सचिन तेंडुलकरएवढा मोठा ब्रॅण्ड क्रिकेटमध्ये झाला नाही. कदाचित पुढे जाऊन असंही म्हणता येईल की, ‘अ-राजकीय’ प्रांतात सचिनएवढा मोठा ब्रॅण्ड चटकन मला आठवत नाही.
हं, हे महत्त्वाचं की, ‘ब्रॅन्ड’ हा शब्द मी फक्त जाहिरातीच्या रूपातली लोकप्रियता, इतक्या अल्प अर्थाने वापरत नाही. या क्षणी सचिन हा असा ‘आयकन’ की दहापैकी आठ आई-वडिलांना आपला मुलगा ‘सचिन तेंडुलकर’ झालेला पाहायला आवडेल.
सचिन हा भारतीय क्रिकेटमधला मोझार्ट असल्यामुळे लहानपणापासून त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू’ वाढत होती. बालवयात पराक्रम करणारी मुलं आपल्याला भावतात. त्याने शाळेत जो पराक्रम केला तो अभूतपूर्व होता. धावा त्याच्या बॅटमधून पाण्यासारख्या वाहत होत्या. पण महत्त्वाचा होता तो त्याचा दर्जा. तो त्याच्या वयाच्या इतका पुढे होता की, वासू परांजपे या मुंबईच्या माजी क्रिकेटपटूने ऑस्ट्रेलियात जाऊन जाहीर केलं. ‘आमच्याकडे एक मुलगा आहे, जो १३ वर्षांचा आहे. त्याच्या वयातला तो जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे.’ वासूला तिथे कुणीतरी म्हटलंसुद्धा, ‘तू त्या वयाचे जगातले सर्व फलंदाज कुठे पाहिले आहेत?’ वासूला एवढंच सांगायचं होतं, त्या वयात त्याच्यापेक्षा इतका चांगला फक्त देवच खेळू शकतो.
बरीच मुलं लहानपणी मोठं स्वप्नं दाखवतात. पण त्यातला प्रत्येकजण ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज, आयझॅक न्यूटन, वीर सावरकर होतोच असं नाही. १६ व्या वर्षी कसोटी सामना खेळणं हा भारतीय जनमानसासाठी सुखद धक्का होता. त्यानंतर तो थबकला नाही. पण विनोद कांबळी म्हणाला, त्याप्रमाणे त्याने वर चढायला जिने नाही लिफ्ट घेतली. लक्षात घ्या १६ ते १९ या तीन कोवळ्या वर्षांत, त्याने फलंदाजीच्या सर्वात कठीण परीक्षा सी. डी. देशमुखांच्या थाटात पार केल्या. इंग्लंडच्या स्विंग-सिमच्या वातावरणात शतक ठोकताना तो चेंडू यायच्या आत फटक्याच्या सर्वोत्तम पोझिशनमध्ये चेंडूची वाट पाहत उभा राहायचा. इतकंच नाही, तर ऑफ स्टंपवरचा चेंडू कव्हर्समधून मारू की, सरळ ड्राइव्ह करू की, मिडविकेटला ड्राइव्ह करू या विचारात त्याची बॅट असायची. नंतर दक्षिण आफ्रिकेत डोनाल्डच्या उसळत्या चेंडूला पॉइंटमधून मारताना पॉइंटला असलेला जॉन्टी ऱ्होडससुद्धा काही वेळा चेंडूपर्यंत पोहोचायचा नाही. ऑस्ट्रेलियात त्याने कमाल केली. दोन कसोटी शतकं ठोकली. त्यातलं एक पर्थवर म्हणजे उसळत्या चेंडूच्या नगरीत. त्यानंतर जॉन वुडकॉक हा लंडन टाइम्सला लिहिणारा बुजुर्ग पत्रकार म्हणाला, ‘सचिनचं वर्णन सर्वोत्तम तरुण फलंदाज का केलं जातंय? त्याच्यापेक्षा वयाने मोठय़ा असलेल्या खेळाडूमध्ये त्याच्यापेक्षा चांगला कुणी आहे का? का स्वत:ला फसवताय.’ ज्या माणसाची हयात भारतीय फलंदाज वेगापासून कसे पळायचे याचं वर्णन करण्यात गेली, त्याने हे लिहिलं होतं.
इथून क्रिकेटपटू म्हणून सचिनचा ब्रॅण्ड वाढायला लागला. तो शेन वॉर्न नावाच्या क्षेपणास्त्राचा, त्याने फटाक्यातला बाण केल्यावर आभाळाला पोहोचला. त्याचवेळी साधारण त्याचं वर्ल्डटेलशी कॉन्ट्रॅक्ट झालं. तिथून कोटींची उड्डाणं सुरू झाली. आयपीएलनंतर कोटींचे आकडे, शेकडो कोटी व्हायला लागले.
