबर लाइन अ‍ॅक्सेस मॉड्युल) नामक एक यंत्रणा असते. या यंत्रणेचा वापर करूनच दोन व्यक्तींच्या संभाषणाचे टॅपिंग केले जाते. त्याचबरोबर आपण लावत असलेल्या प्रत्येक दूरध्वनी क्रमांकाची नोंद ठेवण्यासाठी ‘पेन रजिस्टर’ नावाचे, तर येणाऱ्या प्रत्येक दूरध्वनी क्रमांकाच्या नोंदीसाठी ‘ट्रॅप अ‍ॅण्ड ट्रेस’ नावाचे उपकरण वापरतात. ही सर्व यंत्रणा टेलिफोन एक्स्चेंजमध्ये कार्यरत असल्याने वायरटॅपिंगचा सुगावा वापरकत्र्यांना लागणे हे जवळपास अशक्य असते.

टेलिफोन संभाषणांवर पाळत ठेवण्याची जगातील सगळ्यात पहिली नोंद १८९५ सालची आहे, जी न्यू यॉर्कच्या पोलिसांकडून ठेवली गेली होती. सुरुवातीच्या काळात अधिकृतपणे अशी हेरगिरी करणे- विशेषत: पोलिसांसाठी अगदीच सोपी गोष्ट होती. न्यू यॉर्क टेलिफोन एक्स्चेंजची कायदेशीर बाजू सांभाळणाऱ्या जॉन स्वेझी या वकिलाने न्यायालयात एका सुनावणीदरम्यान असे स्पष्ट म्हटले होते की, ‘‘न्यू यॉर्क शहरातील कोणत्याही दोन व्यक्तींदरम्यान होणाऱ्या खासगी अथवा व्यावसायिक संभाषणावर पाळत ठेवण्यासाठी पोलिसांना न्यू यॉर्क टेलिफोन एक्स्चेंजला केवळ तोंडी विनंतीवजा सूचना करावी लागायची व अशी संभाषणे हव्या तितक्या काळासाठी वायरटॅप करण्याची खुली परवानगी पोलिसांना मिळायची.’’

म्हणजे एखादे संभाषण कितीही संवेदनशील किंवा गोपनीय असो, पोलिसांना ते कोणत्या कारणासाठी ऐकायचे आहे याची जराशीही चौकशी टेलिफोन एक्स्चेंज करत नव्हते. वायरटॅपिंगचा हा उपक्रम त्यात गुंतलेल्या व्यक्तींच्या अनभिज्ञतेत चालू होता. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, १८९५ ते १९१४ अशा तब्बल २० वर्षांच्या कालखंडामध्ये पोलिसांकडून वायरटॅपिंगसंदर्भात आलेल्या एकाही विनंतीची नोंद ठेवण्याची गरज न्यू यॉर्क टेलिफोन एक्स्चेंजला वाटली नाही. वृत्तपत्रांनी या प्रकाराविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केल्यानंतर मात्र न्यू यॉर्क टेलिफोन एक्स्चेंजने यामुळे होणारी आपली बदनामी टाळण्यासाठी १९१५ पासून पोलिसांकडून येणाऱ्या विनंतीची रीतसर नोंद ठेवण्यास सुरुवात केली. आता वायरटॅप करण्याअगोदर पोलिसांना एक विनंती अर्ज एक्स्चेंजकडे आपल्या स्वाक्षरीसह भरून द्यावा लागे, ज्यात वायरटॅप करायच्या व्यक्तींची नावे, कालावधी व वायरटॅप करण्याचे कारण इत्यादी माहिती द्यावी लागत असे. यामुळे पोलिसांना मिळालेल्या या अमर्याद अधिकारावर काही प्रमाणात अंकुश बसायला नक्कीच मदत झाली, पण ठोस कायद्याअभावी हा प्रयत्न तोकडाच होता.

१९१५ ते १९२५ या दशकभरात या विषयासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये सविस्तर चर्चा होऊ लागली. त्यामुळे एका गोष्टीची जाणीव अमेरिकी जनमानसात प्रकर्षाने होऊ लागली, की वायरटॅपचा पोलीस, लष्कर किंवा इतर शासकीय यंत्रणांकडून होणारा गैरवापर थांबवण्यासाठी कोणताही कायदा अस्तित्वात नाही. पुढील काळात लढल्या गेलेल्या दोन खटल्यांमुळे वायरटॅपिंगच्या अनिर्बंध वापराला आळा घालण्यासाठी कायदेशीर चौकट तयार होण्यास मदत झाली; याचा ऊहापोह पुढील लेखात!

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.

amrutaunshu@gmail.com