सालगडी म्हणून सेवा करण्याचे वर्ष-दीड वर्षे राहिले आहेत. यापुढे काही आता हे काम थांबवू, या शब्दांत भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत नुकतेच दिले. आता फुलंब्री मतदारसंघात आमदार होण्यास इच्छुकांची मग ‘बांधकाम’ करण्यास सुरुवात केली. हरिभाऊंनी ‘आमुचा रामराम घ्यावा’ असे संकेत दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी टाळय़ा वाजवल्या म्हणे. डोक्यावर तिरपी टोपी घालणारे हरिभाऊ हे भाजपचे जनसंघापासूनचे निष्ठावान कार्यकर्ते. म्हणजे पणती चिन्हावर निवडणूक लढवत कमळ चिन्ह रुजविणाऱ्यांच्या पिढीतले. पण आता फुलंब्री मतदारसंघात भाकरी फिरवली जाणार म्हणे. पण त्यासाठी कोणाचा तवा तापतो, याची उत्सुकता मतदारसंघात आहे. अर्थात निवृत्तीचे हे सारे भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे, हे सांगायला हरिभाऊ विसरले नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झिंग काही उतरेना..!

तसे ‘एकच प्याला’मधील तळीराम नावाचे पात्र प्रशासनात शोधायचे कसे, याचे नियम, संकेत ठरलेले असतात खरे. म्हणजे नुसतं ‘बसू की साहेब..’ असं म्हटलं तरी भागतं. ‘चला की साहेब, चहा घेऊ..’ हे आता अडल्यानडल्या व्यक्तीला म्हणावं लागतंच. आता कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तेव्हापासून त्यांना आवरणे, हे महाकठीण काम होऊन बसले आहे म्हणे . ते कधी काय बोलतील हे सांगता येत नाही. ते कोणाचा पाणउतारा करतील आणि कोणाला खूश करतील हेही सांगता येत नाही. दारू पिता का, असा प्रश्न भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना विचारण्यात काय गैर आहे, असेही सत्तार म्हणतात. त्यांचे हे वागणे पाहून एक कार्यकर्ता म्हणाला, ‘‘अहो, सत्तेची झिंग आहे ही.. ती अशी उतरत नसते.’’ त्यावर भाजपचे नेते ‘उतारा’ शोधत फिरत आहेत म्हणे..

कार्तिकीला विठोबा पावणार का?

राज्यात सत्तांतर होऊन बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांचे संयुक्त सरकार सत्तेवर आले. या घटनेलाही आता साडेतीन महिने झाले. ज्यांना मंत्रीपदाची खुर्ची मिळाली ते आनंदले, मात्र, ज्यांनी यासाठी त्याग केला, ते मात्र, अद्याप प्रतीक्षा यादीतच अशी गत झाली आहे. दुसरा मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीनंतर होईल, असे सांगितले जात असल्याने जिल्ह्यातील आणखी काही आमदार शपथविधीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मुंबईचा निरोप कधी येतो याकडे कान लावून बसले आहेत. यासाठी इच्छुकांचे कार्यकर्ते कोणी पंढरीची पायी वारी करून विठोबाला साकडे घालत आहे, तर कोणाचे कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहून नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश करावा यासाठी वरिष्ठ नेत्यांना साकडे घालत आहे. अनायासे कार्तिक वारी तोंडावर आहेच, त्यामुळे जर विठ्ठल पावला तर पुण्याई फळाला आली, पावला नाही तर निष्ठा कमी पडली, त्यात विठ्ठलाचा काय दोष? असे म्हणायला कार्यकर्ता मोकळा.

आनंद हरपला

शासनाने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेशिनग दुकानांवर ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यासाठी योजना आखली. मात्र नियोजनाअभावी शंभर रुपयांचा तो शिधा ऑनलाइनच्या नेटवर्कअभावी नागरिकांना मिळू शकला नाही. त्यामुळे ‘या शिध्यामधील आनंद हरपला आहे’, अशा शब्दांत विरोधक टीका करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ भागात विखुरलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला हा शिधा मिळवताना बरीच धावपळ करावी लागत आहे. दिवाळी सणाच्या दिवसांत रेशिनग दुकानांवर तो उपलब्ध झाला. त्याचे ऑनलाइन वाटप करण्याचा आदेश धान्य दुकानदारांना देण्यात आला होता. पण नेटवर्कअभावी तो वितरित होऊच शकला नाही. परतीचा पाऊस थांबला असल्याने काही भागांत भातकापणी सुरू झाली आहे; पण शंभर रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार म्हणून सर्वसामान्य लोक रेशिनग दुकानांवर भल्या मोठय़ा संख्येने उभे राहत आहेत. त्यामुळे भातकापणी, मजुरीची कामे खोळंबली आहेत. या परिस्थितीत शासनाने दिवाळी सणाच्या तोंडावर हा शिधा वाटण्याचे काम काढून लोकांना मनस्तापच जास्त दिला असल्याचे बोलले जात आहे.

पडद्याआडच्या सूत्रधाराचे गूढ

अमरावती जिल्ह्यातील दोन आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील शाब्दिक वाद राज्यभरात गाजला. आजवर हे दोघेही कधी आमने-सामने आले नव्हते. पण, अचानकपणे संघर्षांची ठिणगी का पडावी, हा प्रश्न चर्चेत असतानाच बच्चू कडू यांनी व्यक्त केलेल्या संशयातून पडद्यामागून बऱ्याच हालचाली झाल्याचे संकेत मिळाले आहेत. बच्चू कडू यांच्या राजकीय वाटचालीला लगाम घालण्यासाठी काही शक्ती कार्यरत असल्याचे कडू समर्थकांचे म्हणणे आहे. पण, दोघांनीही वाक् युद्धात वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेमुळे डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ मतदारांवर आली. सत्ताधारी आघाडीतीलच आमदार आपल्यावर आरोप करीत असेल, तर आपला ‘गेम’ तर होत नाही ना, असे प्रश्नचिन्ह निर्माण होते, या शब्दातं बच्चू कडूंनी हतबलता व्यक्त केलीय. पुढे अधिक बोलणे त्यांनी टाळले असले, तरी त्यांचा ‘गेम’ कोण करू पाहतोय, याची चर्चा सुरू झाली. रवी राणांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करून भरपूर प्रसिद्धी मिळवली. बच्चू कडूंच्या बाबतीतही तेच झालेय. रवी राणांना यातून काय साध्य करायचे होते, याचे उत्तर काळ जरी देणार असला, तरी पडद्यामागच्या सूत्रधाराचे गूढ कायम राहणार आहे.

(सहभाग : सुहास सरदेशमुख, अभिमन्यू लोंढे, दिगंबर शिदे, मोहन अटाळकर)

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavadi maharashtra political drama maharashtra political crisis political drama in maharashtra zws