पण ब्रॅण्ड वाढण्यासाठी मैदानाइतकाच मैदानाबाहेरचा परफॉर्मन्स मोठा असावा लागतो. तिथे ‘भले उसकी कमिज मेरे कमिज से सफेद क्यू’, असं इतर ब्रॅण्डसना वाटावं इतके त्याने स्वत:चे कपडे स्वच्छ ठेवले. लारा, पॉन्टिंग हे त्याचे समकालीन प्रणेते त्यांचे कपडे स्वच्छ ठेवू शकले नाहीत. टायगर वुड्स किंवा लार्न्स आर्मस्ट्राँॅगसारखे इतर खेळातले आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डस् स्वत:ला स्वच्छ ठेवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांची ब्रॅण्ड व्हॅल्यू खाली आली. सचिनच्या अख्ख्या कुटुंबाला पृथ्वीवर पाठविताना डोक्याला ‘कूलर’ लावून पाठवलेलं आहे. त्याचे एक मामा इतके डोक्याने थंड की, बर्फानेही थोडा थंडपणा त्यांच्याकडून उसना घ्यावा. सचिनने त्यांच्याकडून काही गुण घेतले. म्हणून कारकिर्दीत ३७-३८ वेळा खोटा बाद देऊन (त्यात बऱ्याचदा त्याची शतकं हुकली.) त्याने कधीही आदळआपट केली नाही. नाराजीचं एखादं नैसर्गिकपणे येणारं चेहऱ्यावरचं एक्स्प्रेशन सोडलं तर काही प्रतिक्रिया त्याने मैदानावर दिलेली नाहीच, पण ड्रेसिंगरूममध्ये जाऊन साधी कप-बशीसुद्धा चिडून फोडलेली नाही. लक्षात ठेवा, गल्लीत आऊट दिल्यावर बॅट तोडायचे पराक्रम आपल्यापैकी कितीजणांनी केले असतील! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक चुकीचा निर्णय, मॅच फिरवू शकतो किंवा करिअर बनवू किंवा मोडू शकतो.
सचिनने स्वत:हून वाद कधी निर्माण केलेच नाहीत. जे इतरांमुळे झाले, त्याला प्रत्युत्तर देऊन वादात तेलाचा थेंबही टाकला नाही. तेंडुलकर आडनावाचा माणूसही बाहेर कॉलर वर करून फिरतो, पण तेंडुलकर कुटुंबीयांनी स्वत:ला प्रकाशझोतापासून दूर ठेवलं. गेल्या २४ वर्षांत तेंडुलकर कुटुंबीयांच्या किती मुलाखती तुम्ही वाचल्या किंवा ऐकल्या? मी पुढाकार घेऊन पत्रकारांतर्फे सचिनचा सत्कार लतादीदींच्या हस्ते २००५ साली केला होता, तेव्हा संपूर्ण तेंडुलकर कुटुंब प्रथम स्टेजवर आलं तरीही अजित तेंडुलकर आला नाही. त्याने मला सांगितलं, ‘मला तू स्टेजवर बोलावशील तर आयुष्यभर मी तुझ्याशी बोलणार नाही. त्याचा सत्कार मी प्रेक्षकांत जाऊन केला. आजच्या काळात प्रसिद्धीमाध्यमं विशेषत: चॅनेल्स, सेलिब्रिटीच्या मोलकरणीलाही सोडत नाहीत; तिथे हा ठरवून टाळलेला कौटुंबिक प्रकाशझोत सचिनचा ब्रॅण्ड वाढवून गेला. कारण वैयक्तिक गोष्टीबद्दल गूढता कायम राहिली. सचिनने फारसे सत्कार करून नाही घेतले, ना फिती कापल्या. शोज, लग्नं, उद्घाटनं यामार्गे फिल्मी मंडळी रग्गड पैसे कमवतात. सचिन त्या उद्योगात पडला असता तर आजच्या दुप्पट त्याची मिळकत झाली असती. त्याने लक्ष फक्त क्रिकेटवर केंद्रित केले आणि रुबाबात चालत राहिला. पैसा त्याच्यामागे धावत गेला. आयपीएलच्या ग्लॅमर आणि पैशाने अनेक क्रिकेटपटू बहकले, पण विश्वामित्राने सचिनकडून धडा घ्यावा इतका त्याने संयम दाखवला.
आणि सगळ्यात महत्त्वाची आहे, त्याची सार्वजनिक जीवनातली वागणूक! तिथे मी त्याला कधी चुकताना पाहिलंच नाही. उद्धटपणा नाही. फालतू इगो तर नाहीच नाही. लंडनला त्याच्या वडिलांच्या सीडीच्या कार्यक्रमाच्या वेळी एका खोलीत सुनील गावसकर, दुसऱ्या खोलीत सचिन होता. दोघांची गाठ घालायची होती. कुणी कोणाकडे जायचं? एक माजी सम्राट, एक आजचा शहेनशहा! कुठलाही इगो न दाखविता सचिन उठला आणि मला म्हणाला, ‘चल, सुनील सरांकडे जाऊ या.’ एकदा सचिन आमच्या घरी आला होता, तेव्हा सारा- त्याची मुलगी लहान होती आणि तिला ताप होता. कुठून तरी बातमी पसरली. बाहेर २००-२५० चा मॉब! वात्रट मुलं त्याच्या गाडीवर उडय़ा मारतायत. मी पोलिसांना बोलावलं. सचिन मला म्हणाला, त्यांना नाराज नको करू या. मी त्या प्रत्येकाला सही देतो आणि त्याने दिल्या आणि मी हे वारंवार पाहिलंय. बीकेसीच्या एमसीएत सुरुवातीला सरावाला जाताना मालुसरे नावाच्या सिक्युरिटीने त्याला गाडी वर पार्क करू दिली नाही. त्याने हुज्जत न घालता गाडी कारपार्कमध्ये नेली. तिथून किट बॅग घेऊन वर आला. असं दोन-तीन दिवस झाल्यावर मॅनेजर अजय देसाईला कळलं. त्याने त्याच्या गाडीची योग्य जागी सोय केली, पण सचिनने कधी सांगितलं नाही.
म्हणून ब्रॅण्ड सचिन हा सोन्याचा दागिना ठरलाय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा