जातिव्यवस्थेची घट्ट मुळे रुतलेल्या खेडय़ांची ‘एक गाव एक वस्ती’ अशी पुनर्रचना करण्याची चळवळ या देशात उभी राहू शकत असेल, तर त्यापुढे शाळेच्या दाखल्यावरून जात हद्दपार करणे ही फार क्षुल्लकबाब ठरू शकेल. त्याची चर्चा तरी करण्याची तयारी आहे का, हा खरा प्रश्न आहे.
भारिप-बहुजन महासंघाचे नेते आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शाळेच्या दाखल्यावरून जात हद्दपार करा आणि राखीव मतदारसंघातून लोकसभा व विधानसभेवर निवडून जाण्याचे राजकीय आरक्षण बंद करा, अशा दोन मागण्या करून एकाराजकीय व सामाजिक चर्चेला वाट मोकळी करून दिली आहे; परंतु त्याचे परिणाम काय होणार, शाळेच्या दाखल्यावरून जात नष्ट केली, तर जातीयता किंवा जातीय व्यवस्था संपणार आहे का, अथवा संपविण्याची भारतीय समाजाची मानसिक तयारी होणार आहे का, जातीय निकषावर आधारित सामाजिक आरक्षणाचे काय करायचे, याबद्दल प्रकाश आंबेडकर जाणीवपूर्वक मूक राहण्याचे पसंत करतात असे दिसते.
विकासाच्या प्रक्रियेत एखाद्या मागे राहिलेल्या किंवा मागे ठेवलेल्या समाजाला पुढे येण्यासाठी देण्यात आलेल्या सामाजिक आरक्षणाचा आज फेरविचार करण्याची आवश्यकता आहे का, हाही मुद्दा यानिमित्ताने पुढे आला आहे. मग आरक्षण कशाच्या आधारावर असावे? तर आर्थिक निकषावर, कारण त्याचा सर्वच समाजांतील गरिबांना लाभ होईल, असा एक युक्तिवाद केला जातो. त्यातून आणखी काही प्रश्न निर्माण होतात. आर्थिक निकषावर आरक्षण दिले, तर ज्यांच्यावर सामाजिक अन्याय झाला आहे, त्यांना न्याय मिळण्याची हमी आहे का आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सामाजिक विषमतेचे मूळ आर्थिक विषमतेत आहे की आर्थिक विषमतेचे मूळ सामाजिक विषमतेत आहे? उदाहरणार्थ, सर्व अस्पृश्य गरीब आहेत, परंतु सर्व गरीब अस्पृश्य आहेत का? आणखी असे की, आरक्षण कधी संपणार, असा एक नेहमी प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र जातीयता कधी संपणार, हा प्रश्न कुणालाच पडत नाही. आरक्षणाच्या निकषाचा फेरविचार करताना या प्रश्नांना विचारात घ्यावे लागेल, परंतु चर्चा व्हायला पाहिजे.
भारतातील जातिव्यवस्था व अस्पृश्यता यावर गेल्या शंभर-दीडशे वर्षांपासून खल सुरूआहे. अजून हा विषय संपलेला नाही, परंतु त्यात बरीच सुधारणा झाली आहे किंवा होत आहे, असे म्हणण्यास वाव आहे. मात्र समाजव्यवस्था छिन्नविच्छिन्न करणारी विषमतामूलक ही जातीयता मुळापासून संपली पाहिजे. आता काही प्रमाणात जातीयता संपली, असे सांगितले जाते. हा फसवा प्रचार आहे. औद्योगिकीकरणामुळे व नागरिकीकरणामुळे अस्पृश्यता कमी झाली आहे, जातीयता संपलेली नाही. जाती अस्तित्वात असताना जातीयता संपली असे कसे म्हणता येईल? जाती सर्वानी टाकून दिल्या आहेत का? वस्तुस्थिती तशी नाही. जातीय भेदाभेद काही प्रमाणात कमी झाला असेल, परंतु जातिप्रथा कायम आहे. म्हणजे उदाहरणार्थ, एखाद्या शहरात एक मागासलेला व एक बिगरमागासलेला एकाच कंपनीत किंवा सरकारी खात्यात नोकरी करतात, एकत्र बसतात-उठतात, सहभोजन करतात, त्यांचा आर्थिक स्तरही जवळपास समान आहे; परंतु ते दोघे जेव्हा आपापल्या गावात जातात तेव्हा बिगरमागासाचे साधे घर असले तरी ते गावकुसाच्या आत बांधले जाते, मागासाचा बंगलाही गावकुसाच्या बाहेरच उभा राहतो. मध्ये सामाजिक प्रतिष्ठा जपणारी वेस असते. महाराष्ट्राच्या ४३ हजार खेडय़ांमध्ये जातवाडय़ांचे आणि जातपाडय़ांचे हे सांगाडे अजूनही मजबूत आहेत.
समाजात उच्चनीचतेचा भाव उत्पन्न करणारी जातीय व्यवस्था नष्ट झाली पाहिजे, अशी सैद्धांतिक मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. दु:खाचे मूळ शोधा आणि ते नष्ट करा म्हणजे दु:खही आपोआप संपेल, या बुद्धवचनाप्रमाणे त्यांनी जातिव्यवस्थेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे. बाबासाहेबांनी पहिल्यांदा लेखणी उचलली आणि चालविली ती भारतातील जातिव्यवस्थेवर. १९१६ मध्ये त्यांनी ‘भारतातील जाती’ या शोधनिबंधात जातिव्यवस्थेचा उगम, रचना आणि विकास याची मांडणी केली आहे. भारतातील जातिव्यवस्थेचा स्त्रियांवरही किती घोर अन्याय झाला आहे, याची चर्चा त्यात केली आहे. स्त्रियांसंबंधीच्या सती, सक्तीचे वैधव्य आणि बालविवाह या अनिष्ट प्रथांचे मूळही जातिव्यवस्थेत असल्याचे बाबासाहेबांनी दाखवून दिले आहे.
निरनिराळ्या काळांत, निरनिराळ्या अवस्थेत काही संस्था जन्माला येतात, काही संपतात, काही टिकतात; परंतु भारतातील जातिव्यवस्था जन्माला कशी आली, त्यापेक्षा ती हजारो वर्षे टिकली कशी याच्या मुळाशी बाबासाहेब जातात. टोळ्याटोळ्यांनी वास्तव्य करणाऱ्या आदिम समाजव्यवस्थेत स्त्रिया व पुरुष यांची समान संख्या राखण्याचा प्रयत्न केला जाई. टोळीतील एखादा पुरुष मेला, तर अतिरिक्त ठरणारी स्त्री धोकादायक ठरू नये म्हणून त्या पुरुषाच्या चितेवर तिला जाळण्याची व टोळीतील स्त्री-पुरुष संख्या समान ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. सती प्रथेचे मूळ त्यात सापडते. पुढे जिवंत स्त्रीला जाळणे हा क्रूरपणा असल्याची भावना जागू लागली, त्या वेळी मग त्या स्त्रीवर सक्तीचे वैधव्य लादले जाऊ लागले. आता एखादी स्त्री मेली, तर अतिरिक्त ठरणाऱ्या पुरुषाचे काय करायचे? स्त्रीच्या शोधात तो बाहेर गेला, तर आपल्या टोळीला तोही धोकादायक ठरू शकतो, म्हणून त्याने पुढचे आयुष्य ब्रह्मचारी म्हणून जगावे, असे ठरले; परंतु त्याचे पालन करणे अगदीच अवघड झाले. मग त्याचे वयात न आलेल्या मुलीशी लग्न लावून देणे हा पर्याय पुढे आला. याचा अर्थ बालविवाह प्रथेचीही पाळेमुळे पुन्हा जातीय व्यवस्थेतच सापडतात. जातीअंतर्गत विवाह पद्धती आणि त्यातून रक्तसंकरणाला घालण्यात आलेली बंदी यामुळेच जातिव्यवस्था टिकून राहिली, अशी बाबासाहेब मांडणी करतात. प्रसिद्ध इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेच्या इतिहासात आंबेडकरांच्या संशोधनाला पुष्टी देणारी विवाह संस्थेच्या उत्क्रांतीची चर्चा केली आहे. टोळीच्या बाहेर कोणत्याही कारणाने स्त्री अथवा पुरुष जाणार नाही याची दक्षता घेतली जात होती, असे राजवाडे यांनी आपल्या संशोधनात नोंद करून ठेवले आहे. म्हणजे टोळीचे हित जपण्यासाठी जातीच्या बाहेर स्त्री व पुरुषाला विवाह करण्याची बंदी घातली गेली. त्यातून जातिव्यवस्था घट्ट होत गेली. आज तरी कुठे बदल झाला आहे? पाच-दहा टक्क्यांचा आंतरजातीय विवाहाचा अपवाद वगळला, तर आजही जातीतच विवाह होतात. वर्तमानपत्रात जातीच्या नावानेच वधू-वर पाहिजेत, अशा जाहिराती दिल्या जातात. त्यात जातीची अट नाही, अशी एखादी जाहिरात असते, पण खाली एससी-एसटी क्षमस्व असेही लिहिलेले असते. अशी आणखी काही उदाहरणे देता येतील. अखंड भारताच्या स्वातंत्र्याची मागणी असताना, अनेकांनी त्यासाठी बलिदान दिले असताना भारताची फाळणी का झाली? त्याचप्रमाणे अखंड मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची मागणी असताना एकाच विद्यापीठाची आंबेडकर विद्यापीठ व रामानंदतीर्थ विद्यापीठ अशी फाळणी का करण्यात आली? या शतकातील सर्वात अमानुष व क्रूर घटना खैरलांजी हत्याकांडामागची कोणती मानसिकता होती? त्यावरही चर्चा व्हायला पाहिजे.
बाबासाहेब आंबेडकर जातिव्यवस्थेचे मूळ शोधून थांबले नाहीत, तर त्याच्या उच्चाटनाचीही तात्त्विक व व्यावहारिक मांडणीही त्यांनी केली आहे. ‘भारतातील जाती’ या शोधप्रबंधानंतर १९३६ मध्ये त्यांनी ‘जातिप्रथेचे विध्वंसन’ हे पुस्तक लिहिले. मुळात लाहोरच्या जात-पात तोडक मंडळाच्या सभेत न झालेले त्यांचे हे भाषण नंतर पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात आले. शाळेच्या दाखल्यावरून जात हद्दपार करा, अशी मागणी करीत असताना व त्याचे समर्थन करीत असताना बाबासाहेब आंबेडकर नीट समजून घेतले पाहिजेत. त्यांनी जात म्हणजे काय, याचे एका वाक्यात वर्णन केले आहे. जाती समूह म्हणजे स्वत:पुरते व स्वत:च्या ध्येयापुरते जगणारे अनेक युद्धखोर गट होय. जातिव्यवस्था हे केवळ श्रमांचे विभाजन नाही, तर ते श्रमिकांचेही विभाजन आहे आणि ते वंशपरंपरागत आहे, हे विदारक सत्य त्यांनी आपल्या नजरेस आणून दिले. विशेष करून वर्गयुद्ध करायला निघालेल्या भारतातील मार्क्सवाद्यांच्याही त्यांनी ही बाब लक्षात आणून दिली, परंतु ही जोखमीची सामाजिक लढाई लढण्यास मार्क्सवादी अपयशी ठरल्याचे दिसते. ‘भारतातील जाती’ याच निबंधात, बंदिस्त वर्ग म्हणजे जात, असे त्यांनी म्हटले आहे. म्हणजे जातीच्या भिंतीच्या आत वर्ग बंदिस्त आहेत. जातीच्या भिंती तोडल्याशिवाय वर्गसंघर्षही करता येणार नाही याकडे भारतातील मार्क्सवाद्यांनी लक्ष दिल्याचे दिसत नाही. अर्थात बाबासाहेबांना वर्गसंघर्षही नको होता. त्यांनी भारतीय समाजाच्या पुनर्रचनेसाठी बुद्धाची करुणा पुढे केली. आता जातिप्रथा नको, ती वाईट आहे, असे म्हणणाऱ्या सुधारणावाद्यांना बाबासाहेबांनी प्रश्न विचारला होता की, मग तुमचा आदर्श समाज कोणता? त्याचे उत्तर बाबासाहेब स्वत:च देतात की, स्वातंत्र्य, समता व बंधुत्वावर आधारलेला समाज हा माझा आदर्श समाज असेल आणि मग जातिअंताची मांडणी करताना जातिव्यवस्था नष्ट करण्याचा आंतरजातीय विवाह हाच खरा उपाय असल्याचे ते सांगतात. आंतरजातीय विवाहामुळे रक्तसंकरणाची प्रक्रिया सुरू होईल. रक्ताच्या मिश्रणाने केवळ सगेसोयरे असल्याची भावना उत्पन्न करता येऊ शकेल आणि नातेसंबंधाची ही भावना परमोच्च बनल्याशिवाय जातीने निर्माण केलेली वेगळेपणाची वा शत्रू असल्याची भावना लोप पावणार नाही.
म्हणजे भारतातील जातिव्यवस्थेचा उगम कसा झाला ते शोधताना ती व्यवस्था टिकविणारी संस्था कोणती? तर विवाह संस्था, ती नाहीशी करण्याचा विचार बाबासाहेबांनी मांडला आहे. आज सक्तीचे वैधव्य, स्त्री-भ्रूणहत्या, बालविवाह या जुनाट व अनिष्ट प्रथांची आपणास घृणा वाटते, परंतु या सर्व अमानवी प्रथांचे मूळ असलेल्या जातिव्यवस्थेबद्दल आपणास तेवढा तिरस्कार वाटतो का, हा खरा प्रश्न आहे. १९७० ते १९८० च्या दरम्यान महाराष्ट्रात ‘एक गाव, एक पाणवठा’ ही चळवळ बरीच गाजली, वाजली आणि संपली. आता घराघरांत नळ आले, पाणवठय़ावर पाणी भरायला कुणी जात नाही; परंतु आधी म्हटल्याप्रमाणे जातिव्यवस्थेची घट्ट मुळे रुतलेल्या खेडय़ांची ‘एक गाव एक वस्ती’ अशी पुनर्रचना करण्याची चळवळ या देशात उभी राहू शकत असेल, तर त्यापुढे शाळेच्या दाखल्यावरून जात हद्दपार करणे ही फार क्षुल्लकबाब ठरू शकेल, परंतु त्याची चर्चा तरी करण्याची तयारी आहे का, हा खरा प्रश्न आहे.
‘जातिप्रथेचे विध्वंसन’ या भाषणाच्या सुरुवातीलाच बाबासाहेब आंबेडकर यांनी एच. डुमंड या विचारवंताची काही वचने उद्धृत केली आहेत. ती अशी- जो विवेक करणार नाही, तो धर्माध होय. जो विवेक करू शकत नाही, तो मूर्ख होय. जो विवेक करण्याचे धाडस करीत नाही, तो गुलाम होय.
जात व्यवस्थेतून व मनातून हद्दपार करायची की केवळ कागदावरून, ही चर्चा करताना बाबासाहेबांनी केलेली जातिअंताची सैद्धांतिक मांडणी विचारात घ्यावी लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा