एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी आरूढ होताच सोलापूर जिल्ह्यातून सर्वप्रथम त्यांच्यावर निष्ठा वाहिलेले मनीष काळजे यांना लगेचच त्याचे चांगले फळ मिळाले. पक्षाचे जिल्हाप्रमुख म्हणून वर्णी लागली. त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुखपद मिळाले. परंतु काळजे यांचा मूळ स्वभाव आणि कामाची पद्धतच निराळी आणि बरीचशी वाद ओढवून घेणारी. कोणत्याही शासकीय-निमशासकीय कार्यालयात कार्यकर्त्यांचा फौजफाटा नेऊन दरारा निर्माण करणे, थेट मुख्यमंत्र्यांचे नाव सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद घालून गोंधळ माजविणे या त्यांच्या कार्यपद्धतीला सारेच वैतागलेले. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांना तक्रारीमुळे थेट गडचिरोलीत जावे लागले. आम्ही सांगितलेली कामे तुम्ही करीत नसाल तर याद राखा, असा इशारा द्यायला काळजे हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात गेले खरे; परंतु तेथील परिचारिकांनी त्यांना चांगलेच जालीम इंजेक्शन दिले. या इंजेक्शनची चर्चा थेट मुंबईत पोहोचली आणि काळजे यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदावरून तडकाफडकी दूर करण्यात आले. काळजे यांच्यासाठी लवकरच ‘काळजी’ करावी असेच दिवस येतील, अशी कुजबूज पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये वाढली आहे.
सुरतमार्गे गुवाहटी अन् कोऱ्या चकचकीत गाडय़ा
सुरतमार्गे गुवाहटीला जाऊन आल्यानंतर औरंगाबादमधील नेत्यांनी नव्या चारचाकी गाडय़ा घेण्याचा चंग बांधला आहे. तुमची गाडी आलिशान की माझी गाडी भव्य यावरून पालकमंत्री आणि मुख्यमंत्री समर्थक आमदारांमध्ये जणू रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर त्यांनी आपल्या नव्या गाडीत बसावे यासाठी दोघेही आग्रही. आता नवी गाडी, नवा डाव असे काहीसे चित्र अलीकडेच औरंगाबादच्या विमानतळावर होते. मुख्यमंत्री आले आणि शेवटी पालकमंत्र्यांच्या गाडीत बसले. पैठणकरांनी मग सुटकेच्या नि:श्वास टाकला.
अगा जे घडलेच नाही..
सांगली महानगरपालिकेतील भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही हे अनेकदा अनुभवास येते. सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे नेतृत्व. पण आमदारांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जमा झालेले लोक म्हणजे ‘गाडगीळांचे चोख सोनं नव्हे’ हे महापालिकेतील कारभारावरून अनुभवास येते. महापालिकेत पक्षाच्या अब्रूचे धिंडवडे गेल्या आठवडय़ात निघाले. ठेकेदारीच्या कामातून मिळणाऱ्या टक्केवारीसाठी दोन पदाधिकाऱ्यांमध्ये पालिका मुख्यालयातच हाणामारी झाली. जी हजारो लोकांनी पाहिली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद शमला. या मारामारीचे चित्रीकरणही महापालिकेच्या कॅमेऱ्यात कैद झाले. तरीही पक्ष म्हणतो झालेला वाद हा गैरसमजातून झाला. अगा जे घडलेच नाही त्याचा खुलासा करण्याची वेळ पक्षावर का आली? यातच खरी गोम आहे. सोनं चोख असू शकतं. मात्र, वागणं चोख मिळेलच याची खात्री सांगलीकरांना कोण देणार?
चर्चेत राहण्यासाठी काही पण
राजकीय वर्तुळात काही जण एकमेकांवरील टीकेमुळे सतत चर्चेत असतात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष सतत तापलेला असतो. कधीकाळी एकमेकांच्या गळय़ात गळे घालणारे हे मित्र आता एकमेकांवर शरसंधान करताना दिसतात. त्यातून टीकाटिप्पणी वाढत चालली आहे. टीका करण्याचे कारण तरी काय? याचा खुलासा कोल्हापुरातील एका कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांनी उलगडून दाखवला. ते म्हणतात, ‘ बातमी कशी येऊ दे; चांगली की वाईट. बातमी झळकली तर समाजाला समजेल की हा गडी अजून चर्चेत आहे. मला अनेक जण विचारतात राजू शेट्टींवर का बोलता? राजू शेट्टींवर बोललो नाही; तर चर्चाच होत नाही. मी बोललो तर राजू शेट्टी बोलतात. त्यामुळे दोघेच चर्चेत राहतो!’’. असा हा आपल्याला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यालाही चर्चेत झळकावण्याचा टीकात्मक मार्ग.
जखमा कशा सुगंधी
कोल्हापुरातील एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आले होते. पाहुणचार म्हणून त्यांना गोकुळ दूध संघाचे सुगंधी दूध देण्यात आले. त्याचा आस्वाद घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी केलेली टिप्पणी दुधाच्या दर्जावर भाष्य करणारी होती. ते म्हणाले, ‘ गोकुळच्या सुगंधी दुधाची चव घेतली. असले हे दूध पिऊन अवघ्या जिल्ह्याला मधुमेह होईल अशी शक्यता जाणवत आहे. याचे कारण त्याचा आत्यंतिक गोडवा. दुधात इतकी साखर आहे की जणू कॅडबरीच ओतली आहे असे वाटते. त्यामुळे एक घोटाच्या पलीकडे आणखी दूध पिण्याचे धाडस झाले नाही.’ पाटील यांचा हा टोला गोकुळच्या संयोजकांना ‘ जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला ‘ असे म्हणायला लावणारा होता.
एकदा सांगोल्याला बोलवा अन होऊन जाऊ द्या
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पश्चिम महाराष्ट्रात रस्त्यांच्या कामाचा सपाटा लावला आहे. साताऱ्यातील फलटणमध्ये रस्त्यांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमात गडकरींसमोर शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.
शहाजी बापू म्हणाले ‘गडकरीसाहेब आज बोलण्यासारखं काय पण नाय, आणि बोलण्यासारखं बरंच काही हाय. आज बरंच काय बोलणार होतो. पण रामराजे नाईक निंबाळकर यांना बघितलं आणि मला भीतीच वाटली, मग मी माझी जीभ आवळली’ म्हटलं रामराजे इथे कशाला आले बिनकामाचे. यावेळी सभास्थळी एकच हशा उसळला. रामराजे म्हणाले, शहाजी बापू माझी भीती तुम्हाला वाटली, म्हणजे तुम्ही एकदम ओके. पण एकदा सांगोल्याला बोलवा आणि होऊन जाऊ द्या. काय बोलायचे ते. कशाला पाहिजे कोण खासदार आणि आमदार आपण दोघेच भरपूर झालो.
(सहभाग : सुहास सरदेशमुख, दयानंद लिपारे, विश्वास पवार, एजाज हुसेन मुजावर, दिगंबर शिंदे)