भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांच्या स्मारकावरून राजकारण सुरू झाले. शिवाजी पार्क मैदानातच लतीदीदींचे स्मारक झाले पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली. लगेचच देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार आदींनी त्यांची री ओढली. शिवसेनेने मात्र केंद्राकडे अंगुलीनिर्देश केला. पुढे दोन दिवस स्मारकवादाचा धुरळा उडाल्यावर हृदयनाथ मंगेशकर यांनीच शिवाजी पार्क मैदानात स्मारक नको, अशी भूमिका स्पष्ट केली आणि वादावर आपसूकच पडदा पडला. स्मारकावरून राजकारण पेटविणाऱ्या भाजपच्या मंडळींची पंचाईत झाली. हा विषय इथेच संपला नाही. दुसऱ्याच दिवशी उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली. त्यात शिवाजी पार्क मैदानात स्मारक उभारण्यास मनाई करावी, अशी मागणी करण्यात आली. ही याचिका दाखल केली ती प्रकाश बेलवाडे-पाटील यांनी. हे बेलवाडे हे एका केंद्रीय मंत्र्याचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. तसेच त्यांच्या ट्वीट खात्यावर ते भाजपचे कार्यकर्ते व महाराष्ट्र अभाविपचे माजी राज्य सचिव असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. स्मारकासाठी भाजपची मंडळी आग्रह धरत असताना भाजपच्याच एका दिल्लीत ऊठबस असलेल्या कार्यकर्त्यांने न्यायालयात धाव घेतल्याने भाजपची शिवाजी पार्कमधील स्मारकाबाबत नक्की भूमिका कोणती, हा प्रश्न उपस्थित होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा