सांगली जिल्ह्यातील एका मातब्बर नेत्याचा वाढदिवस नवीन वर्षांच्या पहिल्या आठवडय़ामध्ये आहे. दरवर्षी गल्लीपासून दिल्लीपर्यंत वाढदिवस साजरा केला जातो. या नेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. कार्यकर्तेही आपण या नेत्याच्या किती जवळचे आहोत हे दर्शविण्यासाठी गावात मोक्याच्या ठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आघाडीवर असतात. कोणी रक्तदान शिबीर घेते, तर कोणी सामुदायिक विवाहाचे आयोजन करीत असतात. यात वावगे आता कोणालाच वाटत नाही. गावपातळीवरील कार्यकर्त्यांला नावानिशी ओळखणारा हा सांगली जिल्ह्यातील नेता स्वपक्षीयांना फारसा पचत नसला तरी विरोधकांना आप्तस्वकीय वाटतो. मात्र, याच नेत्याचा वाढदिवस असताना शुभेच्छांचे फलक मात्र निर्धारित दिवसापेक्षा तब्बल १५ दिवस अगोदरच झळकल्याने आश्चर्य व्यक्त करीत आहे. वाढदिवसाची लगीनघाई आणि तीही तब्बल दोन आठवडे आधीच कशासाठी याची विवंचना कार्यकर्त्यांअगोदर खुद्द या नेत्यालाच लागली आहे.
झारीतील शुक्राचार्य कोण ?
सोलापूर विमानसेवा आणि सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी असा वाद आणि या मुद्दय़ावर होणारे आंदोलन-प्रतिआंदोलन सोलापुरात गाजत आहे. जुन्या होटगी रस्त्यावर सिध्देश्वर कारखान्यालगत छोटय़ा विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्यासाठी सिध्देश्वर कारखान्याची ३०० मीटर उंच चिमणी पाडण्याचा आग्रह विमानसेवा समर्थक आंदोलक करीत असताना त्याविरोधात प्रतिआंदोलन म्हणून सिध्देश्वर कारखान्याचे सभासद शेतकरी, कामगार आणि विविध राजकीय पक्षांचे नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा नेऊन मोठे शक्तिप्रदर्शन घडविले. यानिमित्ताने सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्याच्या मागणीसाठी चिथावणी देणारा झारीतील शुक्राचार्य कोण, याची चर्चा उपस्थित झाली. जुन्या विमानतळाऐवजी नजीकच्या बोरामणीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी जलदगतीने होण्यासाठी ताकदीने प्रयत्न होणे अपेक्षित आहे. सोलापूर महापालिका सभागृहातही कारखान्याची चिमणी पाडण्याचा ठराव सत्ताधारी भाजपने कोणाच्या सांगण्यावरून मंजूर केला ? यामागे कोणाचा हात आहे, असा सवाल सिध्देश्वरच्या चिमणी बचाव आणि बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी काढलेल्या मोर्चात बहुतांशी वक्त्यांनी केला. परंतु झारीतील शुक्राचार्य कोण, हे सिध्देश्वर कारखान्याचे अध्वर्यू धर्मराज काडादी यांनी जाहीर करावे म्हणजे त्याचा पुरेसा बंदोबस्त करता येईल, अशी गळ घालण्यात आली.
प्रसिद्धीचे अवडंबर
कोल्हापूर महापालिकेचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन गुरुवारी झाला. खणखणीत वाजवून सांगावे अशी महापालिकेच्या कार्याची परंपरा नाही. स्वाभाविकच पहिलाच कार्यक्रम तसा साधेपणाने पार पाडला. एका बाबतीत मात्र भलतीच चपळाई दिसून आली. कार्यक्रम एकच. वर्धापन दिनाचा. स्थळही एकच. पण ध्वजारोहण, वीर कुटुंबीयांचा सत्कार, वृक्षारोपण, शेणी दान, गुणवंत विद्यार्थी- सामाजिक संस्थांचा सत्कार असे कार्यक्रम एकाच वेळी झाले. या प्रत्येकाची बातमी आणि छायाचित्रे वेगवेगळी पाठवून प्रसिद्धी मात्र दणक्यात करून घेतली. महापालिकेतील शाळेच्या मुलांना ऐतिहासिक स्थळाला भेट घडवण्याचा एकमेव कार्यक्रम बाजूला झाला. पण या सर्वच कार्यक्रमात अधिकाऱ्यांची छायाचित्रे झळकवून ते प्रसिद्धीच्या झोतात कसे राहतील याची पुरेपूर दक्षता घेतली गेली. समारंभाची सारी छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसिद्ध झाल्यावर व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया महापालिकेच्या कारभारावर प्रकाश टाकणाऱ्या होत्या.
(सहभाग : दिगंबर शिंदे, एजाज हुसेन मुजावर, दयानंद लिपारे )