राजकारणाचे वर्णन करताना आखाडा हा शब्द सातत्याने वापरला जातो. त्याला कुस्तीचा संदर्भ आहे. राज्यसभा निवडणुकीत कोल्हापूर अधिकच चर्चेत आले होते. कोल्हापूरची ओळख कुस्ती नगरी. या कुस्ती पंढरीतील धनंजय महाडिक या एकेकाळच्या मल्लाने राज्यसभेच्या किताब आणि विजयाची गदा प्राप्त केली. स्वाभाविकच त्याचे पडसाद विजयी मिरवणुकीत उमटले. जुन्या कुस्ती खेळाची आठवण ठेवत धनंजय महाडिक यांनी अनेकदा दंड थोपटले. त्यावर कार्यकर्त्यांनाही स्फुरण चढले आणि दंड थोपटण्याची जणू अहमहमिका सुरू झाली. मिरवणुकीत रस्त्यावर जागोजागी दंड थोपटत निघालेले नव मल्ल दिसू लागले. अर्थात महाडिक यांनी थोपटलेला दंड हा त्यांच्या कुस्ती खेळाच्या आवडीचे दर्शन दाखवणारा होता, तद्वत तो जिल्ह्यातील पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय संजय मंडलिक यांना आव्हान देणाराही होता हे काही लपून राहिले नाही. त्यामुळे आगामी काळात कोल्हापूरच्या राजकीय आखाडय़ात महाडिक आणि विरोधक यांच्यात कुस्तीची दंगल रंगणार हे मात्र नक्की.
संशयकल्लोळ
राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानादरम्यान सर्वाच्या नजरा अपक्ष आमदारांवर खिळलेल्या. त्यातही अमरावतीतील दोन अपक्ष आणि दोन प्रहारचे अशा चार आमदारांची भूमिका महत्त्वाची. रवी राणांनी भाजपला दिलेले समर्थन दिल्याने त्यांचा प्रश्न मिटला, बच्चू कडूंनी शेवटच्या पाच मिनिटांत निर्णय घेऊह्णचा इशारा दिल्याने उत्सुकता ताणली गेलेली. पण, ते महाविकास आघाडीसोबतच राहतील, हा अंदाज होता. पण जेव्हा संजय राऊतांनी मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांचा दगाबाज म्हणून जाहीर उल्लेख केला, तेव्हा चर्चा रंगली. देवेंद्र भुयार हे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने निवडून आलेले. पण शेट्टी यांचे त्यांच्याशी बिनसले. कारण का म्हणे तर भुयार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जास्त जवळ गेल्याचे. मग शेट्टी यांनी भुयार यांना पक्षातून बाहरेचा रस्ता दाखविला. यामुळे त्यांना आधार आता राष्ट्रवादीचाच. भुयार यांचे मत फुटले या संजय राऊत यांच्या आरोपानंतर ते चर्चेत आले. मतदान संपवून अमरावतीत परतले असता प्रश्नांचा भडिमार सुरू झाला. मग आमदारांनी तडक पुन्हा मुंबई गाठली. शरद पवार यांची भेट घेतली. शिवसेनेनेच आरोप केल्याने भुयार यांच्याबद्दल संशयकल्लोळ निर्माण झालाच व त्यातून त्यांना बाहेर पडणे सोपे नाही.
बेदखल मेटे
विनायक मेटे हे शिवसंग्रामचे नेते. तसे त्यांनी प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी बरेच प्रयोग केले. मराठा समाजाचे आपणच सर्वमान्य नेते अशी प्रतिमा त्यांनी उभी करण्याचा प्रयत्न केला. सर्व पक्षात तसे चांगले संबंध. त्यामुळे ते नेहमी विधान परिषदेवर निवडून येत. या वेळी त्यांना भाजपने उमेदवारी दिली नाही. ते तसे खट्ट झाले खरे. पण त्यांची नाराजी काही भाजप नेत्यांनी वाढू दिली नाही. अगदी विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी प्रवीण दरेकर, गिरीश महाजन हे भाजपचे नेते त्यांना आवर्जून भेटून गेले. त्यातच पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारली याचीच चर्चा जास्त झाली. यामुळे मेटे तसे बेदखल झाले.
आता कसला संघर्ष ?
एके काळी उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणात ‘डॉक्टर’ पद्मसिंह पाटील यांच्या नावाचा एवढा दरारा होता की , त्यांना विरोध करण्यासाठी कॉग्रेस, शिवसेना आणि भाजप सारे जण एकत्र व्हायचे. त्याचे नेतृत्व करायचे तुळजापूरचे तत्कालीन आमदार मधुकरराव चव्हाण. खर्जातला आवाज, धोतर- नेहरू शर्टातील कॉग्रेसचा हा गडी भिडायचा. सारी ‘जनता बँकेत’ एकत्र व्हायचे. डॉक्टरांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी तुळजापूर मतदारसंघ अक्षरश: पेटून उठायचा. आता त्याच मतदारसंघाचे नेतृत्व पद्मसिंहाचे सुपुत्र राणा जगजीतसिंह करत आहेत. घडय़ाळाची साथ सोडल्यानंतर डॉक्टर पद्मसिंह पाटीलही सक्रिय राजकारणातून काहीसे बाजूला झाले. त्यानंतर नुकतेच डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवशी मधुकर चव्हाण यांनीही त्यांची भेट घेतली. वयाची ८० पार केलेले हे दोन्ही नेते भेटल्याचा अनेकांना आनंद झाला. तेव्हा कार्यकर्तेही म्हणाले, राजकारणात होते तेव्हा खूप विरोध केला. आता संघर्ष कसला ? पद्मसिंहाचे चिरंजीव अजूनही राजकारणात सक्रिय आहेत. मधुकररावांना मात्र तसा राजकीय वारसा मुलांपर्यंत नेता आला नाही किंवा त्यांच्या मुलांनाही तो मिळविता आला नाही. वयोवृद्ध नेत्यांनी मात्र मनसोक्त गप्पा मारल्या म्हणे!
(सहभाग : दयानंद लिपारे, मोहन अटाळकर, सुहास सरदेशमुख )