हूल उठवणे, अफवा- कुजबुज पसरविणे हे सारे राजकारणाचा अंगभूत भाग हे मान्यच. भाजपकाळात या राजकीय प्रक्रियेला प्रतिष्ठाही मिळालेली. पण या प्रक्रियेचं ‘बांधकाम’ हळूहळू पक्कं होत असतं. आता अशोकराव चव्हाण हे भाजापमध्ये जाणार ही वार्ता कानोकानी पसरत समाजमाध्यमांमध्ये घुसली. त्यावर मग प्रश्न विचारले जाऊ लागले. मग अशोकरावांनी, ‘कोण चर्चा करतंय?’ अशी विचारणा केली. ‘असा काही निर्णय मी घेतला नाही’, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. पण ते भाजपमध्ये जाणार नाहीत, यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही. खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी मग संशय वाढवत नेला. अशोकरावांचे स्वागत असेल असंही स्पष्ट केलं. आता नवी चर्चा सुरू आहे, आता अशोकरावांचं भाजपमध्ये जाणं म्हणे, बांधकाम खात्यामुळे अडकलं आहे. त्यांनी काँग्रेस सोडली तर त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा बांधकाम खातंच हवं आहे, अशी हूल आता उठली आहे. विधिमंडळात मतदानाच्या वेळी उशिरा पोहोलेल्या अशोकरावांविषयीची कुजबुज आणि त्यावरचे खुलासे असा नवा खेळ काँग्रेस दरबारी रंगला आहे. आता हूल, अफवा, कुजबुज की सतत्या हे मात्र कोडेच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा