विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले या दोघांतील राजकीय वाद आणि त्यांनी एकमेकाला दिलेले आव्हान प्रतिआव्हान हे सर्व परिचित आहे. उदयनराजेंनी रामराजेंना फलटण येथे जाऊन धमकी दिली होती, तर रामराजेंनी साताऱ्यात येऊन प्रतिआव्हान दिले होते. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोघे सोडत नव्हते. दोन्ही राजेंमधील वाद चांगलाच वाढल्याने साताऱ्यात अनेकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांवरही ताण आला होता. त्यावेळी दोघांतील वाद मिटवण्यासाठी शरद पवार यांनीही मध्यस्थी केली होती. दोघांमध्ये मागील काही वर्षे चांगला अबोलाच होता. मात्र शुक्रवारच्या सातारा जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत रामराजे व उदयनराजे एकमेकांच्या शेजारी बसून दोघांमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या. त्यामुळे सर्वाच्या भुवया उंचावल्या, तर काहींचे चेहरे पडले होते. सभा संपल्यानंतर दोघेही हास्यविनोद करत बरोबरच बाहेर पडले. त्यामुळे फलटण आणि साताऱ्याच्या राजेंमध्ये दिलजमाई कधी आणि कशी झाली याची चर्चाही रंगली होती.
हेही वाचा >>> चावडी : कुठे आहात.. ?
मुश्रीफांची माघार कशासाठी ?
इचलकरंजी महापालिकेसाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून पाणी देण्याच्या योजनेला कागल तालुका, कर्नाटकातील आणि शिरोळ तालुक्यातील काही गावांनी विरोध केला आहे. याचे कारण काय तर उन्हाळय़ात पिकांना पाणी कमी पडते. याच विरोधाची प्रचीती घडवण्यासाठी या भागातील प्रमुख नेत्यांची व्यापक बैठक कोल्हापुरात पार पडली. साऱ्यांनीच बाह्या वर सरसावून तावातावाने भाषणे ठोकली. वातावरण जणू युद्धसृदृश झाले होते. त्याचा परिणाम लढाऊ नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे हसन मुश्रीफ यांच्यावर न होईल तर नवल. याच तिरमिरीत मुश्रीफ यांनी इचलकरंजीला पाणी मिळणार नाही, असे निक्षून सांगितले. याहीपुढे जात सुळकूड गावातून पाणी दिले तर रक्तपात होईल, असा जळजळीत इशारा त्यांनी दिला. खरे तर मुश्रीफ हे ज्येष्ठ मंत्री. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाची वडीलकी त्यांच्याकडे आली आहे. कागल तालुका, कोल्हापूर जिल्हा नव्हे तर संपूर्ण राज्यात शांतता, सुव्यवस्था राहावी याची जबाबदारी त्यांच्याकडेच. मात्र स्थानिक राजकारणाच्या ईर्षेत वेडात दौडले वीरह्णप्रमाणे त्यांची जिव्हा स्वैर धावली. स्वाभाविकच कडवट टीकेचा मारा होऊ लागला. त्यानंतर मात्र २४ तासात लगेचच मुश्रीफ यांना उपरती झाली आणि या मुद्दय़ावरून त्यांना माघार घ्यावी लागली. जबाबदारीने वागणाऱ्या मंत्र्यांचे हे असे वागणे विनाकारण चर्चेला कारण ठरले.
हेही वाचा >>> चावडी : खासदाराची विभागणी
दहीहंडीतून पुढील राजकारणाची दिशा
आगामी वर्ष हे निवडणुकीचे असल्याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने तरुणाईला साद घालण्याचे प्रयत्न राजकीय नेत्यांकडून होणारच हे गृहीतच धरावे लागेल. मात्र, तत्पूर्वी श्रावणातील गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीच्या कार्यक्रमाचेही नियोजन सध्या राजकीय नेतेमंडळींकडून सुरू आहे. दहीहंडीसाठी तरुणाईची गर्दी खेचण्यासाठी तरुणाईला झिंग आणणारे मोठे ध्वनिवर्धक तर लागणारच, पण जोश भरण्यासाठी नृत्यांगणाही हवीच. यासाठी गौतमी पाटील अथवा माधुरी पवार यांच्या कार्यक्रमांसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, एका मोठय़ा नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे यासाठी दोन गट पडले असून कोणाची दहीहंडी कोणाच्या डोकीवर फुटते यावर पुढच्या राजकीय समीकरणाची दिशा मिरजकरांना मिळणार हे मात्र खरे. (सहभाग : विश्वास पवार, दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे)