एकंदर भारतीय समाज इतिहासाविषयी इतका हळवा आणि भावनाशील असतो की, आपल्याकडे सर्वात जास्त वाद हे इतिहासाच्या बाबतीत होत असावेत. समतोल पद्धतीने, नीरक्षीरविवेकाने आणि सत्यच सांगायचे, पण सभ्य शब्दांत, अशा पद्धतीने इतिहास लिहिणारा कुणी हल्ली फार लोकप्रिय होऊ शकेल का, याविषयी जरा शंकाच वाटते. त्यातही ‘आय अ‍ॅम अ हिस्टोरियन हू युजेस द पास्ट टू इल्युमिनेट द प्रेझेंट. आय डोंट गिव्ह सोल्यूशन्स..दॅट्स नॉट माय जॉब’ असं स्पष्टपणे सांगणाऱ्या रामचंद्र गुहा यांची ‘इतिहासकार’ म्हणून असलेली लोकप्रियता केवळ भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आहे. ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे गुहा यांचे स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास सांगणारे पुस्तक प्रचंड गाजले. त्यानंतर गुहा नवीन काय लिहिताहेत, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. आता नुकताच त्यांचा Patriots and Partisans हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. यामध्ये त्यांनी २००५ ते २०११ या काळात लिहिलेल्या निबंधांचा समावेश आहे. काँग्रेस, हिंदूत्ववादी भाजप, डावे यांच्याविषयीचे निबंध ही गुहा यांच्या उदारमतवादीपणाची साक्ष देणारे आहेत. गांधी-नेहरू हा तर गुहा यांचा फारच हळवा कोपरा आहे, त्यामुळे त्यांच्यावरील लेखाचाही पुस्तकाच्या पहिल्या भागात समावेश आहे. दुसऱ्या भागातील लेख मात्र काहीसे हलकेफुलके आहेत. भारतातील द्वैभाषिक विद्वानांचा ऱ्हास का होतोय याविषयीचा सुंदर लेख आहे. याशिवाय नियतकालिकांचे संपादक, पुस्तक विक्रेते, प्रकाशन संस्था यांच्यावरील लेखांचाही समावेश आहे. वर्तमानकाळाविषयी सत्यापेक्षा तारतम्यविवेक बाळगणं ही आपली जबाबदारी असते, असं व्हाल्तेअर म्हणतो. रामचंद्र गुहा यांचं प्रस्तुत पुस्तक त्याचा चांगला नमुना आहे.

Story img Loader