उन्हाळय़ातही नदीतून गुडघाभर पाण्यातून जावे लागते, पावसाळय़ात तर कल्पनाच न केलेली बरी.. तीन-चार महिने मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. रुग्णांचे तर प्रचंड हाल. गणोजादेवीच्या महिला आपल्या व्यथा खासदार नवनीत राणा यांना सांगत असतात. पूल उभारणे किंवा पुनवर्सन करणे, हे दोनच पर्याय उपलब्ध असल्याचे अधिकारी सांगतात. नाला-नदीने वेढलेल्या गणोजादेवीच्या या ७० घरांच्या वस्तीतील गावकरी आशाळभूत नजरेने नवनीत राणा यांच्याकडे पाहात असतात. हा प्रश्न तडकाफडकी सोडवणे शक्य नसले, तरी समस्या निश्चितपणे सोडवू असे आश्वासन त्या देतात. आता इतकी वर्षे त्रास सहन केला, अजून वाट पाहू, असे ग्रामस्थांचे म्हणणे असते. हास्यविनेादात गावातील बैठक संपते. पण, त्याआधी एक नाटय़मय घटना घडून गेलेली असते. नवनीत राणा यांच्या वाहनांचा ताफा पेढी नदीच्या काठावर पोहचतो. वस्तीत या वाहनांमधून जाणे शक्य असते, पण नवनीत राणा गाडीतून खाली उतरतात. हातात चप्पल घेऊन त्या पायीच नदीचे पात्र ओलांडण्यास सुरुवात करतात. सोबत असलेले अधिकारी आधी संकोच करतात. गावकऱ्यांना काय त्रास आहे, हे पायी चालल्याशिवाय माहीत कसे पडेल, असे म्हणत नवनीत राणा अधिकाऱ्यांना सोबत चालण्याचा आग्रह धरतात. अधिकाऱ्यांचाही नाईलाज होतो. लवाजमा वस्तीत पोहचतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा