जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत, शाळेची मालमत्ता ही जणू आपलीच असल्याच्या आविर्भावात जो तो बोलत असतो. शाळेच्या मालमत्तेवर आपलाच हक्क आहे या थाटात ‘कोणीही यावे अन् टपली मारून जावे’ या वृत्तीने गावोगावी लोक वागतात. अशा विचित्र परिस्थितीत सर्व गावकऱ्यांना सोबत घेत, शिक्षकांमध्ये शाळेप्रति प्रेमभाव जागवीत, एकही दिवस सुट्टी न घेता १५ तासांची शाळा चालविण्याचा अभिनव उपक्रम लातूर जिल्हय़ातील औसा तालुक्यातील भादा गावात गेल्या तीन महिन्यांपासून अविरत चालू आहे.
भादा गावात मुलांची जिल्हा परिषदेची शाळा पूर्वीपासून होती. औसा येथील बंद पडलेल्या कन्या शाळेचे स्थलांतर या गावात करण्यात आले आणि मुला-मुलींच्या दोन स्वतंत्र शाळा गावात सुरू झाल्या. शाळेची इमारत, संरक्षण भिंत उभी राहिली. मुला-मुलींची संख्या वाढू लागली. मागील जून महिन्यात भारत सातपुते गावात मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. आणि कवितेची आवड असलेल्या आणि स्वत: कवीही असलेल्या सातपुते यांनी शाळेचे रूप पालटविले.
सुरुवातीला त्यांनी शालेय समितीची मंडळी, शाळेतील २२ सहकारी शिक्षक यांच्यासोबत बठका घेतल्या. त्यानंतर ठोस नियोजन करून १ जानेवारी, २०१६पासून ते कामाला लागले. चोवीस तास शाळेसाठी आपण उपलब्ध राहिलो तरच बदल घडवता येईल, म्हणून त्यांनी भादा गावातच मुक्कामी राहण्याचे ठरविले.

नियमित योगासने
देशभर योग दिन साजरा करण्याचे ठरले. पण, योग दिन एक दिवसाचा कशाला, रोज योग दिन का नको, असा विचार करत सकाळी साडेसहा वाजता मुलांसाठी तासभर योगासने सुरू केली. ते स्वत:ही या तासाला उपस्थित राहू लागले. ३०० मुलांपकी जवळपास २५० पेक्षा अधिक मुले उपस्थित राहू लागली. सायंकाळी मुलींसाठी योगासने सुरू झाली. गेल्या ९५ दिवसात एकही दिवस योगासनात खंड पडलेला नाही.

अवांतर वाचन
योगासनाबरोबर मुलांना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी औसा येथील कन्या शाळेत धूळ खात पडलेली पुस्तके, कपाटे भादा येथे आणण्यात आली. ती नीटनेटकी करून चार हजार पुस्तके प्रत्येक वर्गनिहाय वाचायला देण्यासाठी त्याच्या पिशव्या तयार करण्यात आल्या. त्याच्या वितरणासाठी विद्यार्थीप्रमुख नेमले गेले व दररोज सकाळी ९ ते १० एक तास प्रत्येक वर्गात अवांतर वाचनाची प्रारंभी सक्ती करण्यात आली. पण, नंतर आपोआप मुलांमध्ये गोडी निर्माण झाली.

गणित-इंग्रजीवर भर
ग्रामीण भागातील विद्यार्थी हा गणित व इंग्रजी या दोन विषयात कच्चा राहतो. त्याला या विषयांमध्ये गती यावी व गोडी निर्माण व्हावी यासाठी पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले. ‘हसतखेळत गणित’ हा उपक्रम राबवत एखादे सूत्र कसे तयार होते हे विद्यार्थ्यांना उलगडून दाखवले जाऊ लागले. त्यासाठी शाळेतील गणिताचे शिक्षक मोहन माकणे इतर शिक्षकांच्या मदतीने गेल्या तीन महिन्यांपासून दररोज मुला-मुलींचे रात्रीचे वर्ग घेत आहेत. हे वर्ग रात्री साडेआठ वाजेपर्यंत चालतात. त्यासाठी मुलांकडून एकही छदाम घेतला जात नाही. एका वर्गात सलग साडेचार तास कंटाळा न करता मुलांच्या गणिताच्या शंकानिरसनाचे काम शिक्षक करतात. इंग्रजी शिकविणाऱ्या अनिता खडके या शिक्षिकेने विद्यार्थ्यांचे शब्दभांडार वाढवण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेनुसार त्यांना दररोज १० ते ५० नवे शब्द पाठ करण्याचा सराव सुरू केला. शब्दातून छोटी वाक्ये तयार करणे, निबंध लिहिणे, यातून इंग्रजी विषयाची गोडी निर्माण होईल असा प्रयत्न करत आता या शाळेतील मुले इंग्रजीतून बोलूही लागली आहेत. गतवर्षी पहिली व पाचवी या दोन वर्गासाठी सेमी इंग्लिश सुरू करण्यात आली. जूनमध्ये आता दुसरी व सहावी अशा दोन वर्गाची भर पडणार आहे.

विश्वासाचे वातावरण
वर्गात होणाऱ्या कोणत्याही सराव परीक्षेत अथवा तिमाही, सहामाही, वार्षकि परीक्षेत कॉपी केली जाणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले. परीक्षेत नापास झाले तर आभाळ कोसळत नाही. आपल्याला नेमके काय समजले नाही हे लक्षात घेऊन ते शिकवण्याची व्यवस्था शाळेत केली जाईल, असा विश्वास विद्यार्थ्यांत निर्माण केला गेला. पायाभूत चाचणी परीक्षेत आठवीच्या विद्यार्थ्यांना सातवीच्या विषयाबद्दल प्रश्न विचारून त्यांचा पाया पक्का करण्याची पद्धत आहे. भाद्याच्या शाळेत केवळ सातवीच नाहीतर पाचवी, सहावी इयत्तेतीलही मूलभूत बाबी विद्यार्थ्यांना समजाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात आले.

शाळेचे रूप पालटले
जुने बाक व खराब खुच्र्या दोन खोल्यात बंदिस्त पडले होते. त्या काढून दुरुस्त करण्यात आले. त्यातून दोन वर्गाला पुरतील इतके बाक व खुच्र्या तयार झाल्या.

आपलेपणाची भावना
वर्गामधील विद्यार्थ्यांची उपस्थिती ९० टक्क्यांपेक्षा अधिक असते. एखादा विद्यार्थी अनुपस्थित राहिला तर कधी सेवक, कधी शिक्षक तर कधी मुख्याध्यापकच विद्यार्थ्यांच्या घरी जातात व नेमके अनुपस्थितीचे कारण काय आहे हे जाणून घेतात. यामुळे गावकऱ्यांमध्ये शाळेविषयी आपलेपणाची भावना निर्माण न होईल तरच नवल. शाळेच्या अडीअडचणीसाठी लोक आर्थिक मदतीबरोबरच श्रमदानही करतात. शाळेत वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन मुले करतात. पाण्याचा गरवापर होणार नाही याची काळजी घेतात. विद्यार्थ्यांना दिली जाणारी खिचडी ही प्रत्येकाला नेमून दिलेल्या ताटातच दिली जाते व ते ताट मुले स्वत: स्वच्छ करतात. मुले जेवल्याशिवाय एकही शिक्षक डबा खात नाहीत.
संपूर्ण उन्हाळाभर एकही दिवस सुट्टी न घेता शाळा सुरू ठेवण्यात येणार आहे. जून महिन्यात शाळेत नव्या मुलांना प्रवेश दिला जातो. भादा शाळेने घरोघरी आताच प्रवेशाची पत्रके वितरित केली आहेत. तुमच्या मुलांचे भवितव्य घडवण्याची संधी द्या, असे आवाहन शाळा करते. शाळेवर गावकऱ्यांचा विश्वास आहे. म्हणून गावात इंग्रजी माध्यमाच्या शाळा अद्याप हातपाय पसरू शकलेल्या नाहीत. ‘आमच्या शाळेची विद्यार्थीसंख्या सध्या ६३५ आहे. आगामी वर्ष-दीड वर्षांत ती हजारावर पोहोचेल,’ असा विश्वास ‘शालेय समिती’चे अध्यक्ष अर्जुन लटुरे व्यक्त करतात तो त्याच विश्वासापायी. भाद्याच्या पंचक्रोशीतील मुला-मुलींना आदर्श शाळा उपलब्ध व्हावी या दृष्टीने शाळेचा प्रयत्न आहे.

आमचे भाग्य
शाळेमुळे आमची दोन्ही मुले लवकर उठतात. नियमित व्यायाम करतात. त्यामुळे त्यांचा आहार वाढला आहे. रात्रीच्या वर्गामुळे अभ्यासातही ते गती घेत आहेत. गावातील शाळेला असे शिक्षक लाभले हे आमच्या गावचे भाग्य आहे, असे विद्यावती कुलकर्णी या पालकांनी सांगितले. त्यांचा हृषीकेश हा मुलगा दहावीत शिकतो तर संस्कृती ही मुलगी चौथीत शिकते.
गुरुजींचा आदर्श
शाळेला बदलण्यासाठी जीवतोड मेहनत का घेता याचे भारत सातपुते यांनी दिलेले उत्तर मार्मिक होते. ‘आपल्या लहानपणी शाळेत गुरुजींनी प्रेम लावले होते. ते अभ्यास करून घेत. नियमित व्यायाम करायला लावत व रात्री शाळेतच झोपायला बोलवत. त्यांनी केलेल्या प्रेमामुळेच आपण घडलो असलो. मग आपली जबाबदारी पुढच्या पिढीला घडवण्याची नाही का, असा प्रश्न मीच मला विचारला व त्यातून मी जिद्दीने काम सुरू केले,’ असे सातपुते सांगतात. ‘मी स्वत: चोवीस तास उपलब्ध असल्याने माझ्या सहकाऱ्यांना महिन्यातून दोन दिवस अधिकचा वेळ शाळेला देण्याचे आवाहन केले तर कोणीही नाही म्हणत नाही. शिक्षक व शिक्षिका सर्वच जण जीव ओतून काम करतात,’ अशा शब्दांत त्यांनी समाधान व्यक्त केले.

– प्रदीप नणंदकर

संकलन – रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com