शिंदे गट स्थापन होताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करणारे संजय शिरसाठ तसे अलीकडे शांत शांतच असतात; पण सार्वजनिक कार्यक्रमात जिथे मंत्री हजेरी लावतात तिथे आमदार शिरसाठ जरासे उशिरा पोहोचतात. त्यांचे हे उशिरा येणे हे कॅबिनेट मंत्र्यांना सहन करावे लागतेच. त्यामुळे शिरसाठ काही म्हणतील काय, त्यांना जरा जपावेच लागते का, असे अलीकडेच रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांना विचारले आणि ते म्हणाले, ‘‘अहो, ते शांतच आहेत आणि शांतच राहतील. तुम्ही जसं समजता तसं आमच्यात काही नाही.’’

हार कुठं घालतात रे भाऊ?

म्हंजे बघा, हाराचं वजन किमान दीड क्विंटल तर पाहिजेच. आता थाट करायचा म्हणल्यावर हार गळय़ात कशाला घालायचा? तो क्रेनला बांधायचा, मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर प्रत्येक गावात एक क्रेन-एक हार असे नियोजन रोजगार हमीमंत्री संदीपान भुमरे यांनी लावले. ढोल वाजवा, हार घाला, जयघोष करा; पण गळय़ात हार घालण्याऐवजी आता क्रेनलाच हार बांधायची फॅशन ग्रामीण भागात रुजलीय.

कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे

गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गणेश विसर्जन, मूर्ती दान, निर्माल्य दान या उपक्रमांत कोल्हापूर आघाडीवर राहिले आहे. पर्यावरण विसर्जन होत असतानाच काही चुकीच्या घटनाही झाल्या. विशेषत:  दान केलेल्या गणेश मूर्ती विसर्जित करताना प्रशासनाने केलेल्या घाईगडबडीच्या कृत्यावर हिंदूत्ववादी संघटना, सामाजिक संघटना आणि भाजपने जोरदार आक्षेप नोंदवला. एरवी भाजपचे कोणतेही फुटकळ उपक्रम असले की महानगर जिल्हाध्यक्षपासून ते पन्ना प्रमुखपर्यंत किमान ५०-६०  नावे असतातच. प्रसिद्धीपत्रक बोटभर आणि नावे पानभर असा मामला असतो. गणेश मूर्ती दानप्रकरणी भाजपने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार नोंदवली; पण पत्रकाची जबाबदारी घेण्यास कोणी पदाधिकारी, कार्यकर्ता धजावला नाही. कार्यालय प्रमुख शंतनू मोहिते यांनी ते कार्य पार पाडले. एरवी प्रसिद्धीसाठी पुढे पुढे करणारे, धडपडणारे सारेच गायब. कार्यालय प्रमुखास मात्र कोणाच्या खांद्यावरील कोणाची जबाबदारी म्हणत कर्तव्य निभावणे भाग पडले. गणेशोत्सवात याचीही चर्चा चांगलीच रंगली.

सहभाग- सुहास सरदेशमुख, दयानंद लिपारे

Story img Loader