डॉ. वृषाली किन्हाळकर
साधारणत: मला आठवतं तसं मराठवाड्यामध्ये माझ्या लहानपणी बायकांच्या जगण्याची पद्धत अतिशय शांत, समाधानाची आणि घरातील सगळ्याच गोष्टींकडे मन:पूर्वक लक्ष देण्याची होती. बायकांचे शिक्षण फारसे झालेले नसायचे. अपवाद काही घरातील स्त्रिया शिक्षिका असत. मी पहिलीमध्ये जेव्हा शाळेत जात होते तेव्हा आमच्या कॉलनीतील खान बाई आम्हा कॉलनीतील सर्व मुलांना सोबत घेऊन शाळेत चालत जायच्या. ते साल साधारणत: १९६४ असावे. शाळेमध्ये गणवेशाची पद्धत नव्हती. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि इतर काही विशेष दिवशी मात्र बाई, गुरूजी, विद्यार्थी गणवेश घालत असतं. त्या काळात या मुस्लिम बाई शिकलेल्या होत्या आणि नोकरी करत होत्या. विशेष म्हणजे त्या मराठीतून आम्हाला शिकवत होत्या. त्याकाळातील बायकांच्या जगण्याचे काही विशेष मला आठवतात.

कॉलनीमध्ये कोणाच्याही घरी पाहुणे येणार असतील तर कॉलनीतील इतर शेजारी किंवा वाड्यातील इतर शेजाऱ्यांना ती गोष्ट आपुलकीची वाटत असायची. सर्व बायका घरातील कामांमध्ये प्रेमाने मदत करत असायच्या. आणि एकमेकांच्या घरी वस्तू उसन्या मागण्याची पद्धत होती. म्हणजे कधी शेजारची मुलगी आमच्या घरी येई आणि वाटीभर डाळ मागत असे. काही दिवसांनंतर वाटीपेक्षा जास्तीची डाळ तिची आई परत करत असे. उसने मागताना कोणालाही कमीपणा वाटत नसे. त्याकाळी फारशी खरेदी कोणाच्या घरी होत नसे. कपड्यातील किंवा घरातील एखाद्या वस्तूची खरेदी याचे अप्रुप असे. एखाद्या घरी गोदरेजचे कपाट येणार असेल तर त्याची चर्चा महिनाभर चालत असे. आणि मग त्या गोदरेजच्या कपाटाचा आनंद सगळ्या वाड्याला होत असे. त्या काळी घरामध्ये सोफासेट, गोदरेजचे कपाट किंवा दाराशी स्कूटर या गोष्टी म्हणजे श्रीमंतीचे लक्षण होते. बहुतेक सगळेच पुरुष सायकल वापरत असत. बहुतेक सगळी मुले शाळेत चालतच जात असत. आणखी एक छान गोष्ट म्हणजे एखादीला तिच्या नवऱ्याने किंवा भावाने नवीन साडी आणली की त्या साडीची घडी मोडायला मैत्रिणीला देणे हा एक लोभस प्रकार तेव्हा होता. घडी मोडायला मैत्रिणीला देणे हा एक मान समजला जाई. यामधून शेजाऱ्यांच्या बद्दलची एक सौहार्दाची, सहकार्याची भावना जाणवत असे.

psychiatrist sexually abused nearly hundred women in Hudakeshwar area
नागपूर : खळबळजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषण…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nagpur female missing
उपराजधानीतून वर्षभरात ५५९ मुली-महिला बेपत्ता, बेपत्तांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
Female officer of provident fund office assaulted Shivajinagar police files case against businessman
भविष्य निर्वाह कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवाजीनगर पोलिसांकडून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
priti karmarkar
स्त्रीप्रश्नांविषयी आग्रही आणि संवेदनशीलही!
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’
survey licenses for qualified hawkers are stalled
पिंपरी : डिजिटल स्वाक्षरीअभावी दोन वर्षांपासून परवान्यांंचे वितरण रखडले

