कार्यकर्त्यांचे मुंडे साहेब गेले. मुंडे ‘साहेब’ होते म्हणजे काय होते? ते कोणते साहेब होते? ते कशाप्रकारचे साहेब होते?
लांबलचक आलिशान गाडीतून फिरणारे, गाडीतून उतरल्यावर आपल्याच तोऱ्यात लाखभर रुपयाच्या मोबाइलवर बोलत इकडेतिकडे न बघता तरातरा चालत जाणारे, दूर डोंगरावर वीस-पंचवीस खोल्यांच्या महालात राहणारे, स्वत:भोवती एक गूढगर्भ वलय असणारे, निवडणुकीच्या काळातदेखील ठराविक लोकांमार्फत कार्यकर्त्यांपर्यंत पैसे पोहोचवून पूर्ण निवडणूक लढवणारे, फक्त संसदेत दिसणारे (ते पण टी.व्ही.वर), धनदांडग्यांच्या आणि पेज थ्री पार्टीत रात्री १२ नंतर अवतरणारे, वर्षांतून सहा वेळा शिकायला परदेशात असणाऱ्या मुलांना भेटायला फॉरेन टूर करणारे, जनतेने आपल्या लहान मुलांना ज्यांचे हवेतले हेलिकॉप्टर कुतूहलाने दाखवावे असे राजमान्य राजर्षी साहेब गोपीनाथराव नव्हते.
‘मुंडे साहेब’ यातील साहेब म्हणजे आदरयुक्त आपुलकीची उपाधी होती. त्याला कौतुकाचा गुलकंद लावला होता. ‘साहेब’ या शब्दात आदरयुक्त ‘भीती’ नव्हती.
मुंडे साहेब म्हणजे आई, वडील, मोठा भाऊ, कुटुंबप्रमुख या अर्थाने साहेब. गरिबीमुळे, हलाखीमुळे, स्वप्नभंगामुळे, अपयशामुळे, नैराश्यामुळे, योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे, विषमतेमुळे, संधीच्या अभावामुळे खचलेल्या गांजलेल्या तरुणाईचे विसाव्याचे स्थान, तणावमुक्तीचे केंद्र, स्फूर्तीच्या सलाईनची बाटली, व्यवस्थेविरुद्धचे तक्रार निवारण केंद्र, शाबासकी मिळवावी, सांत्वन घडावे, लढ म्हणावे असा हवाहवासा वाटणारा पाठीवरचा हात. साहेब, माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे, बारसे आहे, साखरपुडा आहे, असे म्हणून हक्काने हाताला धरून हट्टाने ज्यांना घेऊन जाता येत होते आणि कितीही महत्त्वाचे काम असले तरी ‘मी नाही म्हणालो तरी तू ऐकणार आहेस का?’ असे म्हणत कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवणारे, बीडसारख्या कायम भेगा पडलेल्या जमिनीच्या शेतकऱ्यांबरोबर शेतात मांडी घालून बसून पीडा वाटून घेणारे मुंडे साहेब कार्यकर्त्यांचे ख-या अर्थाने मायबाप होते. लहानापासून वृद्धापर्यंत प्रत्येकाला आकाश कोसळल्यासारखे वाटले, क्षणार्धात जग संपल्यासारखे झाले ते गोपीनाथरावांच्या या कुटुंबप्रमुखाच्या, तारणहाराच्या स्थानामुळे. त्यांना लोकनेता म्हटले गेले हे त्यांच्याबद्दल सर्व स्तरांतील जनतेला वाटणाऱ्या प्रेमामुळे, मान्यतेमुळे.
मी मुंडेंना पहिल्यांदा पाहिले ते ८०च्या दशकाच्या सुरुवातीला. पुण्याच्या रेणुका स्वरूप शाळेच्या मैदानावर प्रमोद महाजनांनी तरुणांकरिता अटलजींचे भाषण ठेवले होते. भरदुपारी दोनतीन वाजता भाषण होते. सुरुवातीच्या वक्त्यांमध्ये गोपीनाथरावांचे भाषण झाले असे पुसटसे आठवते. अटलजी भाषणाला उभे राहिल्यावर महाजन आणि मुंडय़ांनी वही-पेन काढून अटलजींच्या भाषणातील मुद्दे लिहून घेतल्याचे आठवते. १९९५पर्यंत मुंडय़ांनी सरकारविरुद्ध बुलंद आवाज उठवला. अचाट जनसंपर्क वाढवला. झंझावाती प्रवास केला. हजारो सभा घेतल्या आणि शिवसेनेबरोबर विधानसभेचे तख्त काबीज केले. उपमुख्यमंत्री झाले आणि गोपीनाथरावांचे ‘मुंडे साहेब’ झाले. रावांचे साहेब झाले तरी ओलावा टिकून राहिला, वृद्धिंगत झाला. ब्राह्मण, मराठा, ओबीसी, दलित अशा सर्व जातींचे सारखेच प्रेम मिळालेले असे लोकनेते फार थोडे.
महाजनांच्या अकाली एक्झिटनंतर मुंडय़ांना जास्त संघर्ष करावा लागला. आपापल्या जिल्हय़ात संघर्ष करून नवनवीन नेतृत्व उदयाला येत होती. त्या नेत्यांच्यादेखील महत्त्वाकांक्षा होत्या. मुंडेंवर विकेंद्रीकरण जड जात होते. कारण महाजन असताना एकछत्री अंमल होता. मध्येच बंडाचे निशाण फडकवून काँग्रेसशी सलगी करण्याचा प्रयत्न झाला. मला वाटते, ही गोष्ट भाजपच्या मतदारांना पचवणे शक्य झाले नसते. भाजपचा परंपरागत मतदार झेंडय़ाला मानणारा आहे. मुंडेंनी बंड आवरते घेतले ते बरे झाले नाहीतर भाजपच्या इतिहासात त्यांच्या नावापुढे चुकीचा शिक्का बसला असता आणि व्यवहारवादापुढे तत्त्ववादाला गुडघे टेकायला लागले असे चित्र निर्माण झाले असते. ते चित्र भाजपच्या बायोडाटाकरिता कायमचा डाग होऊन राहिले असते.
२०१४ची विधानसभा गोपीनाथराव काबीज करणार अशी हवा होती. कार्यकर्त्यांनी राज्याभिषेकाची तयारी सुरू केली होती, पण किल्ला काबीज करण्याअगोदरच किल्लेदार गेला. महाजनांप्रमाणेच गोपीनाथरावदेखील चटका लावून निघून गेले. असे लोकमान्य नेतृत्व घडायला अनेक दशके खर्च होतात.

Story img Loader