१९३८ साली जन्मलेल्या भालचंद्र नेमाडे यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण त्यांच्या जन्मगावी खान्देशातच झाले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून बीए आणि डेक्कन महाविद्यालयातून एमए (भाषाशास्त्र) केले. त्याचबरोबर १९६४ साली मुंबई विद्यापीठातून इंग्रजी साहित्यातही एमए केले. त्यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून डी.लिट देऊन सन्मानित करण्यात आले आहे. इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अहमदनगर, धुळे, औरंगाबाद, लंडनचे ‘स्कूल ऑप ओरिएंटल अॅण्ड आफ्रिकन स्टडीज’, मराठवाडा विद्यापीठ येथे काम केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या ‘गुरुदेव टागोर तुलनात्मक साहित्य अभ्यास’ अध्यासन भूषविल्यानंतर ते निवृत्त झाले.
सन्मानाची समृद्ध अडगळ
श्रेष्ठ कादंबरीकाराचा यथोचित सन्मान
राजकारणाला न जुमानता नेमाडेंना ज्ञानपीठ
‘आता कविता लेखन करणार’!
ज्ञानपीठ म्हणजे काय रे भाऊ?
विशेष संपादकीय – तुकारामांच्या मराठीचा गौरव!
नेमाडे यांनी आपली पहिली ‘कोसला’ ही कादंबरी वयाच्या २५व्या वर्षी लिहिली. ‘कोसला’ ही पांडुरंग सांगवीकर या खेडय़ातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या या तरुणाची आत्मकथा आहे. ही कांदबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयीन प्रवाहाबाहेरील कलाकृती मानली जाते. ‘कोसला’च्या यशानंतर नेमाडे यांनी बिढार, जरीला व झूल या ‘चांगदेव पाटील’ या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबऱ्या लिहिल्या. त्यानंतर नेमाडे यांनी तब्बल ३५ वर्षे अभ्यास करून लिहिलेल्या ‘हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीने तर वाचकांच्या मनावर गारूड केले. ‘हिंदू’ तीन भागांमध्ये लिहिली जाणार असल्याने आता वाचकांना त्याच्या पुढील भागाबद्दल उत्कंठा आहे. नेमाडेंना यापूर्वी साहित्य अकादमी, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान, पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
१९७५-८०च्या काळात जागतिकीकरणाच्या जाणिवेतून नेमाडे यांनी ‘देशीवादा’ची विचारसरणी जन्माला घातली. त्याला सुरुवातीला अनेक विचारवंतांनी विरोध केला, परंतु जागतिकीकरण जितके वाढत जाईल तितका देशीवाद रुजेल, असे सांगत नेमाडे आपल्या विचारांचे समर्थन करीत आले आहेत. आज अनेक विद्यापीठांमधून ‘देशीवाद’ हा अभ्यासाचा विषय झाला आहे. आपण आपल्या गोष्टी गमावतोय, या जाणिवेतून देशीवाद तयार झाला होता. देशीवादाच्या मांडणीवर अनेकदा ती हिंदुत्ववादी किंवा गांधीवादी विचारसरणीच्या जवळ जाणारी आहे, असा आक्षेप घेतला जातो. याला उत्तर देताना आपल्या आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या देशीवादामध्ये गल्लत करू नये, असे नेमाडे वेळोवेळी स्पष्ट करीत आले आहेत.आपल्या सडेतोड भूमिकेसाठी नेमाडे प्रसिद्ध आहेत. साहित्य संमेलन भरवणं ही नस्ती उठाठेव असून संमेलनावर चर्चा करणे हा वेळेचा अपव्यय आहे, असे मत व्यक्त करून नेमाडे यांनी मराठी साहित्यविश्वात खळबळ उडविली होती. त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाच्या शाळा हद्दपार करण्याच्या त्यांच्या विधानामुळेही असाच वाद उफाळला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा