लालफितीतून संथपणे होणारा फाइलचा प्रवास सर्वज्ञात आहे. त्यामुळे अनेक शासकीय योजना, कामे दीर्घकाळ रखडतात. त्यास अनेकदा मंत्रीही वैतागतात. फाइलच्या प्रवासाची ही झंझट नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिटवली आहे. राज्यात नवे सरकार स्थापन करताना शिंदे यांना ५० आमदारांना घेऊन बराच लांबपर्यंत प्रवास करावा लागला होता. महिनाभराने राज्यात सरकार अस्तित्वात आले. शासकीय कामे, योजनांच्या फाइलच्या प्रवासाला तर यापेक्षा अधिक कालावधी लागतो. त्यात कालापव्यय झाल्यास अडीच वर्षांनी सरकारला काम दाखविणे अवघड होईल. बहुधा हे लक्षात घेत मुख्यमंत्री झटपट कामे मार्गी लावण्यासाठी वेगळी पध्दत रूढ करीत आहेत. बैठकीतून अधिकाऱ्यांना थेट भ्रमणध्वनीवरून आदेश देणारे नवीन मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहेत. मनमाडकरांना या पध्दतीविषयी अधिक विस्तृत माहिती मिळाली. नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री शिंदे यांची मनमाडच्या एकात्मता चौकात सभा झाली. आदित्य ठाकरे यांच्या अलीकडेच झालेल्या शिवसंवाद यात्रेला शह देण्यासाठी शिंदे गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. मुख्यमंत्र्यांनी सभेतच करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेसाठी ४५ कोटींची लोकवर्गणी नगरविकास विभाग भरणार असल्याचे जाहीर केले. नांदगाव मतदारसंघातील अनेक कामांना मंजुरी दिली गेली. यावेळी त्यांनी तुमच्या अपेक्षांना प्रतिसाद देणारे, ‘फोन उठाओ- काम बना’ असे उद्दिष्ट ठेवत दप्तर दिरंगाईच्या जंजाळात न अडकता थेट काम करणारे हे नवे सरकार असल्याचे नमूद केले. आश्वासने देण्यात वेळ घालवला जात नाही. आपले काम थेट आहे. फायलींच्या प्रवासाची झंझट नसल्याचे त्यांनी सांगून टाकले.
सारेच कृत्रिम
राजकारणात ते बदलते फंडे चर्चेचा विषय ठरतात. आमदार शहाजीबापू पाटील यांची गुवाहाटी येथील ध्वनिचित्रफीत राज्यभर सर्वतोमुखी झाली. हा ‘एकदम ओक्के’चा फॉर्मुला यशस्वी ठरल्यावर त्याच्याच काही आवृत्ती अन्य राजकीय नेत्यांनी केल्या. कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने हे कोणत्या गटासोबत राहणार याचे कुतूहल होते. त्याचे उत्तर देणारी माने यांची एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसिद्ध झाली. त्यामध्ये माने यांनी विकासकामे होण्यासाठी प्रवाहाबरोबर जाणे गरजेचे आहे, असे म्हणत शिंदे यांच्या सोबत राहण्याचे फायदे विशद करत अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचे संकेत दिले. शहाजीबापू यांच्या ध्वनिचित्रफितीमधील संभाषणात उत्स्फूर्तता होती. तर माने यांच्या ध्वनिचित्रमधील प्रश्नकर्त्यांचा कृत्रिमपणा जाणवत होता. इतका की ही ध्वनिचित्रफीत केवळ लोकांसमोर आपली भूमिका मांडण्याच्या उद्देशानेच प्रसिद्ध केली आहे हे ऐकताना सहजपणे जाणवत होते.
सत्तारांचा पक्ष
सत्तेच्या खुर्चीसाठी रुमाल टाकताना सिल्लोडमध्ये सत्तारांचा सत्कार म्हणजे दुतर्फा गर्दीच गर्दी. हातात फुलं घेऊन लोक उधळतात, ती नेत्यांच्या गाडीवर. सिल्लोडमध्ये सर्वत्र सत्तार सेनाच. ते ज्या पक्षात जातात तो पक्ष मतदारांचा. आदित्य ठाकरे अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले होते, तेव्हाही आमदार सत्तार असेच उत्साहात होते. सिल्लोडचा मुख्य रस्ता संपेपर्यंत गर्दीच गर्दी. तेव्हाही फुलं उधळली आणि रविवारी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर. मंत्री पदाच्या खुर्चीवर रुमाल टाकण्याची ही सत्तार यांची खेळी. दुसरे काय? गर्दीने मुख्यमंत्रीही भारावले. त्यांनी भाषणातही त्याचा आवर्जून उल्लेख केला. कोणत्याही चिन्हावर निवडून येतो असे सत्तार यांनी सांगितल्याची आठवण त्यांनी सांगितली. ‘सांगू का पुढचे’ असे त्यांनी त्यांच्या खास शैलीत विचारले. सत्तार यांनीही हसत त्याला परवानगी दिली. ‘कुत्ता’ निशाणी दिली तरी निवडून येईल असे ते म्हणाले होते. अर्थात कुत्रा वफादार असतो, अशी सारवासारव पुढे त्यांनी केली. गर्दीने भारावलेल्या मुख्यमंत्र्यांनी सत्तारांची हसत विकेटच काढली अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
(सहभाग : अनिकेत साठे, सुहास सरदेशमुख, दयानंद लिपारे )