सामान्यज्ञानाच्या प्रश्नांपासून क्लिष्ट गणितांपर्यंत आणि व्यवसायाच्या योजनांपासून कार्यालयीन पत्राच्या मसुद्यापर्यंत सर्व गोष्टींची उत्तरे देणारी ‘चॅटजीपीटी’ यंत्रणा आता खऱ्या अर्थाने वर्तमानात येणार आहे. सध्या सप्टेंबर २०२१ पर्यंतच्याच घडामोडी किंवा घटनांची माहिती असलेली ही सेवा आता ‘रिअलटाइम’ अर्थात क्षणागणिक अद्ययावत होणार आहे. त्याचबरोबर ‘चॅटजीपीटी’ला ऐकण्याची, बोलण्याची तसेच पाहण्याची क्षमताही लाभणार आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान आता अतिशक्तिशाली बनले असून त्याचा मोठा फायदा वापरकर्त्यांना होणार आहे. त्याच वेळी या तंत्रज्ञानाच्या अमर्याद आवाक्यामुळे ते समाजासाठी तापदायक ठरू शकेल, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
हेही वाचा >>> अवांतर : दहा हजारांत देखणा
मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या ‘ओपनएआय’ संस्थेने विकसित केलेली चॅटजीपीटी यंत्रणा गेल्या वर्षभरात वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. सुरू झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत दहा लाख आणि दोन महिन्यांत या सेवेच्या वापरकर्त्यांची संख्या दहा कोटींवर पोहोचली. या वर्षी ऑगस्टमध्ये या यंत्रणेच्या वापरकर्त्यांची संख्या दीड अब्जावर पोहोचली आहे. केवळ गंमत म्हणून किंवा गरज म्हणून विविध प्रश्नांची उत्तरे देणारी किंवा मजकूर उपलब्ध करून देणाऱ्या या यंत्रणेचा मोठा उपयोग होत आहे. मात्र, सध्याच्या यंत्रणेत साठवण्यात आलेली माहिती डिसेंबर २०२१पर्यंतचीच आहे. त्यामुळे डिसेंबर २०२१नंतर घडलेल्या कोणत्याही घडामोडींबाबत चॅटजीपीटीच्या चॅटबॉटला उत्तरे देता येत नाहीत. उदाहरणार्थ, ट्विटर कंपनीचे मालक कोण, असा प्रश्न विचारल्यावर चॅटजीपीटी ‘इलॉन मस्क’ यांचे नाव घेत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारल्यावर ही यंत्रणा ‘२०२१ पर्यंतच्या माझ्या ज्ञानानुसार उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत’ असे उत्तर ही यंत्रणा देते. गेल्या वर्षभरात ‘ओपनएआय’ने ‘चॅटजीपीटी’ यंत्रणा अपडेट केली नव्हती. त्यामुळे या यंत्रणेच्या वापरावर मर्यादा येत होत्या. मात्र, आता ही यंत्रणा ‘अप टू डेट’ करण्यात आल्याची घोषणा ‘ओपनएआय’ने केली आहे.
नव्या बदलांनंतर ‘चॅटजीपीटी’ला गरज पडेल तेव्हा इंटरनेटच्या महाजालात जाऊन वर्तमानात उपलब्ध असलेली माहिती शोधून काढणे शक्य होणार आहे. त्यासाठी चॅटजीपीटीवर वापरकर्त्यांना ‘ब्राऊज विथ बिंग’ हा पर्याय निवडावा लागेल. ‘जीपीटी ४’च्या मेन्यूमध्ये हा पर्याय वापरकर्त्यांना दिसेल. तो निवडताच ‘चॅटबॉट’ इंटरनेटवर जाऊन विचारलेल्या प्रश्नाचे अधिक अचूक आणि ताजे उत्तर उपलब्ध करून देईल. सध्या ही सुविधा ‘प्लस’ आणि ‘एंटरप्राईज’ सशुल्क वापरकर्त्यांसाठी खुली आहे. मात्र, लवकरच हा पर्याय सर्व वापरकर्त्यांना खुला करण्याचे ‘ओपनएआय’चे नियोजन आहे.
हेही वाचा >>> अवांतर : मतिमान आणि गतिमानही..
चॅटजीपीटी अद्ययावत झाल्याचा साहजिकच मोठा फायदा होणार आहे. आता वापरकर्ते अगदी ताज्या घडामोडींशी संबंधित माहिती चॅटजीपीटीवरून मिळवू शकतील. इंटरनेटवरील सर्च इंजिनच्या माध्यमातून एखाद्या विषयाचा शोध घेण्यापेक्षा चॅटजीपीटीवरून घेतलेल्या शोधाचे परिणाम अधिक वेगवान असण्याची शक्यता आहे. बातम्या किंवा ताज्या घडामोडी वाचण्यासाठी वापरकर्त्यांना चॅटजीपीटीचा वापर करता येईल. तसेच आवाजी सूचना देऊन किंवा आवाजी माहिती मिळवूनही चॅटजीपीटीचा वापर करता येईल.
गेल्या वर्षी चॅटजीपीटी सुरू केल्यानंतर ओपनएआयने या यंत्रणेतील माहिती अद्ययावत करण्याचे एकदोनदा प्रयत्न केले. मात्र यासाठी येणारा खर्च जास्त असल्याने कंपनीने हात आखडता घेतला होता. पण ही यंत्रणा अद्ययावत केल्यानंतरच्या संभाव्य धोक्यांची चर्चाही या निर्णयाला कारणीभूत होती. चॅटजीपीटी अद्ययावत झाल्याने वापरकर्त्यांना ताजी माहिती मिळणार असली तरी, त्या माहितीचा स्रोत काय असेल, हा प्रश्नच आहे. इंटरनेटच्या महाजालावर उपलब्ध माहितीतून चॅटजीपीटी आवश्यक माहितीचा धुंडाळा घेईल. मात्र त्या माहितीच्या सत्यतेची पडताळणी ही यंत्रणा करेलच असे नाही. इंटरनेटवर सध्या खोटय़ा, प्रचारकी, विद्वेषी माहितीचा मारा होत आहे. अशा वेळी चॅटजीपीटीकडून शोध घेताना खोटी किंवा अपुरी माहिती तथ्य समजून पुरवली जाण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इंटरनेटवरील माहितीचे पृथक्करण करताना जास्तीत जास्त सर्च केली जाणारी माहिती किंवा त्वरित उपलब्ध होणारी माहिती असे निकष ही यंत्रणा लावत असल्याने प्रत्येक वेळी ती माहिती खरी असेलच असे नाही. त्याचप्रमाणे उपलब्ध माहिती संवेदनशील आहे की नाही, याचा विचार न करता ही यंत्रणा शोधाचे परिणाम उपलब्ध करून देते. ही बाबही धोकादायक ठरू शकते.
ऐकणे, पाहणे, बोलणेही सुरू..
आतापर्यंत ‘चॅटजीपीटी’वर केवळ टायपिंग करूनच प्रश्न किंवा आवश्यक गोष्टी विचारता येत होत्या. मात्र, गेल्या आठवडय़ापासूनच या यंत्रणेवर संभाषण पद्धतीनेही प्रश्नोत्तरे मिळवता येऊ शकतील. सध्या संभाषणाची भाषा इंग्रजी आहे. याशिवाय एखादे छायाचित्र टाकून त्याआधारे आवश्यक माहिती शोधण्याची सुविधाही या यंत्रणेवर उपलब्ध होणार आहे. अगदी एखाद्या आलेखाचे छायाचित्र टाकल्यास त्याचा अभ्यास करून काही क्षणात ही यंत्रणा आलेखाचे विश्लेषण करू शकेल.