दुपारच्यावेळी कधीतरी कल्हईवाला येत असे. वाड्यात समोरच्या एका रिकाम्या जागेत तो त्याचा पसारा मांडून बसत असे. आणि बायका घरातील भांडी कल्हईसाठी आणून देत असत. त्याकाळात स्वयंपाक घरामध्ये पितळीची भांडी जास्त असायची. त्यांना कल्हई केली की ती स्वच्छ चमकायची. मोठ-मोठी पातेली, कढया आणि पराती यांची कल्हई होत असे. स्वयंपाकासाठी ओटा फारसा नसायचा. खाली बसूनच स्वयंपाक करत असत. घराच्या मागच्या अंगणात एकच नळ असायचा, काही ठिकाणी आड असायचा. साधारणत: १९७४-७५ साली बाथरुम-संडास घरातच आले. बऱ्याचशा घरांमधून मागचे अंगण नाहीसे झाले. रेडिओ घराघरामध्ये आला होता आणि घरपोच लायब्ररी नावाचा प्रकार सुरू झाला. एखादा मुलगा पिशवीमध्ये मासिके, पुस्तके घेऊन चालत किंवा सायकलवर घरोघरी जात असे. अतिशय कमी वर्गणीमध्ये पुस्तकं, मासिकं वाचायला मिळत. त्या काळामध्ये बायका भरपूर वाचन करत असत. मुलेही वाचण्यात सहभागी होत. काही बायका महिला मंडळांमध्ये जात असत. एकमेकींना कपड्यांवरच्या पेंटिग्ज शिकवत असत. विणकाम, भरतकाम, स्वेटर विणणे यांचा एक मोसम असायचा. आणि एक अतिशय रंजक गोष्ट म्हणजे चैत्र-गौरीचे हळदी-कुंकू. घराघरातून चैत्र-गौर बसवली जायची. आणि तिच्याभोवती मातीचे ढिगारे बनवून त्यावर अळीव पेरले जायचे. दोन-तीन दिवसांत छान धान्य उगवून यायचे. आणि मग त्या हिरवळीच्या डोंगरांवर छोट्या-छोट्या बाहुल्या ठेवून छानसा देखावा निर्माण केला जायचा. पाण्याचा (तळे वगैरे) साठा दाखवण्यासाठी मातीच्या खाली आरसा ठेवला जायचा. आणि पाण्याचे दृश्य निर्माण केले जायचे. असे सुंदर देखावे तयार करण्यासाठी स्त्रियांची एक निरोगी स्पर्धा असायची. सगळ्या जणी एकमेकींना मदत करत असत. आणि मग ज्या दिवशी हळदी-कुंकू असेल त्यादिवशी कैरी-हरभऱ्याची वाटली डाळ आणि पन्हं सर्वांना दिलं जाई.

उन्हाळ्यामध्ये कागदी पुठ्ठे आणून त्यामध्ये सापशिडीचा खेळ तयार करणे, चंपकचा खेळ तयार करणे हे असं मुलांना घराघरांमधून शिकवलं जायचं. ऊठसूठ प्रत्येक गोष्ट विकत आणण्याकडे कल नव्हता. हीच गोष्ट दिवाळीत आकाश कंदील आणि आरास करण्याची. घरातील मोठी माणसंच आकाश कंदील आणि आरास करत असत असल्यामुळेच आपोआपच मुलांवर संस्कार होत असायचा. आणि उन्हाळ्याच्या सुटीमध्ये पापड-शेवया, कुरडया तयार करणे हा एक तसा मनोरंजकच प्रकार होता. आणि सगळ्याच स्त्रिया एकमेकींना मदत करत असल्यामुळे कोणालाही या कामाचे ओझे वाटत नसे. प्रत्येक घरात चार ते पाच मुलं, आजी-आजोबांपैकी एखादे तरी असायचे. बेडरूम नावाचा प्रकार नव्हता. आणि कोणीही, कोणाच्याही घरी केव्हाही जाऊ-येऊ शकत असे. प्रायव्हसी, स्पेस किंवा अपॉईंटमेंट हे प्रकार नव्हते. फारसा दवाखानाही कोणाला लागत नसे. आणि मुख्य म्हणजे कोणीही तणावग्रस्त दिसत नसे. डोकं दुखणे, टेन्शन येणे, मूड जाणे, मूड नसणे हे शब्द कोणाच्याही तोंडी नसायचे. बायका इस्त्रीचे कपडे घालत नसत. इस्त्री करणे ही गोष्ट केवळ पुरुषांपुरतीच मर्यादित होती, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही आणि बायकांना मेकअप ही गोष्ट माहीत नव्हती. कधीतरी बाहेर जाताना थोडीशी पावडर आणि वेणी घालणे किंवा क्वचित एखादी बाई आंबाडा घालत असे. मात्र, फुलांची वेणी माळून ती आंबड्यावर लावणे याची हौस प्रत्येकीला असायची. एखादीच्या घरी बागेत फुलं असतील तर आपल्या शेजारणीला गजरा माळून देणे आणि तो तिला आग्रहपूर्वक माळायला लावणे असा एक गोड शेजारधर्म दिसत असे. एकूणच बायका साध्या, गृहकृत्यदक्ष आणि मुख्य म्हणजे समाधानी होत्या. सासू किंवा सासऱ्यांचे घरात असणे कोणालाही जड वाटत नसे. घरातील सगळे मोठे निर्णय त्यांना विचारून घेतले जात. तेव्हा कोणाचाही ‘स्व’ प्रबळ नव्हता. आणि बहुतेक अपवाद वगळता सगळ्याच जणी स्वत:ला बाजूला ठेवूनच घरासाठी सर्व करत असत. मात्र ते कसं? तर ते अगदी श्वासाइतकं सहज. मी करते हा आविर्भाव नसायचा.

