गावोगावच्या रंजक किश्शांचे साप्ताहिक सदर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मुंबईत आले व उभयतांनी भाजपच्या विरोधात रणिशग फुंकले. बदलासाठी हीच वेळ आहे यावर दोघांचे एकमत झाले. उभयतांचे सूर जुळले. दोघांमध्ये एक समान गोष्ट आहे व ती म्हणजे दोन्ही मुख्यमंत्र्यांची मुले ही त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. चंद्रशेखर राव यांच्या हाती एकहाती सत्ता असल्याने त्यांचे पुत्र के. टी. रामाराव हे ‘प्रतिमुख्यमंत्री’ मानले जातात. अधूनमधून रामाराव हे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू असते. रामाराव यांच्या तुलनेत आदित्य ठाकरे हे फारच सौम्य आहेत व त्यांचा तसा बडेजावही नसतो. मुख्यमंत्र्यांच्या या आघाडीत लवकरच सहभागी होणार असलेले तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्रही आमदार आहेत, पण त्यांना मंत्रिपद देण्याचे स्टॅलिन यांनी अजून तरी टाळले आहे.
‘ईश्वर चिठ्ठी’ नेहमी भाजपच्याच बाजूने कशी?
एखाद्या निवडणुकीत दोन उमेदवारांना समान मते पडली तर चिठ्ठी टाकून विजयी उमेदवाराची निवड होते, ही सार्वत्रिक पद्धत आहे. या चिठ्ठीला ‘ईश्वर चिठ्ठी’ संबोधले जाते. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत आणि भाजपचे उमेदवार विठ्ठल देसाई यांना समान मते (१७) पडली तेव्हा ‘ईश्वर चिठ्ठी’त भाजपचे देसाई विजयी झाले. त्यानंतर दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप गवस व भाजपचे उमेदवार देवीदास गवस यांना समान मते (प्रत्येकी ८२) मिळाल्याने तेथेही ‘ईश्वर चिठ्ठी’च्या माध्यमातून भाजपचे उमेदवार गवस विजयी झाले. सिंधुदुर्गात ईश्वर चिठ्ठी भाजप उमेदवारालाच कशी पावते, याचीच चर्चा सुरू झाली आहे.
जिंकलेला ‘पैलवान’ भाजपचाच
एकेकाळी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यात अलीकडे भाजपने मजबूत पाय रोवले. परंतु ताकद वाढत असताना याच भाजपचे काँग्रेसीकरण कसे झाले, याचा आणखी एक किस्सा माळशिरस तालुक्यात नुकताच घडला. माळशिरस नगर पंचायत निवडणुकीत भाजपने एकहाती वर्चस्व मिळविले तरी नगराध्यक्षपदाच्या निवडीत भाजपमध्ये साठमारीचे राजकारण झाले. यात पक्षाचे अधिकृत उमेदवार आबासाहेब धाईंजे यांचा भाजपचे बंडखोर आप्पासाहेब देशमुख यांनी पराभव केला. राष्ट्रवादीची मदत देशमुखांना झाली. चांगले यश मिळूनही सत्तेविना भाजपला हात चोळत बसावे लागले. हा पराभव भाजपच्या फारचा जिव्हारी लागला. भाजपचे खासदार रणजितसिंह िनबाळकर व पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना मात्र नवनिर्वाचित नगराध्यक्ष देशमुख यांच्या रूपाने भाजपचाच नगराध्यक्ष झाल्याचा साक्षात्कार झाला. जिल्हाध्यक्षांनी तशी प्रशस्तीही दिली. मग पराभूत धाईंजे यांना अधिकृत उमेदवार म्हणून नगर पंचायतीत भाजपच्या सर्व दहा सदस्यांना पक्षादेश बजावण्यात आला होता, त्याचे काय झाले याचे उत्तर मात्र भाजप नेत्यांकडे नाही.
बोलाचाच भात
बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी म्हटल्यावर वाढणाऱ्याने हयगय करण्याची गरज नसते आणि ओरपणाऱ्यानेही संकोच बाळगायचा नसतो, पण त्याकडे पाहणारे मात्र अकारण बावचळून जातात. अशीच अवस्था पुतळा वाद प्रकरणात अमरावतीकरांची झालीय. आमदार रवी राणा समर्थकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अनधिकृत पुतळा महापालिकेने हटवल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा पुतळा उभारण्याचा महापालिकेचा ठराव अतक्र्य आहे. राणा समर्थकांनी हा आपला विजय मानलाय, पण या संपूर्ण प्रकरणात अनेकांचे हसे झाले आहे. ठरावाची अंमलबजावणी केव्हा होईल, हे सांगणे महाकठीण. राणा यांची पुढली खेळी कोणती याचा अंदाज अजून कुणाला आलेला नाही. कुठल्याही प्रकारे राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी राणा दाम्पत्य कसब पणाला लावताहेत. भाजपमध्ये वजन वाढवण्यासाठी ही त्यांची पात्रता उपयोगी पडताना दिसते आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांची मात्र त्यामुळे चांगलीच पंचाईत होत आहे.
मंत्र्यांचा प्रचार दौरा की?
मंत्र्याने सत्तेचा फायदा घेत स्वत:चा व पक्षाचा प्रभाव वाढेल याची खबरदारी घ्यावी लागते. एखाद्या मंत्र्याची व्यावसायिक पार्श्वभूमी असल्यास निर्णय घेताना कलही तसाच असतो. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांना तेथे धाडले. ‘गोकुळ’ची सूत्रे हाती आली असल्याने पाटील यांचे लक्ष तिकडे असणार हे स्वाभाविकच. गोव्यात प्रचारादरम्यान त्यांनी तेथे एक लाख लिटर दूध विक्रीचे उद्दिष्ट त्यांनी जाहीर केले. त्यांच्या पक्षाला यश मिळेल वा नाही, पण शेजारील राज्यात स्वत:च्या संस्थेची भरभराट होईल, याची त्यांनी काळजी घेतलेली दिसते.
(सहभाग : दयानंद लिपारे, अभिमन्यू लोंढे, एजाज हुसेन मुजावर, मोहन अटाळकर )