दिगंबर शिंदे digambar.shinde@expressindia.com
शेतात औतकामासाठी बैलांचा वापर पूर्वीपासूनच केला जातो आहे. शेतीमधील विविध कामांसाठी लागणारे पशुधन अलिकडच्या यांत्रिकीकरणामुळे कमी होत चालले आहे. पशुधन वाचविणे ही काळाची गरज आहे. कारण यांत्रिकीकरण हे मोठे क्षेत्र असलेल्या शेतकरी वर्गालाच शक्य आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर पुन्हा एकदा खास माणदेशाची ओळख असलेल्या खिलार जातीच्या बैलांना मागणी वाढली आहे. आटपाडी, सांगोला, खटाव, माण, मंगळवेढा या माणदेश अशी ओळख असलेल्या भूप्रदेशावर या जातीचे संगोपन, खरेदी-विक्री मोठय़ा प्रमाणात होते. बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर या जातीची पैदास केवळ शर्यतीसाठीच होणार असे नाही, तर शेतीच्या आधुनिकीकरणात शिरलेल्या ट्रॅक्टर संस्कृतीलाही यामुळे काही प्रमाणात आळा बसेल. ज्यामुळे पशुधन विकासाला चालना मिळण्याबरोबरच शिवारात नैसर्गिक खतांचे प्रमाणही वाढणार असून त्याचा फायदा विषमुक्त शेतीसाठी उपयुक्त ठरणारा आहे.
मानव जातीच्या विकासामध्ये गोधनाचे खूप महत्त्व आहे. पूर्वी कुटुंबाकडे असणाऱ्या गायींच्या संख्येवरून त्यांची श्रीमंती मोजली जात होती. गोसंख्येनुसार त्यांना उपाधी देखील बहाल केली जायची. साधारणत: पाच लाख गायी सांभाळणाऱ्या गोपालकास उपनंद, १० लाख गायी सांभाळणाऱ्या गोपालकास नंद आणि एक कोटी गायी सांभाळणाऱ्या गोपालकास नंदराज संबोधले जायचे. महाभारतातील पांडवांकडे प्रत्येकी आठ लाख देशी गायींचे कळप असल्याची आख्यायिका आहे. त्यातील नकुल व सहदेव हे दोघे पशुवैद्य होते. या गायींची देखभाल त्यांच्याकरवी होत असे. भारतात पूर्वीपासून विविध वर्गातील विविध प्रजातीचे पशुधन आढळून येत आहे. त्यापैकीच खिलार एक आहे.
साधारणपणे १५ व्या शतकापासून निजामशाहीच्या काळात खिलार बैलांची तोफा तसेच बंदुका व इतर अवजड वस्तूंचे दळणवळण करण्यासाठी वापर होत असे. खिलार प्रजातीच्या गोवंशाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोठय़ा प्रमाणावर झाला. लाल महालातील छत्रपती शिवाजी महाराजांचे खिलार बैलांसोबतचे शिल्प याची साक्ष देते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रातील इतर संस्थानिकांनी खिलार बैलांच्या प्रचार-प्रसार व प्रसिद्धीस गती दिली. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खिलार बैलांचे वास्तव्य आढळून येऊ लागले. मुख्यत्वेकरून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, यासह नजीकच्या कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातही या बैलांची संख्या सर्वाधिक आढळून येते. महाराष्ट्राच्या सीमेलगत दक्षिणेकडे कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, बागलकोट या जिल्ह्यांत देखील खिलार गोवंशाचे मोठय़ा प्रमाणावर संगोपन केले जाते. या भागातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता पर्जन्यमान अतिशय कमी आहे. चाराटंचाईही काही प्रमाणात आढळून येते. परंतु, अशाही प्रतिकूल परिस्थितीत येथील पशुपालकांनी खिलार प्रजातीचे संगोपन आणि संवर्धन मोठय़ा जिद्दीने व उमेदीने केले आहे. परिणामी, महाराष्ट्राच्या पशुधनाचे भूषण म्हणून गौरव होणाऱ्या खिलार बैलांचे संवर्धन आणि संगोपन आगामी काळातही तितक्याच उमेदीने करणे गरजेचे ठरणार आहे.
जातिवंत खिलार जनावरांची पैदास वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. तथापि काळानुरूप आपापल्या भौगोलिक परिस्थितीनुसार, गरजेनुसार व आवडीनुसार गोपालकांनी या मूळ खिलार प्रजातीत बदल केले. त्याला स्थानिक नाव दिले. मुळात खिलारच्या चार मुख्य उपजाती मानल्या जातात.
* हनम किंवा आटपाडी महल खिलार : ही प्रजाती पूर्वीच्या मुंबई राज्यात आढळते व दक्षिण भारतातही या प्रजातीचे वास्तव्य आढळून येते.
* म्हसवड खिलार : ही प्रजाती सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या आसपासच्या भागात आढळून येते.
* तापी खिलार : ही प्रजाती सातपुडा पर्वतरांगांच्या प्रदेशात म्हणजेच जळगाव, धुळे व खानदेशात आढळून येते.
* नकली खिलार : ही प्रजाती खिनदेशाच्या आसपासच्या भागात आढळून येत होती. तथापी आजच्या घडीला खानदेशातील खिलार जनावरांची संख्या कमी होऊ लागली आहे.
सांगली, सातारा व सोलापूर हा भाग खिलार गोवंशाच्या उत्पत्ती व संवर्धनाचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील पशुपालकांनी आपल्या आवडीनुसार आणि भौगोलिक परिस्थितीनुसार खिलार प्रजातीच्या वंशामध्ये पिढीगणीक काही बदल घडवून आणले आहेत. त्यातून या प्रजातीच्या एकूण नऊ उपजाती तयार झाल्या आहेत. यामध्ये आटपाडी, म्हसवड, कोसा, नकली, पंढरपुरी, धनगरी, ब्राह्मणी, डफळय़ा, हरण्या या जातींचा समावेश आहे.
शेतात औतकामासाठी बैलांचा वापर पूर्वीपासूनच केला जातो आहे. शेतीमधील विविध कामासाठी लागणारे पशुधन अलिकडच्या यांत्रिकीकरणामुळे कमी होत चालले आहे. पशुधन वाचविणे ही काळाची गरज आहे. कारण यांत्रिकीकरण हे मोठे क्षेत्र असलेल्या शेतकरी वर्गालाच शक्य आहे. कुटुंबसंख्या वाढत गेली तसे जमिनीचे क्षेत्र कमी होत गेले. या कमी क्षेत्रासाठी ट्रॅक्टर घेणे परवडणारे तर नाहीच, पण सामूहिक शेतीची संकल्पना कागदावर कितीही छान वाटत असली तरी गावकुसातील भावकी, कलह यामुळे ही योजना यशस्वीतेच्या दृष्टीने अपयशीच ठरण्याचा धोका अधिक आहे. यामुळे कमी क्षेत्र असलेल्या कुटुंबांना आजही शेतीच्या कामासाठी पशुधनावरच विसंबून राहावे लागते.
ही गरज मुबलक आणि काटक प्रजातीच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकेल. खिलार जात ही चपळ व काटक म्हणून ख्यातकीर्त आहे. यामुळे या जातीच्या बैलांना मागणीही कायम राहिली आहे. केवळ खिलार जनावरांच्या बाजारासाठी सांगोला, खरसुंडी येथील जनावरांचे बाजार प्रसिद्ध आहेत. खरसुंडी व म्हसवडच्या यात्रेदरम्यान होणाऱ्या बाजारात कोटय़वधींची उलाढाल खिलार जातीच्या बैलांच्या खरेदी विक्रीतून होते.
नैसर्गिक परिस्थितीमुळे खिलार ही बैलाची जात काटक व चपळ आहे. यामुळे या जातीच्या खोंडांना पूर्वीपासून शेतीच्या कामासाठी प्राधान्य दिले जाते. चपळपणामुळे शर्यतीत या जातीचा प्रामुख्याने वापर केला जातो. देखणेपणा, चपळता आणि काटकपणा यामुळे या जातीला शेतकऱ्यांमध्ये वेगळेच स्थान आहे. हा वंश वाढावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
– डॉ. व्यंकटराव घोरपडे, निवृत्त सहायक आयुक्त पशुसंवर्धन.