ठाकरे आणि राणे यांच्यातील विळय़ाभोपळय़ाचे नाते साऱ्यांनाच सर्वश्रूत. शिवसेना सोडल्यापासून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याची एकही संधी राणे यांनी सोडलेली नाही. ठाकरे गटाला अंगावर घेण्याची जबाबदारी आता राणे यांच्या दुसऱ्या पिढीकडे सोपविण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे भल्या सकाळी भाजपला लक्ष्य करतात. त्याला आक्रमक भाषेतच प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे भाजपचे धोरण ठरले. मग कोण ही कामगिरी पार पडेल यावर विचारमंथन झाले. भाजपने राणे पुत्र नितेश राणे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली. धाकटे राणेही तयार गडी. त्यांनी सकाळी सकाळीच त्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली. दोन्ही बाजू ऐकावयास मिळाल्याने वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधीही खूश झाले. उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे सरकारमध्ये शिवसेना सहभागी असताना किरीट सोमय्या यांना सोडण्यात आले. सोमय्या यांनी इमानेइतबारे ही कामगिरी पार पाडली. पण लोकसभेची उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा सोमय्या यांचा पत्ता कापण्यात आला. राणे पुत्राचा ‘सोमय्या’ तर होणार नाही ना, अशी कुजबुज भाजपच्या कार्यालयात सुरू झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा