खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या सातारा विकास आघाडीच्या समर्थकांनी शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागात कामांच्या भूमिपूजनांचा सपाटा लावला आहे. यावर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी जोरदार टीका केली. हद्दवाढीतील विकासकामांसाठी ४८ कोटींचा निधी आम्ही अजित पवारांकडे पाठपुरावा करून मिळवला आहे. सातारा पालिकेच्या लोकांना नागरी सुविधा देण्यासाठी आम्ही निधी मंजूर करून आणला आहे. मी अधिवेशनात असल्याचे पाहून साताऱ्यातील नारळफोडय़ांची गॅंग पुन्हा सक्रिय झाल्याची टीका त्यांनी उदयनराजे आणि त्यांच्या सातारा विकास आघाडीवर केली. मुळात हा निधी आमदार फंडातून आलेला आहे. पण कामे मंजूर झाली की लगेच नारळफोडय़ांची गॅंग तयारच असते. हे काम आम्ही केले म्हणायचे आणि श्रेय घ्यायचे. खासदारांनी केंद्रातून एक रुपयाचाही निधी आणलेला नाही. सर्व निधी आम्ही आणलेला आहे. मात्र कोणीही नारळ फोडू देत, आपण त्यांना आडवू शकत नाही. आमदार म्हणून मी अधिवेशनात होतो बघून, त्यांनी भूमिपूजन करून घेतले. आम्ही आमच्या कामांचे नारळ फोडतो. खासदार फंडातून झालेल्या कामांचे नारळ आम्ही फोडत नाही असे शिवेंद्रराजे म्हणाले.
इतिहास वाचतात की उकरतात..
क्रीडा महोत्सव घेतला तेव्हा गर्दी जमली, मेणबत्ती मोर्चा काढला गर्दी जमली. पण रोज निदर्शनाला गर्दी कशी जमणार? – रोज तुम्ही इतिहास वाचण्याऐवजी तो उकरा असे सांगत असाल तर गणित बिघडणारच की! सध्या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले आणि इतिहास वाचण्याऐवजी उकरण्याची राजकीय प्रक्रिया सुरू झाली. औरंगजेबाचे थडगे इथे कशाला, असा प्रश्न सत्ताधारी आमदार संजय शिरसाठ यांनी उपस्थित केला. त्याला भाजपने समर्थन दिले. गावातील नेत्यापासून ते दिल्लीतील नेत्यांपर्यंत सारे एका सुरात म्हणू लागले- नको ते थडगे इथे. इतिहास वाचायचा की उकरायचा असा प्रश्न उपस्थित करत राजकारण सुरू झाले. इतिहास उकरण्याच्या खेळात आपण कुठे, हे नक्की न कळालेले काँग्रेसचे नेते काठावर उभे आहेत. राष्ट्रवादीने अंग काढून घेतले आहे. पण नामांतर विरोधासाठी रोज गर्दी जमत नसल्याने इतिहास वाचा हो, असा सूर आता उमटू लागला आहे. पण तो ऐकायला आला तर..
बरे झाले, आम्ही आल्यानंतर दारे बंद
नगर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी- कार्यकर्ते सध्या अस्वस्थ आहेत. ज्यांच्याविरुद्ध अनेक वर्षे लढा दिला, तेच आता भाजप प्रवेशाच्या वाटेवर आहेत. त्यातून ही अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवाय भाजप खासदार डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे नगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांच्या राजकीय मैत्रीची पार्श्वभूमी या अस्वस्थतेस आहे. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमधील अस्वस्थता तर अधिक जाणवणारी आहे. पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केलेली ही अस्वस्थता लक्षात घेऊन प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना पक्षाच्या बैठकीत नगर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवार आयात करणार नाही, अशी ग्वाही द्यावी लागली. या ग्वाहीकडे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले. हे दोघेही इतर पक्षातूनच भाजपमध्ये आलेले आहेत. त्यामुळे दोघे काय उत्तर देतात याकडे लक्ष होते. साखळाई पाणी उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास राज्य सरकारने मान्यता दिली, याची माहिती देण्यासाठी दोघांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ओघानेच विजय चौधरी यांनी दिलेल्या ग्वाहीचा विषय उपस्थित झाला. त्यावर भाजप खासदार विखे यांनी ‘बरे झाले, आम्ही आधीच भाजपमध्ये आलो आणि नंतर पक्षाची दारं-खिडक्या बंद झाल्या, अन्यथा आमचे काही खरे नव्हते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
नितीन गडकरींचा काय दोष?
आळंदी व पंढरपूर या दोन्ही महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या २३४ किलोमीटर लांबीच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच हवाई पाहणी केली. माढय़ाचे खासदार रणजितसिंह िनबाळकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गडकरी यांनी पालखी मार्गाची पाहणी करताना त्यातून रस्ते विकासाचे समाधानकारक चित्र नक्कीच पाहायला मिळाले असणार, यात शंका नाही. त्याबद्दल कोणाला वाईट वाटण्याचेही कारण नाही. पालखी मार्गाला खेटूनच असलेल्या पंढरपूर-सातारा रस्त्यावरही नितीन गडकरी यांनी हवाई पाहणीतून थोडीसा कटाक्ष टाकला असता तर त्यांचे मोठे उपकार झाले असते.
पंढरपूर-सातारा रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे. याच रस्त्यावर म्हसवड येथे प्रसिद्ध सिद्धनाथ मंदिर आहे. तेथून जवळच गोंदवले येथे ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचे समाधिस्थळ आणि मठ प्रसिद्ध आहे. म्हसवडच्या सिद्धनाथाची दरवर्षी मोठी यात्रा भरते. गोंदवल्यात ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मठात नेहमीच भाविकांचा ओघ असतो. खरे तर सत्ताधारी भाजपचे सर्व धार्मिक तीर्थक्षेत्रे एकमेकांना उत्तम रस्त्यांनी जोडण्याचे धोरण आहे. पालखी मार्गाप्रमाणे म्हसवड आणि गोंदवले ही तीर्थक्षेत्रेही तेवढीच महत्त्वाची आहेत; परंतु तेथे जाणाऱ्या भाविकांना खराब रस्त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. गडकरी यांनी हेलिकॉप्टरची दिशा किंचित वळविली असती तर पंढरपूर-सातारा रस्त्याची केविलवाणी दशा पाहायला मिळाली असती. स्थानिक रस्त्यांची माहिती असलेले खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी जागरूकता दाखविणे अपेक्षित होते. यात गडकरी यांचा काय दोष?
सहभाग- मोहनीराज लहाडे, विश्वास पवार, सुहास सरदेशमुख, एजाजहुसेन मुजावर