गल्लीबोळात घडणाऱ्या भाई-दादा यांच्या टोळ्यांतील हाणामाऱ्यांपासून परदेशातल्या पंचतारांकित हॉटेल्स, आलिशान इमारतींमध्ये बसून आखल्या जाणाऱ्या देशविरोधी कटकारस्थानांपर्यंत मुंबईच्या माफिया जगतातील सर्व ठळक व प्रमुख घडामोडी अत्यंत नाटय़मयरीत्या मांडणारे झैदी यांचे मूळ इंग्रजी पुस्तक भन्नाट आहे. त्यामुळे ते वाचताना एखाद्या चित्रपटाची कथा तर आपण वाचत नाही ना, असा भास निर्माण होतो. (या पुस्तकावर आधारित ‘शूट आउट अॅट वडाला’ हा चित्रपटही प्रदíशत झाला आहे.) माफिया जगताचा इतिहास, त्याच्या निर्मितीमागची पाश्र्वभूमी, त्याची सुरुवात, वेगवेगळ्या टोळ्यांचा उदय, त्यांच्यातील गँगवॉर, त्यातील पोलीस-सरकार-राजकारण्यांची भूमिका, गुन्हेगारी जगताचे अर्थकारण आणि आजचे अंडरवर्ल्ड अशा अनेक मुद्दय़ांना केंद्रस्थानी ठेवून झैदी यांनी मुंबईतील अंडरवर्ल्डवर एक माहितीग्रंथच लिहिला आहे. मात्र, झैदी यांची लेखनशैली, प्रत्येक घटनेला दिलेले नाटय़मय रूप, एखाद्या कथेप्रमाणे केलेली मांडणी यामुळे हे पुस्तक केवळ माहितीचा स्रोत न बनता उत्कंठावर्धक कादंबरीही होते.
‘डोंगरी ते दुबई’चा हीरो दाऊद इब्राहिम आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दाऊदचं उगमस्थान आणि नंतरची कर्मभूमी असलेल्या डोंगरी आणि दुबई या ठिकाणांचा शीर्षकातला समावेश आणि मुखपृष्ठावरील दाऊदचे चित्र याचेच द्योतक आहे. एका प्रामाणिक पण गुन्हेगारी जगताशी चांगले संबंध असलेल्या पोलीस हवालदाराचा मुलगा आपल्या परिसराचा भाई बनतो आणि पुढे नशिबाने दिलेली संधी, नेतृत्वक्षमता आणि धूर्तपणा यांच्या जोरावर अवघ्या मुंबईचा डॉन बनतो. पुढे तो भारताबाहेर गेल्यानंतर जगातला ‘मोस्ट वॉण्टेड’ दहशतवादी बनतो आणि तरीही पाकिस्तानातल्या आलिशान महालात आरामात राहतो, अशी दाऊदची कथा या पुस्तकाचे मूळ सूत्र आहे. पण ही कथा मांडताना लेखकाने मुंबईच्या अंडरवर्ल्डचा संपूर्ण पट उलगडला आहे. मुंबईतल्या तस्करीची सुरुवात, त्यात राज्याबाहेरून आलेल्या हाजी मस्तान, करीम लाला आणि वरदराजन यांचा शिरकाव, येथे निर्माण झालेले मन्या सुर्वे, बडा राजन, अरुण गवळी, रमा नाईक, छोटा राजन हे डॉन आणि अनेक छोटय़ा-मोठय़ा दादांची भरभराट यांच्या माध्यमातून लेखकाने मुंबईतल्या गुन्हेगारी जगताचे व्यापक चित्र उभे केले आहे. टोळीयुद्धाने बरबटलेल्या ८०-९०च्या दशकात मुंबईला ‘स्वच्छ’ करण्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या चकमकी आणि या चकमकींच्या माध्यमातूनच कालांतराने उघड झालेले मुंबई पोलीस व माफियांचे संबंध यांचाही ऊहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे. या सर्वाना मात देऊन, मागे टाकून, संपवून किंवा त्यांच्याशी हातमिळवणी करून दाऊदने मुंबईवर अधिराज्य गाजवले. त्यामुळे तो या पुस्तकाचा नायक ठरतो. पण तसे करतानाही लेखकाने दाऊदमधील खलनायक लपवला नाही. मुंबई बॉम्बस्फोटांपासून २००८च्या मुंबई हल्ल्यामधील दाऊदचा सहभागही झैदी यांनी मांडला आहे. त्यामुळे दाऊद किंवा अन्य कोणत्याही डॉनचे उदात्तीकरण होत नाही. ‘या सर्वानी एकेकाळी मुंबईवर राज्य केले. म्हणून त्यांना जाणून घेणे अत्यावश्यक आहे. आजच्या मुंबईच्या असण्या-नसण्यात यांचाही वाटा आहे. त्यामुळे ते आपल्याला परके नाहीत. पण त्यांना आपलं समजून क्षमा करू नका’ हा लेखकाचा संदेश आहे. पण तो थेट िबबवण्याचा प्रयत्न झैदी यांनी केलेला नाही. उलट एका उत्कंठावर्धक पटकथेप्रमाणे पुस्तकाची मांडणी करत त्यांनी त्यात रंजकता आणली आहे.
खेदाची बाब म्हणजे, ‘डोंगरी टू दुबई’चा मराठी अनुवाद मूळ पुस्तकाच्या तुलनेत बराच कमी पडतो. सरसकट अनुवाद करण्याचा प्रयत्न, शब्दरचनेतील गोंधळ आणि पुस्तकाचे ‘मराठीकरण’ करण्यात आलेले अपयश यामुळे ‘डोंगरी ते दुबई’ वाचताना मूळ पुस्तकाएवढी रंजकता येत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर मूळ पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणातील हा परिच्छेद पाहता येईल-
”There were no furrows in brows of his henchmen, spread all over the globe. They said the United States had reaffirmed the numero uno status of their boss who, according to them, believes from depth of his twisted heart that he is on par with the president of the United States.”
त्याचा मराठी अनुवाद या पुस्तकात असा केला आहे – ‘‘जगभर पसरलेल्या दाऊदच्या मारेकऱ्यांच्या भुवया कधीही प्रश्नार्थक होत नाही.
असं म्हटलं जातं की, परत एकदा अमेरिकेने त्याची ‘गुन्हेगारी जगातील एक्का’ अशी संभावना केल्याने त्याला पार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या बरोबरीने नेऊन ठेवले आहे..’’
his henchmen या शब्दाचे भाषांतर ‘दाऊदच्या मारेकऱ्यांच्या’ असं करण्यात आलं आहे. हा अतिशय विपरीत अर्थ घेतला जाऊ शकतो. त्यापुढील वाक्यांचा आधीच्या वाक्यांशी संबंध असतानाही परिच्छेद देण्यात आल्याने आणि वाक्ये सुटी करण्याचा प्रयत्न केल्याने त्याचा अर्थ विचित्र बनला आहे. अशा बऱ्याच शाब्दिक चुका अनुवादित पुस्तकात वाचायला मिळतात. अर्थात, आधी इंग्लिश पुस्तक वाचलेल्यांना हा फरक लक्षात येऊ शकतो. ते न वाचललेल्यांसाठी ‘डोंगरी ते दुबई’ ही मुंबईच्या माफिया जगतातील अनोखी सफर आहेच.
‘डोंगरी ते दुबई’ – एस. हुसन झैदी, अनुवाद : अशोक पाध्ये,
मेहता पब्लििशग हाऊस, पुणे,
पृष्ठे – ४४०, मूल्य – ३५० रुपये.
मुंबईच्या माफियाजगताची अद्भुत सफर
मुंबई.. भारताची आíथक राजधानी. जगातलं प्रगत शहर. देशभरातून आलेल्या बेरोजगारांचे आश्रयस्थान. नामवंत, कीíतवंत उद्योजकांचे वास्तव्यस्थान..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-07-2013 at 10:34 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review of dongri te dubai