साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन ठेवले होते. या कार्यक्रमाला उदयनराजेंचा विरोध होता. शिवेंद्रसिंहराजे पोहोचण्यापूर्वीच उदयनराजे त्या ठिकाणी पोहोचले. अनेक दिवसांनंतर दोघे समोरासमोर आले. त्यांच्यात जोरदार वाद झाले. कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने जमले. त्यांच्यामध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. उदयनराजेंनी पोकलेन आणले आणि शिवेंद्रसिंहराजेंनी आणलेला कंटेनर साहित्य ढकलून दिले. उदयनराजे म्हणाले, जागा माझी आहे, माझ्या जागेत पाय ठेवू देणार नाही. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले जागा आमची आहे, त्यांनी इथून निघून जावे. दोघांनी पोलिसांना आपली बाजू सांगितली. पोलिसांनीही हस्तक्षेप करत सगळय़ांना पिटाळले. उदयनराजे म्हणाले, त्यांना आधी जायला सांगा, तर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले त्यांना आधी जायला सांगा. मग वादंग सुरू झाले. दोघे एकमेकांना नडले. मधोमध पोलीस. मग त्यांचे कार्यकर्तेसुद्धा न नमले आणि काय जादू काही मिनिटांत सगळेच निवळले. दोघांनी वेगवेगळे नारळ फोडले, टिकाव मारले भूमिपूजन दोघांनीही केले. सातारा पोलीसही मध्यस्थीत यशस्वी झाले. दोन राजे किती काळ भांडणार हा सातारकरांना पडलेला प्रश्न आहे.
करवीरनगरी खरोखरीच बदलत आहे का ?
कोल्हापुरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सामाजिक सलोखा परिषद पार पडली. पावसाचा शिडकावा असतानाही नागरिकांचा सहभाग तसा उत्स्फूर्त स्वरूपाचा. कोल्हापूरची पुरोगामी विचारधारा पुसून टाकणे सोपे नाही असा सांगावा देणारे एकंदरीत वातावरण. व्यासपीठावर राजकारणातील मंडळींची गर्दी दाटलेली. राजर्षी शाहू महाराज यांच्या नगरीत त्यांचे पुरोगामी विचार जपणे गरजेचे असल्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडणे अपेक्षित होते. बहुतेक राजकारण्यांची भाषणे ‘तेच ते तेच ते’ छापाची, एकसुरी. अशातही एक-दोन मोजकी भाषणे याला छेद देणारी. विचारांचा नेमका, सखोल वेध घेणारे. भाजलेल्या शहराला शीतलता देणारा हा आश्वासक विचार म्हणूनच उल्लेखनीय ठरणारा.
उपरती..
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत हे नेत्यांचे वाढलेले दौरे, संपर्कावरून मतदाराच्या नजरेतून सुटत नाही. भाजपने चार महिन्यांपूर्वीपासूनच लोकसभेची तयारी सुरू केली आहे. कर्नाटकातील विजयामुळे काँग्रेसच्या नेतेमंडळींमध्ये उत्साह आला आहे. याची प्रचीती सांगलीत रविवारी झालेल्या महानिर्धार मेळाव्यात दिसून आली. दादा घराण्याचे नेतृत्व करणाऱ्या वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी चुकांची कबुली देत यापुढे कदमांचे नेतृत्व मान्य करीत यापुढे काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाहीही दिली.जिल्ह्याचे नेतृत्व म्हणजे केवळ सांगली लोकसभा मतदारसंघापुरतेच आहे की, त्यामध्ये वाळवा व शिराळा या दोन तालुक्यांचा समावेश आहे हे एकदा आमदार जयंत पाटलांना विचारायला हवे, कारण एका म्यानात दोन तलवारी कशा बसणार, असा प्रश्न भाजपला पडला आहे. कारण सर्व जण जिल्हा बँकेत एकाच पंगतीला असतात. (सहभाग : दयानंद लिपारे, विश्वास पवार, दिगंबर शिंदे)