‘पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन’ अशी नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्याच्या तोंडी ठरलेले वाक्य असते. प्रवेश करताना नेतृत्वाकडून आश्वासन मिळविलेले असते, पण सहसा कोणी ते जाहीर करीत नाही. उगाचच अन्य नेत्यांचा त्या पदावर डोळा नको, अशी त्यामागची भावना असते. मिलिंद देवरा हे त्याला अपवाद ठरले. शिवसेनेच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या वेळीच ‘खासदार म्हणून राज्य आणि मुंबईचे प्रश्न सोडविण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरवेन’ असे वक्तव्य करून देवरा यांना खासदारकी मिळणार यावर स्वत:हूनच शिक्कमोर्तब केले. देवरा यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटातील इच्छुकांची मात्र कुचंबणा झाली. मंत्रीपदावर अनेक जण डोळा ठेवून बसलेत पण गेल्या दीड वर्षात मंत्रिमंडळाचा विस्तारच झाला नाही. राज्यपालनियुक्त जागेसाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत पण त्यालाही मुहूर्त मिळालेला नाही. देवरा यांना राज्यसभेची खासदारकी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. पण त्या जागेवर लक्ष असणाऱ्यांचा हिरमोड झाला. एकूणच शिंदे गटातील इच्छुकांची घालमेल सुरूच आहे.
अशीही चतुराई …
अयोध्येत सोमवारी झालेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अयोध्येतल्या कार्यक्रमाचं स्वरूप धार्मिक असलं तरी या निमित्ताने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्यांनी या सोहळ्याचा आपापल्या भागात मतदारांशी संपर्क साधण्यासाठी खुबीने वापर केला. रत्नागिरीतही पालकमंत्री उदय सामंत यांनी गेल्या आठवड्यात आर्थिक परिषदेसाठी दावोसला असतानासुद्धा इथल्या नियोजनावर बारीक लक्ष ठेवून सोमवारी सकाळपासून शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले. त्यामुळे केंद्रात भाजप या संधीचा लाभ उठवत असताना रत्नागिरी शहरातल्या मुख्य रस्त्यांवर सर्वत्र शिंदे यांच्या शिवसेनेचे भगवे झेंडे फडकत होते. सामंतांचे राजकीय प्रतिस्पर्धी, भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी मात्र या संधीचा चतुराईने वापर केला. सुमारे एक हजार कार्यकर्त्यांना मानेंनी श्रीरामाची पितळेची आकर्षक मूर्ती, अक्षता आणि सोबत एक शुभेच्छा पत्र पाठवून संपर्काचा अभिनव मार्ग अवलंबला. विशेष म्हणजे, ही मूर्ती त्यांनी खास उत्तर प्रदेशातल्या अलिगड शहरातून मागवली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्याबद्दल इतकी चर्चा झाली की, आता आणखी मूर्तींसाठी माने यांच्याकडे मागणी होऊ लागली आहे.
शोभायात्रेची ‘शोभा’
अयोध्येत राम मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने सांगलीत जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा जनोत्सव व्हावा अणि त्याचा राजकीय लाभ मिळावा अशी बहुसंख्य राजकीय नेतेमंडळींची इच्छा लपून राहिलेली नाही. जनमानसात आपली प्रतिमा देवभोळा, रामभक्त व्हावी यासाठी भव्य- दिव्य शोभायात्रेेचे आयोजनही करण्यात आले होते. वाजंत्री, पारंपरिक वेशातील कार्यकर्ते, सजविलेले उंट, घोडे दाखल झाले. चित्ररथ तयार झाले. मात्र विलंब होऊ लागला तसा कार्यकर्त्यांचा उत्साह ओसरू लागला. चुळबुळ सुरू झाली. आता गर्दी ओसरण्याची चिन्हे दिसताच शोभायात्रा मार्गस्थ झाली. मात्र, ज्यासाठी शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती, ती मूर्तीच अखेरपर्यंत शोभायात्रेत सहभागी करता आली नाही.
नवी मुंबईची जहागिरी कुणाची ?
नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी जोरदार टोलेबाजी केली. बुद्धिबळाच्या पटावर राजापेक्षा राणीलाच अधिक महत्त्व असते. त्यामुळे मला पाडण्यासाठी कितीही घोडे, उंट आडवे आले तरी बेलापूरची राणी मीच राहाणार या शब्दांत मंदाताईंनी विरोधकांना टोला लगावला. नवी मुंबईच्या राजकारणातील बडे प्रस्थ असणारे गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे हे दोघेही भाजपमध्ये असले तरी त्यांच्यात विस्तवही जात नाही. या मतदारसंघातून विधानसभेला म्हात्रे यांना उमेदवारी मिळेल का याविषयी देखील तर्कवितर्क आहेत. या पार्श्वभूमीवर ताईंनी केलेली टोलेबाजी गणेशदादांच्या समर्थकांना बोचली नसेल तर नवलच. तरीही ताईंच्या या टोलेबाजीवर नाईकांच्या गोटातून पुसटशी प्रतिक्रिया देखील उमटली नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी मात्र ‘नवी मुंबई कुणाची जहागीर नाही, जनता राजा, राणीचा पट उधळून लावेल’ अशी टीका करत दादा-ताई या दोघांवर तोंडसुख घेण्याची संधी साधली.