भाजपच्या फडणवीस सरकारमध्ये महसूल खात्यासारखे वजनदार खाते याचबरोबर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पक्ष विस्ताराची जबाबदारीही दादांवर होती. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचा विस्तार वेगाने करण्यासाठी दादांचा सांगली दौरा भरगच्च ठरलेला असायचा. जे पक्ष प्रवेश करू इच्छितात, त्यांचे पक्षाच्या दृष्टीने उपयोजित अथवा उपद्रव मूल्य किती यावर त्यांना काय द्यायचे आणि कुठे ठेवायचे याचा बरोबर अंदाज दादांनी जोखला होता. यामुळे जिल्हा परिषदेपाठोपाठ महापालिकेची सत्ता हाती घेण्यात भाजपला यश आले. आताही दादा मंत्री आहेत, मात्र, उच्च व तंत्र शिक्षण खात्याचा कार्यभार त्यांच्याकडे आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारीही कमी झाली आहे. कोल्हापूरचे दादा आता पुण्यातील कोथरूडचे झाल्याने येता-जाता सांगलीला पायधूळ झाडण्याची दादांची सवयही मोडीत निघाल्याने राबताही कमी झाला आहे. याचीच प्रचीती सोमवारच्या दादांच्या दौऱ्यावेळी दिसून आली. सत्ता आल्यानंतर दादांचा सांगलीचा दौरा कोल्हापूरच्या तांबडय़ा रश्शासारखा झणझणीत न ठरता, आळणी वरणासारखाच ठरला. आता याला भाजपमधील वरिष्ठ पातळीवरील राजकारण म्हणायचे की, पुढची झेप घेण्यासाठी दोन पावलांची माघार?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हाफकिन अन् खेकडा
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवडय़ात केलेल्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी संबंधित बंडखोर आमदार किंवा नेत्यांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यामध्ये चिपळूणच्या सभेत ते म्हणाले की, हाफकिन हा मोठा वैज्ञानिक होता. त्यांच्या नावाने मोठी संस्था आहे. परंतु आपल्या आरोग्य मंत्र्यांना तो दलाल वाटतो. नशीब, त्यांना खेकडा वाटला नाही. खेकडा वाटला असता तर इथल्या धरणावर आले असते. इथल्या धरणाची अजून खोलवर चौकशी केली असती तर खेकडेच काय, आणखी काय काय बाहेर आले असते!
तीन वर्षांपूर्वी चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटून मोठय़ा प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली. त्याबाबत स्पष्टीकरण देताना तत्कालीन जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी, खेकडय़ांनी पोखरल्यामुळे धरण फुटले असावे, असं तर्कट मांडलं होतं. सध्याच्या राज्य मंत्रिमंडळात सावंत आरोग्यमंत्री असून नुकतेच त्यांनी, हाफकिन हा औषधांचा पुरवठादार असल्याच्या गैरसमजातून वक्तव्य केल्याची मोठी चर्चा झाली. तो धागा पकडून आदित्य ठाकरे यांनी सावंतांबरोबरच चिपळूणचे एकनाथ शिंदे गटात सामील झालेले माजी आमदार सदानंद चव्हाण यांनाही हा टोमणा मारला. कारण तिवरे धरणाचं बांधकाम चव्हाण यांच्या कंपनीने केलं असून ते सदोष असल्याचा ठपका शासनाने या संदर्भात नेमलेल्या समितीने ठेवला आहे. त्याबाबतची कारवाई टाळण्यासाठीच ते शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झाल्याचं बोललं जात आहे.
पक्ष वेगळे, अनुभव एकच
आदिवासी भागात पाणीपुरवठय़ासाठी ज्या योजना राबविल्या जातात, त्यातील अनेक फसव्याच असतात. कागदोपत्री त्या रंगविल्या जातात. देखाव्यासाठी खड्डे खोदले जातात. जलवाहिनीसाठी पाइपही टाकले जातात. पण पाणी ईप्सित स्थळी काही पोहोचत नाही. या स्थितीत एकाच पाणीपुरवठा योजनेचे अनेकदा उद्घाटन होते. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी हा अनुभव कथन केला. नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या बैठकीत पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला जात असताना त्यांनी आपण स्वत: एकाच पाणीपुरवठा योजनेचे चार वेळा उद्घाटन केल्याचे नमूद केले. राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी देखील झिरवाळ यांचा अनुभव बरोबर ठरवला. आदिवासी भागात योजना राबविताना आपल्यालाही तसे अनुभव अनेकदा आल्याचे त्यांनी मान्य केले. कधीकाळी झिरवाळ आणि डॉ. गावित हे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात एकत्रित काम करीत होते. आज त्यांचे पक्ष बदलले असले तरी अनुभवांची शिदोरी मात्र एकसारखीच आहे.
निर्विकार चेहरे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या वार्षिक सभेत ग्रामीण भागात तळातील कार्यकर्त्यांच्या अभ्यासाचा अर्क पाहायला मिळतो. कसलेल्या सहकारसाम्राटांनाही ते प्रसंगी जेरीस आणतात. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभेतील असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आर्थिक, धोरणात्मक मुद्दय़ाचे बिनतोड विश्लेषण करत होते. मार्मिक प्रश्न विचारत होते. ताळेबंद , आकडेवारी यावर त्यांचे प्रश्न अभ्यासपूर्ण असल्याने त्याला समर्पक उत्तर देताना कसोटी लागत होती. अध्यक्ष हसन मुश्रीफ नेहमीच्या शैलीत प्रश्नांना अचूक उत्तर देत राहिले. बँकेची सभा ते एक हाती पार पाडत होते. प्रश्नोत्तरादरम्यान अध्यक्ष – सभासदांमध्ये होणाऱ्या संवादाला सतेज पाटील, संजय मंडलिक, विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर यासारखे संचालक अधूनमधून प्रतिक्रिया नोंदवत होते. पण उपस्थित अन्य आजी-माजी,भावी आमदार , खासदार मात्र चेहऱ्यावरची रेषाही हलू न देता चालले आहे बुवा; काहीतरी असा भाव दर्शवत निर्विकार चेहऱ्याने सभेचे कामकाज पाहात होते. सहकार क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही बाब ठरली.
बेगाने शादी मे..
हातकणंगले तालुक्यातील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत आमदार रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या नेतृत्वाखालील या कारखान्यातून एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे हालत असत. राजकीय चढाओढी, अनावश्यक खर्च यामध्ये कारखाना डबघाईला आला. ११वर्षांपूर्वी कारखाना रेणुका शुगर्सला १८ वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर दिला. रेणुका शुगर्स कंपनी अडचणीत आल्याने तिचे बहुतांशी शेअर्स खरेदी केलेल्या विल्मर कंपनीचीच आता पंचगंगेवर सर्वस्वी हुकूमत. संचालक मंडळ सहकारातील तांत्रिक उपचारांपुरते. त्यांना कारखाना अंतर्गत आर्थिक व्यवहार, धोरणात्मक निर्णय घेण्याचे कसलेही अधिकार नाहीत. तरीही कारखान्याचे संचालक मंडळ आपले अस्तित्व दाखवण्याचा क्षीण प्रयत्न करीत राहते. अलीकडे कारखान्याची वार्षिक सभा झाली. अध्यक्ष पी. एम. पाटील यांनी या हंगामात एकरकमी एफआरपी देणार असल्याची घोषणा केली. नावापुरते आणि उपचार म्हणून असलेल्या संचालक मंडळाला अशा काही घोषणा करण्याला तसा काहीच अर्थ नसतो. दुसऱ्याच्या मांडवात मिरवण्याचा हा प्रकार. उपस्थित मोजके सभासद माना डोलवतात आणि परतत असताना यांना काय अधिकार दर जाहीर करण्याचा? असा प्रश्न परस्परांना विचारत राहतात.
सभ्यतेचे कौतुक!
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना उपमुख्यमंत्र्यांनी झापले, न्यायालयाने फटकारले पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्यांची भलती स्तुती केली. का? तर म्हणे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विद्यापीठ परिसरात आणण्यासाठी खासे प्रयत्न केले. कुलगुरू स्तुती करत होते आणि मंत्री सत्तार खूश होत होते. २२ वर्षांनंतर विद्यापीठ परिसरात मुख्यमंत्री आले म्हणून कुलगुरूंच्या मागण्यांची यादी वाढली. ती प्रशासकीय तर होतीच पण त्याच वेळी कुलगुरूंना सर्वाना खूश करायचे होते. आलेल्या पाहुण्यांची तारीफ करायच्या नादात बरेच काही घडत होते. शिवरायांचा पोवाडा पुढे म्हटला जात होता. निष्ठा कशी महत्त्वाची असे शाहीर सांगत होता. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाचे अनावरण होत होते. पुढे शाहीरही राजकीय नेत्यांची स्तुती करू लागला. तेव्हा ‘स्तुतिसुमने’ अंमळ अधिकच अंगावर येऊ लागली. कौतुक सभ्यतेने करावे आणि सभ्य तेच करावे असेच कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्यांना वाटत होते.
(सहभाग : सतीश कामत, दिगंबर शिंदे, अनिकेत साठे, दयानंद लिपारे, सुहास सरदेशमुख )