पावसाळा सुरू झाला की साखर कारखान्यांना ऊस गळीत हंगामाचे तर अनंत चतुर्दशी संपली की शेतकरी संघटनांना ऊस दर आंदोलनाचे वेध लागतात. यावर्षीही कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनांनी केवळ एफआरपी नव्हे तर त्याहून अधिक रक्कम दिली जावी, यासाठी स्वाभिमानी, जय शिवराय, आंदोलन अंकुश यांनी ऊस परिषदांचे आयोजन केले आहे. अशातच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील कारखाने एकरकमी एफआरपी देतील अशी घोषणा केली. सांपत्तिक  स्थिती उत्तम असलेल्या कारखान्यांना याचे फारसे काही वाटले नाही. पण, अर्थकोंडी झालेल्या कारखानदारांच्या पोटात मात्र गोळा आला आहे. याची चर्चा सुरू असताना विधानसभेच्या कामाचा अनुभव असलेले एक अध्यक्ष म्हणाले,  हंगाम सुरू झाला की सुरुवातीला महिनाभर एफआरपी द्यायची. पुढे थंडी पडली की आंदोलनही गारठते. मग पुढचे पुढे; जे होईल ते पाहूा,ह्ण असे विधान केले. आधी आक्रमक असलेले शेतकरी संघटनांचे आंदोलन पुढे कसे थंड होते, यावर हे मार्मिक भाष्य ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेचि फळ मम तपाला ..

उभ्या – आडव्या धाग्यांनी विणून कापड निर्मिती होते. अशा या धाग्यातील (सूत) जगभरातील नवनवे प्रकार यंत्रमागधारकांना परिचित व्हावे, यासाठी राष्ट्रीय पातळीवरील यार्न एक्स्पोह्णचे वस्त्रनगरी इचलकरंजीमध्ये आयोजन केलेले. उद्घाटनासाठी वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण करण्यात आले. उपक्रमाचे स्वागत व्हावे, कौतुकाचे चार शब्द निघावेत आणि सुताचे नवनवे प्रकार आपल्या उद्योगात कसे वापरता येतील याचे आडाखे संयोजकांनी बांधले होते. झाले मात्र त्याच्या विपरीत. यंत्रमागधारकांच्या नानाविध संघटना व लोकप्रतिनिधी यांनी अलीकडे सुतामध्ये वाढत असलेल्या भेसळीच्या सध्या तापलेल्या विषयाकडे वस्त्रोद्योग मंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याविषयी निवेदनाद्वारे तक्रारीही केल्या.  प्रदर्शनाचा बाज, हेतू लक्षात घेऊन मंत्री पाटील यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले. पण, प्रदर्शनाच्या ठिकाणी सूत भेसळीवर होऊ लागलेली टीका-टिप्पणी मात्र संयोजकांना धास्तावणारी ठरली. हेचि फळ मम तपाला असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली.

स्वच्छतेचा कळवळा की मंत्रिपद न मिळाल्याची खंत

अमरावतीत सध्या साफसफाईचा प्रश्न गंभीर बनलाय. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले. त्यातच भाजपचे विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांनी महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत स्वच्छतेविषयी बैठक बोलावलेली. या बैठकीत आरोग्य निरीक्षक उत्तर द्यायला लागला. प्रवीण पोटे यांचे समाधान होत नव्हते. त्यांचा पारा चढू लागला. अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आले असताना तो कचरा तुम्ही नाही उचलणार तर माझे आजोबा उचलायला येतील का, असा प्रश्न त्यांनी केला आणि सभागृह अवाक् झाले. तुम्ही आतापर्यंत झोपले होते का, कचरा पाहून शरम वाटत नाही का, असा भडीमार पोटे यांनी केला. प्रवीण पोटे हे माजी पालकमंत्री. त्यांचा सूर असा यापूर्वीही अनेकदा तापलेला पाहायला मिळाला.   महापालिकेत भाजपची सत्ता होती, राज्यात भाजपचे सरकार आहे, तरी आपले ऐकले जात नाही, ही खंत आहे की मंत्रीपद मिळत नाही, म्हणून आलेली अस्वस्थता याचीच कुजबूज सुरू झाली.

त्रिमूर्ती

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण व उद्योगमंत्री उदय सामंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र. यापैकी केसरकरांचा निवास आणि मुख्यालय आजही सावंतवाडीत आहे, तर सामंत रत्नागिरी जिल्ह्यात स्थायिक असून चव्हाण डोंबिवलीकर झाले आहेत. या तिघांच्या अभिनंदनाचे जिल्ह्यात फलक सर्वत्र झळकत आहेत. केसरकर आणि सामंतांच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आनंद दिघे यांचे फोटो आहेत, तर चव्हाण यांच्या बॅनरवर या सर्वाबरोबरच केंद्रीय मंत्री नारायण राणे ऊर्फ ‘दादा’ही आहेत. जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण ऊर्फ  दादा राणे यांचे वर्चस्व असल्याने सावंतवाडी शहरात चव्हाणांच्या बॅनरवर लागलेले त्यांचे फोटो, हा चर्चेचा विषय ठरला आहे.

(सहभाग : मोहन अटाळकर, दयानंद लिपारे, अभिमन्यू लोंढे )