राज्याच्या राजकारणात सध्या ‘खोके’ फारच चर्चेचा विषय झाला आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरेंसह शिंदे गटाच्या तमाम विरोधकांनी तो फारच लोकप्रिय करून टाकला आहे. याच वातावरणात गेल्या शनिवारी रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या कोकण विभागातर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी परंपरेनुसार शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्हाबरोबरच सोनेरी रंगाच्या कागदात गुंडाळलेला एक खोकाही देण्यात आला. या  दिवाळीनिमित्त केले जाणारे खाद्यपदार्थ ‘सिद्धाई’ या संस्थेने त्या खोक्यात पाहुण्यांना सप्रेम भेट म्हणून दिले होते. चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचा सत्कार करतानाही तसेच खोके दिले गेले. त्यावर आपल्या भाषणात मिश्कीलपणे टिप्पणी करताना गांधी यांना उद्देशून सामंत म्हणाले की, सगळय़ांना हे खोके दिले, हे बरं झालं. हल्ली या खोक्यांबद्द्ल इतके बोके बोलायला लागले आहेत की, त्या खोक्यात काय आहे, हेही सगळय़ांना उघडून दाखवा. त्यात एक बरं आहे, की आपल्या दोघांचाही खोका सारखाच आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे आणि ठाकरे

ठाकरे नावाला अलीकडे जास्तच महत्त्व प्राप्त झाले. जो तो मंत्री ठाकरे यांच्या नावाचा जपमळ करीत असतो. आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे न्यायचे आहेत, असे सार्वत्रिक मंत्र्यांचे विधान तर ज्यांनी ‘कमळाबाई’ अशी भाजपची निंदानालस्ती केली त्या बाळासाहेबांचे विचार भाजपलाही पटू लागले आहेत. यंदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. सर्वत्र ठाकरे यांच्याच नावाचा गजर होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे कुटुंबीयातील सदस्यांना निमंत्रित करून ठाकरे आपल्याबरोबर आहेत हे दाखवून दिले. जयदेव ठाकरे यांनी व्यासपीठावर येऊन भाषण केले. जयदेव निघून गेल्यावर व्यासपीठावर स्मिता ठाकरे यांना स्थान देण्यात आले. ठाकरे यांना महत्त्व देताना शिंदे समर्थकांना तारेवरची कसरत करावी लागली हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

समाजमाध्यम आणि कार्यकर्त्यांच्या भावना

दृक्-श्राव्य, मुद्रितमाध्यमांबरोबर नेतेमंडळीत समाजमाध्यमांचे महत्त्व वाढते आहे. समाजमाध्यमात आपली छबी तळपत ठेवली पाहिजे हे प्रभावीपणे समजून सांगण्यात यात काम करणाऱ्या संस्था भलत्याच हुशार. त्यांनी अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी यांना प्रवृत्त केले आहे. अलीकडे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी समाजमाध्यमाची यंत्रणा गतिमान झाली आहे. यामुळे दादांच्या हालचाली, मते पटकन समजू लागली आहेत. विजयादशमीदिनी पथसंचलन झाले. तेव्हा ज्या  भागात फिरून आले, अशी पोस्ट पाहून हा प्रकार कधी घडला अशी चर्चा कार्यकर्त्यांत सुरू झाली. खेरीज भाजपची स्वत:ची समाजमाध्यमाची प्रभावी यंत्रणा, स्वतंत्र आघाडी असतानाही त्यास कमी लेखले जाऊन इतरांना ताकद दिली जात असल्याबद्दल कार्यकर्त्यांचा गट आपापसात नाराजी व्यक्त करीत राहिला. समाजमाध्यमातून माणसे जोडली जात असताना कार्यकर्ते हिरमुसतात ते हे असे.

 (सहभाग : सतीश कामत, दयानंद लिपारे)

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavadi political drama in maharashtra maharashtra political crisis amy
Show comments