मासिक धर्मामध्ये स्त्रिया बाजूला बसत असत. त्याचा एक स्पष्ट फायदा म्हणजे तिला विश्रांती मिळत असे आणि घरातील अबोध वयाच्या मुलांना कामाची सवय लागत असे. त्यामुळे दहावी होण्यापूर्वीच मुलींना बहुतेक सगळा स्वयंपाक येत असे आणि मुलांना जेवायला वाढून घेणे, भाजी आणणे, अंथरुण आवरून ठेवणे या कामांची सवय लागत असे. शेजारणी याही काळात एकमेकींच्या घरी पोळ्या पाठवून देणे, पाहुणे आले तर इतर काही पदार्थ पाठवून देणे, हे सहजपणे करत असत.

साधारण १९७५ ते ८० नंतर बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या. लोकसंख्या वाढ, स्त्रियांचे शिक्षण, खेड्यातून शहरांकडे येणारे लोंढे आणि प्रत्येक घरात दुचाकीचं अपरिहार्य होणं यामुळे हळूहळू अनेक गोष्टी बदलत गेल्या. बायकांचं शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन, शहरातील लहान घरे, यामुळे घरातील वृद्धांचे स्थान थोडेसे अडचणीचे होत गेले. आता हळूहळू घराघरांत दूरचित्रवाणी आणि घराच्या डोक्यावर अॅण्टिनाचे जाळे येऊ लागले. सुरुवातीला शनिवार, रविवारच्या चित्रपटांना शेजारचे अनेक लोक घरात येऊन बसायचे. इथपर्यंत पुष्कळसे सुसह्य होते. पुढे अनेक वाहिन्यांचा सुकाळ झाला. दूरचित्रवाणीने रंगीत रूप धारण केले. मुले शाळेतून घरी आल्यावर घरातील माणसे दूरचित्रवाणीसमोर बसलेली पाहून मुलेही दप्तर टाकून त्यांचे अनुकरण करू लागली. सर्वांत मोठे नुकसान या दूरचित्रवाणीने केले ते असे की, हातपाय धुवून जेवण्याची जी पद्धत होती ती नष्ट होऊन दिवाणखाण्यात किंवा बैठकीत बसून चप्पल-बूट सकट जेवण्याचा प्रघात सुरू झाला. हळूहळू घराचे वेळापत्रक दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांच्या अनुषंगाने होऊ लागले. आता दूरचित्रवाणीवरच रेडिमेड सर्व खाद्यापदार्थ दिसू लागले. सार्वजनिक पापड, शेवया, कुरडया बनवणे, एकमेकींना मदत करणे या गोष्टी कालबाह्य होत गेल्या. कोणताही खाद्या पदार्थ कोणत्याही ऋतूत उपलब्ध झाला आणि आईच्या हातच्या पदार्थांचे मुलांना असणारे अप्रूप पूर्णपणे संपून गेले. आज तर स्मार्ट फोनमुळे चित्र पूर्णपणे बदललेले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने एका हाताने घराघरांत सगळ्या सुखसोयी दिल्या. मात्र, दुसऱ्या हाताने घराघरातील समाधान बेमालूमपणे काढून नेले. आज घरामध्ये बसून एका क्लिकवर किराणा सामान, भाजी, दूध इथपासून ते फर्निचरपर्यंत सर्व काही घरबसल्या खरेदी करता येते. रेल्वेच्या, बसच्या तिकिटासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. कॅशलेस व्यवहारामुळे पर्समध्ये पैसे सांभाळण्याचीही जबाबदारी फारसी उरली नाही. तरी देखील प्रत्येक घरातील सकाळ तणावग्रस्तच आहे याचे मात्र वैषम्य वाटते.

स्मार्ट फोन सोबतच कॅमेरा हातात आला आहे. स्वत:ला सतत प्रेक्षणीय बनवण्याची एक स्पर्धा सुरू झाली आहे. आपल्या आयुष्यातील सगळ्याच खासगी क्षणांना समाज माध्यमांवर झळकत ठेवण्याचा एक रोगच लागला आहे. यामध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा अग्रेसर आहेत हे दुर्दैवाचे. ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट फोन आणि दूरचित्रवाणी हे दोन्ही अतिशय दिलासा देणारे माध्यम आहे. परंतु त्याचबरोबर एकूणातच ज्येष्ठांशी वागताना नम्रता आणि समजूतदारपणाचा अभाव नव्या पिढीत दिसतो. जुन्या पिढीतल्या गृहिणीकडे पाहून आजच्या स्त्रीकडे पाहिले तर शिक्षणाने आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीने नेमके काय साध्य झाले हा एक स्वतंत्र गंभीर अभ्यासाचा विषय वाटतो. आणि स्मार्ट फोनमुळे वाचन शून्यावर येऊन ठेपले आहे ही समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चिंतेची बाब वाटते. मॉल्स, पार्लर आणि अनावश्यक खरेदी ही मानसिकता टाळून स्त्रियांची पावले वाचनालयाकडे वळली तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच घराघरामध्ये समाधान आणि तणावरहीत जगणे मिळण्यासाठी एक आशेचा किरण मला दिसतो.

Story img Loader