अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील म्हाळादेवी गावातील रामलाल हासे हे औषधी वनस्पतींचा विशेष अभ्यास असणारे, पर्यावरणप्रेमी निवृत्त शिक्षक. त्यांच्या शेतीमध्ये ते विविध प्रयोग करीत असतात. म्हाळादेवी येथील आपल्या शेतात मिरी लागवडीचा पथदर्शी प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखविला आहे. आपल्या शेतात केलेल्या मिरीलागवडीतून गेली तीन वर्षे त्यांना मिरी पिकाचे उत्पन्न मिळत आहे. कोकणच्या लाल मातीत येणारे मिरीचे पीक अकोल्याच्या काळ्या मातीतही येऊ शकते हे हासे यांनी सिद्ध केले आहे.
पाच वर्षांपूर्वी तत्कालीन कृषी अधिकारी प्रवीण गोसावी व आत्माचे तालुका समन्वयक बाळनाथ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली काळी मिरी लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला. तालुक्यातील काही निवडक शेतकऱ्यांना काळी मिरीची दर्जेदार रोपे उपलब्ध करून देण्यात आली. मिरी लागवडी संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. निवडक शेतकऱ्यांचा कोकण कृषी विद्यापीठातील संशोधन केंद्राचा अभ्यास दौरा घडवून आणला गेला.
हासे यांनी आपल्या म्हाळादेवी येथील डोंगरकुशीत असणाऱ्या शेतात आंबा बागेत शास्त्रीय पद्धतीने मिरी रोपांची लागवड केली. हासे यांना आठ रोपे मिळाली होती. त्यांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली. वेळोवेळी खत, पाणी मिळाल्याने रोपांची झपाट्याने वाढ होत गेली. मिरीचे वेल आंबा, फणस झाडांवर नैसर्गिक पद्धतीने चढत गेले. बागेतील थंड वातावरण, ऊन आणि सावली असल्याने वेलांची चांगली वाढ झाल्याचे हासे यांनी सांगितले. शास्त्रोक्त पद्धतीने या रोपांचे संगोपन केल्यानंतर लागवडीच्या दुसऱ्या वर्षापासून मिरीचे उत्पादन सुरू झाले. लागवडीनंतर दुसऱ्या वर्षी चार किलो ओली मिरी फळे मिळाले. तर गतवर्षी आठ किलो ओली फळे मिळाली. यंदा दोन वेलींनाच १० किलो ओली फळे मिळाली.
कोणतेही रासायनिक खत अथवा औषधांचा वापर न करता पूर्ण नैसर्गिक वातावरणात घेतलेले हे पीक आहे. शून्य उत्पादन खर्च असलेले, सेंद्रिय, विषमुक्त उत्पादन घेतले असल्याचे हासे यांनी सांगितले. मिरी हे कोकणातच येणारे पीक आहे, असा समज आहे. मात्र, या पिकासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती केली, तर कोकणालगतच्या डोंगर भागातील सपाटीवरही हे पीक चांगले येऊ शकते, असे हासे यांनी सांगितले.
प्रक्रिया करून सुकविल्यानंतर मिळणारी काळी मिरी चविष्ट असल्याचे हासे यांनी सांगितले. दर्जेदार व उत्कृष्ट दर्जाची मिरी अकोले तालुक्यात तयार होऊ शकते हे हासे यांनी दाखवून दिले आहे. मिरीचा भाव हजार ते बाराशे रुपये किलो असला, तरी हासे मिरी विकत नाहीत. मिरीच्या अंदाजे वीस ग्रॅमच्या पुड्या करून लोकांना ते मिरी भेट देत असतात. नातेवाईक, मित्रपरिवार, अधिकारी, पदाधिकारी यांना या भेटी दिल्या जातात. भेट मिळालेली काळी मिरी पाहून अनेकांचा ही मिरी अकोल्यात पिकविलेली आहे यावर विश्वास बसत नसल्याचे हासे यांनी सांगितले.
अकोले तालुक्यात मिरी लागवड वाढावी यासाठी हासे यांनी या वर्षी मिरी रोपांची छोटी रोपवाटिका सुरू केली आहे. रोपवाटिकेत त्यांनी पेन्नीयर जातीची २०० रोपे तयार केली होती. त्यांपैकी सुमारे दीडशे रोपे शेतकऱ्यांनी नेली. अकोल्याबरोबरच शेजारच्या संगमनेर, तसेच इगतपुरी तालुक्यातही ही रोपे पोहोचली. या वर्षी तीनशे-साडेतीनशे मिरी रोपे तयार करणार असल्याचे हासे यांनी सांगितले.
काळी मिरीची लागवड म्हटले, की केरळ नाही तर कोकणची भूमी आठवते. परंतु या मसाल्याची राणी समजल्या जाणाऱ्या काळ्या मिरीचे पीक अकोले तालुक्यातील म्हाळादेवी गावातील एका निवृत्त शिक्षकाने यशस्वीरीत्या घेतले आहे. अकोलेच्या मातीमध्येही मिरी रुजू शकते. अन्य पिकांसोबत जोड पीक म्हणून तिचे उत्पादन घेता येते हेच त्यांनी यातून दाखवून दिले आहे.