मंत्र्यांची अशी प्रसिद्धी

या वर्षीचा स्वातंत्र्य दिन दरवर्षीपेक्षा वेगळा होता. कारण अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त घरोघरी राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आले होते. यानिमित्ताने राजकीय पक्षांनीही आपापल्या परीने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यातच राज्यात शिंदे सरकार सत्तेवर आरूढ होऊन मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पाही पार पडला होता. जिल्ह्याला पालकमंत्री अद्याप कोण हे स्पष्ट झाले नसले तरी ध्वजारोहण कोणी करायचे हे मात्र शासकीय पातळीवरून जाहीर करण्यात आले होते. यानुसार सांगलीचे ध्वजारोहण कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मंत्रिमहोदयांना शुभेच्छाचे भाषण शासकीय यंत्रणेद्बारे लिखित स्वरूपात देण्यात आले होते. नावापुढे डॉक्टर लावत असलेल्या मंत्री खाडे यांच्याकडून या भाषणात जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेत असताना भविष्यातील धोरणाचा वेध अपेक्षित होता. मात्र, मंत्री खाडे बोलत असताना स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव असे म्हणाले. अनवधानाने बोलले असतील असे वाटले, पण आपणास स्वातंत्र्य १५ ऑगस्ट २०४७ रोजी मिळाल्याचा उल्लेख केला गेला. त्याकडेही उपस्थितांनी दुर्लक्ष केले. मात्र गरजांचा ऊहापोह करीत असताना ‘गजरा’चा उल्लेख झाल्याने विरोधकांनी समाजमाध्यमावर तोंडसुख घेतले व त्यातून आदळआपट झालीच.

खुर्ची रे खुर्ची!

 माणसं खुर्चीत असतील तर त्यांची किंमत. पण खुच्र्या रिकाम्या असतील तर?  सध्या संदीपान भुमरे यांना रिकाम्या खुच्र्याचा त्रास होतोय म्हणे. पैठणच्या एका कार्यक्रमात माणसं कमी दिसली आणि भुमरे यांच्या लोकप्रियतेवर शंका व्यक्त होऊ लागली. खरे तर भुमरे यांनी ध्वजारोहण केल्यानंतर त्यांना पालकमंत्र्यांची खुर्ची हवी असल्याची चर्चा पैठण मतदारसंघात सुरू होती. पण समोर माणसंच नसतील तर खुर्चीचा खेळ पाहणार कोण? पण माणसं असो वा नसो, पालकमंत्र्यांच्या खुर्चीवर शिंदे गटाचा जेवढा डोळा तेवढाच भाजपचाही दावा, शेवटी खुर्ची महत्त्वाची.

 ‘पन्नास खोके, एकदम ओके’

आता प्रचारात विधिमंडळ अधिवेधनाप्रसंगी महाविकास आघाडीने शिंदे गटातील आमदारांविरोधात केलेली ‘पन्नास खोके, एकदम ओके’ ही घोषणा चांगलीच गाजली. यापुढील निवडणुकांमध्ये प्रचारासाठी या घोषणेचा वापर केल्यास यश मिळू शकेल, असे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही माजी मंत्र्यांना वाटू लागले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकताच जळगाव जिल्हा दौरा केला. यानिमित्त आयोजित बैठकीत माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी आगामी निवडणुकांसाठी यशासाठी काय करावे हे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासमोर मांडले. मूळचे शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. महाविकास आघाडी म्हणून आपण त्यांच्यासोबत आहोत. निवडणुकीच्या काळात ही घोषणा असलेले दहा हजार टी शर्ट मतदारसंघांमध्ये वाटावेत. असे केल्यास जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटासोबत गेलेले पाचही आमदार पराभूत होतील आणि या पाचही मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील, असा डॉ. पाटील यांचा तर्क आहे. प्रचाराची ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचीही सूचना त्यांनी केल्याने राष्ट्रवादीला निवडणुकीतील यशाची किल्लीच जणू काही डॉ. पाटलांनी दिल्याने प्रदेशाध्यक्षांनीही त्यास सहमती दर्शविली. त्यामुळे आगामी काळात ‘पन्नास खोके, एकदम ओके’ हे शिंदे गटाच्या विरोधात प्रचाराचे मुख्य सूत्र राहील अशीच चिन्हे आहेत.

खड्डे बुजविण्याचाही श्रेयवाद

 निवडणुका समोर आल्या असता सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी आपण कसे अहोरात्र धडपड करीत असतो, हे सांगण्याचा आटापिटा राजकीय नेते मंडळी करीत असतात. कधीही न होणाऱ्या विकासकामाचे स्वप्न दाखविण्यापासून ते झालेल्या आणि न झालेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पुढारी पुढे सरसावण्याची संधी सहसा सोडत नाहीत. श्रेयवाद आणि राजकारण यांचे नाते असे अतूट राहिले असताना आता क्षुल्लक, फुटकळ कामाचे श्रेय घेण्यासाठीही स्पर्धा सुरू झाली आहे. सोलापूरसारख्या निवांतह्ण नगरीत ही गोष्ट नवलाईची राहिली नाही. परंतु एखाद्या रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करायला एरवी एखाद्या स्थानिक नगरसेवकाला फुरसत नसते, असे खड्डे बुजविण्याचे काम करवून घेण्यासाठी माजी सहकारमंत्री, आमदार सुभाष देशमुख आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी, माजी आमदार दिलीप माने यांच्यात अहमहमिका लागली आहे. सोलापूरच्या होटगी रस्त्यालगत आसरा पुलाच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी आपण कसा पाठपुरावा केला, महापालिका प्रशासनाची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना कसे फैलावर घेतले? इथपासून उपोषण वा तत्सम आंदोलनाचा इशारा देण्यापर्यंत आपल्या धडपडीविषयक बातम्या प्रसिद्ध होण्यासाठी त्यांची यंत्रणा सक्रिय झाली आहे.

 मुलाखतीसाठी मंत्री तर फोटोसाठी मी..

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शनिवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. आपल्या मिश्कील स्वभावाने त्यांनी वातावरण हलकेफुलके बनवले होते. कोश्यारी यांना पत्रकार परिषद घेणार का, असे विचारताच त्यांनी ‘मुलाखत लेना है तो मंत्रीजी के पास जावो, फोटो खिंचना है तो मेरे पास आओ’ असे म्हणत पत्रकारांचीच फिरकी घेतली.

(सहभाग : दिगंबर शिंदे,  अविनाश पाटील, सुहास सरदेशमुख, एजाज हुसेन मुजावर, अभिमन्यू लोंढे)

शिंदे गटात सहभागी झाल्यापासून आमदार संजय शिरसाठ म्हणजे जणू काही बिनखात्याचे मंत्रीच. त्यांची भाषा आणि वागणूकच बदलून गेलेली. अलीकडेच एका कार्यक्रमात त्यांनी सहकारमंत्री अतुल सावे यांचा उल्लेख एकेरी केला. मंत्री सावे यांचे वडील मोरेश्वर सावे यांच्याबरोबर काम केल्याचे सांगत त्यांनी अतुल सावे यांना एकदम वयानेही लहान करून टाकले. आपण खूप मोठे आहोत असे ते दर्शवीत राहतात. नुकतेच शांतता समितीच्या बैठकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा त्यांच्या आधी सत्कार केला म्हणून ते कार्यक्रमातून निघून चालले होते. खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना थांबविले. मंत्रीपद मिळाले नाही तरी काय झाले?  आपण मुख्यमंत्री गटाचे आमदार. म्हणजे आपण मोठेच असा त्यांचा बहुधा समज झालेला असावा.

Story img Loader