निवेदन देण्यासाठी म्हणून आलेल्या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कुलसचिवांनी तात्काळ आपल्या दालनात बोलावून घेतले. विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाणीव त्यांना होती. त्यामुळे आलेल्या विद्यार्थ्यांना ते बसण्यासाठी सांगणार एवढय़ात त्यातील काही विद्यार्थ्यांनी कुलसचिवांच्या तोंडाला काळे फासण्यास सुरुवात केली, तर काही थेट मारायला लागले, काय होतेय ते कळण्यापूर्वीच वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी कॅमेऱ्यासह आत येऊन सारा प्रकार टिपला.. प्रसिद्धीच्या एका नशेत आंदोलनकर्ती मुले निघूनही गेली.. ज्या प्रश्नासाठी ते आले तो पुढे सुटलाच नाही.. आज बहुतेक विद्यार्थी संघटनांची आदोलने होतात, पण केवळ प्रसिद्धीपुरती! या संघटनांना नेमकं झालंय काय? विद्यार्थ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत असताना राजकीय पक्षांशी संबंधित संघटनांच्या कार्यकर्त्यांना केवळ प्रवेश प्रक्रियेतच रस जास्त दिसतो. दिखाऊ कार्यशाळा व त्यातून मिळणारी प्रसिद्धी यापलीकडे या संघटना का जात नाहीत?
आणीबाणीमध्ये विद्यार्थी संघटनांनी मोलाची कामगिरी बजावली होती. याच संघटनांमधून महाराष्ट्रात शरद पवार, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, मोहन रावले, किरीट सोमय्या, राज ठाकरे, विनोद तावडे अशा अनेकांनी राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले. नव्वदच्या दशकापासून विद्यार्थी संघटनांचा राजकीय पक्षांकडून मोठय़ा प्रमाणात गैरवापर होऊ लागला आणि विद्यार्थी चळवळ ही राजकारण्यांची बटीक बनली. चळवळीतून नेतृत्व उभे राहण्याऐवजी गुंडांच्या फौजा निर्माण होऊ लागल्या. महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष पैसा ओतू लागले. खून-मारामाऱ्यांनी महाविद्यालयीन निवडणुका गाजू लागल्या. या साऱ्यात विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक समस्या आदी मुद्दय़ांकडे दुर्लक्ष होऊ लगले. यातूनच विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांसाठीची चळवळ यामध्ये दरी निर्माण झाली. अखेर महाविद्यालयीन निवडणुकांमधील वाढती गुंडगिरी रोखण्यासाठी १९९७ मध्ये थेट निवडणुका बंद करण्यात आल्या.
तेव्हापासून विद्यार्थी संघटनांची आंदोलनेही थंडावू लागली. एकेकाळी अभाविप, एसएफआय, छात्रभारती आदी संघटना विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न घेऊन आंदोलने करायचे. महाराष्ट्र अभाविपचे अध्यक्ष असताना विनोद तावडे, राजेश पांडे यांनी थेट विधानभवनावर लाखभर विद्यार्थ्यांचा मोर्चा काढला होता. उपोषण हा शिवसेनेसाठी थट्टेचा विषय होता, तेव्हा भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मोहन रावले यांनी मुंबई विद्यापीठासमोर उपोषण केले होते.
निवडणुकांचे राजकारण संपले आणि विद्यार्थी संघटनांचे अस्तित्वही हळूहळू जाणवेनासे झाले. राजकीय पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटना आजही असल्या तरी ‘जय हो’ आणि प्रवेशाची दुकानदारी चालविण्यापुरतेच अशा संघटनांचे पदाधिकारी कार्यरत असतात. वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षणासह एकूणच शिक्षणाचा पुरता खेळखंडोबा सुरू आहे. प्रवेशासाठी लाखो रुपये उकळूनही मूलभूत सुविधा नाहीत.
शिक्षण सम्राटांची दुकानदारी जोरात सुरू असून दर्जेदार शिक्षण बेपत्ता झाले आहे. डोनेशनचा महापूर आणि पदव्यांची खैरात सुरू आहे. परदेशी शिक्षण संस्थांचे आक्रमण होऊ घातले आहे. या साऱ्यात शिक्षणाचे धोरण कोठे हरवले याचा पत्ताच नाही. बारावीच्या विज्ञानाच्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांबरोबर पालकांच्याही तोंडाला फेस आला आहे. नेमक्या अशा वेळी विद्यार्थी संघटना थंडावल्या आहेत. महाविद्यालयीन निवडणुका बंद पडल्यामुळे राजकारण्यांचाही विद्यार्थी संघटनांमधील रस संपला आहे..
पूर्वी विद्यार्थी चळवळीत काम करणाऱ्याला राजकारणात जाण्याची संधी होती. विद्यापीठात येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारणीची हिंमत निर्माण व्हावी, असे वातावरण निर्माण केले जात असे. आता प्रश्न विचारण्याची क्षमताच संपविण्याची पद्धत आहे.
नागपूरचा गोंधळ आणि बीभत्स नृत्य करणारा अध्यक्ष
संतोष प्रधान
नॅशनल स्टुम्डंटन्स युनियन ऑफ इंडिया म्हणजेच एन.एस.यू.आय. या काँग्रेसप्रणित संघटनेचे नाव सर्वसामान्यांमध्ये जाणे दूरच, नव्या पिढीतील विद्यार्थी वर्गात किती जणांना ठाऊक आहे याचेही संशोधन करावे लागेल. अलीकडेच एन.एस.यू.आय.चे नाव प्रसार माध्यमांमध्ये झळकले पण ते वेगळ्याच कारणाने. मुंबईत कोणी सूरज ठाकूर हे संघटनेचे अध्यक्ष अंगातील शर्ट भिरकावून बीभत्सपणे बेभान होऊन नाचले होते. पक्षाने त्याची गांभीर्याने दखल घेतली आणि या ठाकूरांना पदावरून दूर केले. तेव्हा एन.एस.यू.आय. ही संघटना अस्तित्वात आहे याची आठवण जुन्या काळातील अनेकांना झाली. बाकी एन.एस.यू.आय.चे कार्य बेताचेच. राहुल गांधी यांनी सूत्रे स्वीकारल्यावर युवक काँग्रेस आणि एन.एस.यू.आय.मध्ये निवडणूक पद्धत सुरू केली. बाकी आनंदीआनंदच. १९८० आणि १९९०च्या दशकात मुंबईत एन.एस.यू.आय.चा दबदबा होता. शिवसेनाप्रणित भारती विद्यार्थी सेना आणि काँग्रेसची एन.एस.यू.आय. यांच्यात तीव्र चुरस असायची. विद्यापीठ प्रतिनिधी (यू.आर.) म्हणून जास्तीत जास्त आपले निवडून यावे म्हणून उभयतांमध्ये संघर्ष असायचा. यू.आर. पळवापळवी किंवा धाकटदपटशा हे नित्याचेच. तेव्हा सत्तेत असलेल्या काँग्रेस नेत्यांकडून विद्यार्थी नेत्यांना ताकद दिली जायची. एन.एस.यू.आय.तून राज्याच्या राजकारणात पुढे आलेल्या नेत्यांमध्ये गुरुदास कामत, मुकुल वासनिक, डॉ. श्रीकांत जिचकार, सुरेश शेट्टी, डॉ. सुनील देशमुख, अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी, सुधाकर गणगणे, अविनाश पांडे ते अगदी अलीकडचे अमरजित मनहास ही यादी लांबलचक आहे.
एन.एस.यू.आय.चे नाव राज्यभर गाजले ते नागपूरच्या राष्ट्रीय अधिवेशनात झालेल्या गोंधळामुळे. राजीव गांधी हे काँग्रेसचे अ. भा. सरचिटणीस असताना त्यांच्या पुढाकाराने अधिवेशन झाले होते. या अधिवेशनासाठी देशभरातून तरुण आले किंवा आणण्यात आले. त्यांनी जो काही गोंधळ घातला त्यामुळे नागपूरकर चांगलेच हैराण होते. अधिवेशनाच्या ठिकाणी भोजन मिळाले नाही म्हणून प्रतिनिधींनी थाळ्या फेकल्याच, पण नागपूरच्या ‘रेड लाईट’ विभागातील मुलींनाही पळ काढावा लागल्याच्या बातम्या होत्या.
विझलेल्या मशाली आणि थंड छात्रशक्ती..
निवेदन देण्यासाठी म्हणून आलेल्या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कुलसचिवांनी तात्काळ आपल्या दालनात बोलावून घेतले. विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाणीव त्यांना होती. त्यामुळे आलेल्या विद्यार्थ्यांना ते बसण्यासाठी सांगणार एवढय़ात त्यातील काही विद्यार्थ्यांनी कुलसचिवांच्या तोंडाला काळे फासण्यास सुरुवात केली, तर काही थेट मारायला लागले, काय होतेय ते कळण्यापूर्वीच वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी कॅमेऱ्यासह आत येऊन सारा प्रकार टिपला.. प्रसिद्धीच्या एका नशेत आंदोलनकर्ती मुले निघूनही गेली..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-07-2013 at 04:49 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blow out flambeaus and cooled students power